कोल्हापूर प्रतिनिधी । ”जेवणाच्या ताटात पवार खडे का टाकतात ? गरिबांसाठी १० रुपयांत जेवण उपलब्ध करून दिले यात काय वाईट? याच गरिबांसाठी स्वयंपाक करण्याची वेळ माझ्यावर आली तरी करेन. मी स्वयंपाक करेन, पण अजित पवार पाणी देतील ते पाणी आपल्याला चालेल का? असा सवाल उपस्थितांना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. उद्धव ठाकरे यांनी यावेळी शरद पवारांवर सुद्धा हल्लाबोल केला. कोल्हापूर उत्तर शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संजय मंडलिक, अरुण दुधवडकर यांच्यासह भाजप आणि सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, ‘स्वातंत्रपूर्व काळातील काँग्रेसकडे विचार होता. आता तसा विचार त्यांच्या पक्षांमध्ये नाही. त्यांच्याकडे आता कोणी नेताचं उरला नाही. तुम्ही गरिबांचा पैसा खाणार आणि तुम्हाला विचारायचे पण नाही. ईडी समोर जाणाऱ्यांना ईडीने सांगितले गरज असेल त्यावेळी बोलवलं जाईल. त्यावेळी आला नाही तर उचलून आणलं जाईल असं ईडी म्हणाली’ असल्याचे त्यांनी सांगितले.
याचाच संदर्भ जोडत त्यांनी ‘मुंबई वाचवण्याचं काम बाळासाहेब ठाकरे यांनी केलं हा गुन्हा होता काय? बाळासाहेब यांना अटक केली हे सुडाचे राजकारण नव्हतं का? शिवसेना प्रमुखांचा काय गुन्हा होता, जे तुम्ही त्यांना अटक केली?आता तेच सुडाचे राजकारण तुमच्या मागे लागलं आहे आणि तुमच्या कर्मामुळे मागे लागले’ असे प्रश्न उपस्थित करत काँग्रेस राष्ट्रवादीवर उद्धव ठाकरे यांनी टीका केली.