मुंबईचा लचका तोडण्याचा प्रयत्न केला तर तुकडे केल्याशिवाय राहणार नाही; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

Uddhav Thackeray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात शिवसेनेने सुरू केलेल्या शिवसंपर्क अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री ठाकरे यांची सभा शनिवारी वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर पार पडली. या सभेतून त्यांनी भाजपसह त्यांच्यावर ज्यांनी टीका केली त्यांच्यावर निशाणा साधला. मुंबईला स्वतंत्र करण्याच्या भाजप नेत्यांच्या भाषेमुळे मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा भाजपचा डाव उघड झाला आहे. मात्र तसा प्रयत्न करणाऱ्यांचे तुकडे तुकडे होतील, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत दिला.

मुंबईतील जाहीर सभेत उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्हाला केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत भीती दाखवण्याचा जरी प्रयत्न केला आणि शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल केल्यास दया माया न दाखवता पळता भुई थोडी करण्यात येईल हे याद राखावे. यावेळी ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांचाही समाचार घेतला. भाजप नेत्यांच्या पोटात असलेले ओठांवर आले असून मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा त्यांचा मनसुबा उघड झाला आहे. पण तुमच्या मालकांसह १७ पिढय़ा खाली आल्या तरी मुंबई मराठी माणसाचीच राहील, ती महाराष्ट्रापासून तोडू देणार नाही. मुंबईचा लचका तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे तुकडे तुकडे होतील, असा इशारा ठाकरे यांनी दिला.

भाजपचे हिंदुत्व विकृत असून ते आम्हाला मान्य नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा विचार दिला. पण भाजप हिंदुत्वाचा विखार पसरवत आहे. या हिंदुत्त्वातून देशाला दिशा काय देणार? त्यातून देशाची दुर्दशा होत आहे. हिंदुत्वासाठी तुम्ही काय केले, याचे दाखले भाजपने समोर ठेवावे, असे आव्हान मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

आम्ही चूल पेटवणारे आहोत ; उद्धव ठाकरे

यावेळी भाजपवर निशाणा सोडताना मुख्यमंत्री म्हणाले की, भाजप देश पेटवणारे आहेत तर आम्ही चूल पेटवणारे आहोत. हृदयात राम आणि हाताला काम हे आमचे धोरण आहे. भाजपचे हिंदुत्ववादी खालच्या पातळीची, विखारी भाषा करतात. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल गलिच्छ विचार त्यांनी व्यक्त केले. हेच का भाजपचे, संघाचे, भाजपप्रणित रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे संस्कार, असा सवाल ठाकरे यांनी केला.

उद्या दाऊदलाही हे मंत्री बनवतील

यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, “आता हे दाऊदच्या मागे लागले आहेत. उद्या दाऊद म्हणाला मी भाजपमध्ये येतो तर त्याला मंत्री बनवतील. म्हणूनच कदाचित त्याच्यासाठीच मागे लागले असतील. मग तो भाजपमध्ये आल्यावर सांगतील तो कसा गुणांचा पुतळा आहे, असा टोला ठाकरेंनी लगावला.

राज ठाकरेंच्या डोक्यात मुन्नाभाईप्रमाणे केमिकल लोचा

यावेळी राज ठाकरे यांच्यावर टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘ज्यांना बाळासाहेब झाल्यासारखं वाटतं. कधी शाल घालून फिरतात. कधी हिंदुत्वाच्या मागे लागतात. चित्रपटातला मुन्नाभाई लोकांचे भले करत होता. यांचे काय? राज ठाकरेंच्या डोक्यात मुन्नाभाईप्रमाणे केमिकल लोचा’, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.