मंत्रिमंडळाचा पाळणा हलला, पण पाळण्याच्या दोऱ्या…; ‘सामना’तून भाजप-शिंदे गटावर हल्लाबोल

Uddhav Thackeray Devendra Fadnavis Eknath Shinde
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल शिंदे- फडणवीसांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. एकूण 18 दिग्गजांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. यावरून आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधण्यात आला आहे. “मंत्रिमंडळाचा पाळणा हलला, पण पाळण्याच्या दोऱ्या कोणाकडे आहेत? माहीत नाही. अखेर 40 दिवसांनंतर शिंदे फडणवीस सरकारचे बाळंत झाल्याचे पेढे वाटण्यात आले. पण पाळण्यात नक्की काय आहे? ते समजायला मार्ग नाही, अशी टीका शिवसेनेकडून सामनातून करण्यात आलेली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या मुखपत्रातून शिंदे- फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी किचक व द्रौपदीचे उदाहरण दिले आहे. “किचकाने द्रौपदीचा विनयभंग केला. मांडीवर थाप मारून तो वारंवार पापाची भाषा बोलत होता. म्हणून भीमाने किचकाची मांडीच फोडली. फडणवीस यांच्या तर दोन्ही मांड्यांवर पापाचीच ओझी शिंदे गटाने ठेवली आहेत. आणि हेच पाप महाराष्ट्राच्या माथी मारण्याचे कार्य मंत्रिमंडळ विस्ताराने पुढे नेले असल्याचा टीका केली आहे.

यावेळी दिल्लीत नीती आयोगाच्या बैठकीत ममुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रांगेत पाठीमागे उभे राहण्याच्या घटनेचीही आठवण सामनातून करून देण्यात आली आहे. दिल्लीच्या दरबारात महाराष्ट्र मागच्या रांगेत गेलाच आहे. ही महाराष्ट्राची बदनामीच आहे असे सांगत विकासाच्या शर्यतीत तरी तो पुढे राहावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना, असा टोला मुख्यमंत्री शिंदेंना लगावला आहे.

औटघटकेची मंत्रिपदे त्यांनाच लखलाभ ठरोत –

क्रांती दिनाचा मुहुर्त शिंदे फडणवीस मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी निवडला गेला. आता काही लोक बेईमानी, विश्वासघातालाच क्रांती म्हणत असतील तर शिंदे गटाच्या मंत्र्यांनी आपापल्या दालनात लखोबा लोखंडेच्या तसबिरीच लावाव्यात. महाराष्ट्राची जनता त्यांना माफ करणार नाही. त्यांची औटघटकेची मंत्रिपदे त्यांनाच लखलाभ ठरोत’.अशी टीका सामनामधून करण्यात आली आहे.

हा लोकशाही व घटनेचा खून –

यावेळी राज्यपाल कोशारी यांच्यावरहि निशाणा साधण्यात आला असून ‘मंत्र्यांना शपथ देताना राज्यपाल महोदयांचा चेहरा आनंदाने न्हाऊन निघाला होता, फार मोठे ईश्वरी कार्य आपल्या हातून पार पडल्याचा आविर्भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. राज्यपाल महोदयांनी 40 दिवसांपूर्वी एका बेकायदा सरकारला शपत दिली व आत्ता त्याच बेकायदा सरकारच्या मंत्र्यांना शपथ देऊन घटनेचा अपमान केला आहे. सर्वोच्च न्यायालयात आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणी सुरू असताना त्यातील काही आमदारांना मंत्रिपदाची शपथ देणे हा लोकशाही व घटनेचा खून आहे. पण असे खुनी सध्या देशभरात मोकाट सोडून त्यांच्या माध्यमातून राज्य चालवले जात असल्याचा’ घणाघात सामनामधून करण्यात आला आहे.