केंद्रीय आरोग्य सचिवांचे राज्यांना पत्र; तिसऱ्या लाटेवरून दिल्या ‘या’ सूचना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशासह राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. कोरोनाबरोबर ओमिक्रॉन व्हेरियंट बाबत उपाययोजना करण्यासंदर्भात केंद्र सरकारने सुरुवात केली आहे. दरम्यान आज केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांना पत्र लिहून रुग्णालयांमध्ये पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनची उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या सूचना केल्या आहेत.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आज देशातील सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी आरोग्य सुविधांमध्ये वैद्यकीय ऑक्सिजनची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

राज्यातील आरोग्य विभागाने राज्यात असलेल्या रुग्णालयांमध्ये 48 तास ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची खात्री करावी. सर्व जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स व्यवस्थित काम करत आहेत का?, आयसीयू (ICU), बीआयपीएपी, एसपीओ 2 प्रणालीसाठी आवश्यक व्हेंटिलेटर योग्य प्रकारे काम करत आहेत कि नाही, याचीही खात्री करण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिल्या आहेत.

आता महाराष्ट्रात राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांच्याकडूनही केंद्रीय आरोग्य सचिवांनी दिलेल्या सूचनांचे पालन केले जाणार आहे. राज्यातील रुग्णालयांमध्ये 48 तास ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची त्यांच्याकडूनही खात्री केली जाणार आहे.

You might also like