उत्तराखंड येथील जंगले आगीच्या विळख्यात; अनेक दिवसांपासून आग सुरूच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था । देशातील कोरोनाचे वाढते रुग्ण हे एक संकट देशासमोर असतानाच आता उत्तराखंड मध्ये एक नवीनच संकट येऊन ठेपले आहे. यावर्षीच्या सुरुवातीपासून काही ठराविक अंतराने उत्तराखंडच्या विविध भागातील जंगलांमध्ये आग लागते आहे. वाहणाऱ्या वाऱ्यामुळे या आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण होते आहे. त्यामुळे हळूहळू जंगले जळत आहेत. या जळणाऱ्या जंगलांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. या आगीमुळे जंगलातले प्राणिजीवन ही विस्कळीत झाले असून जीव मुठीत घेऊन ते इतरत्र जात आहेत.

आतापर्यंत या परिसरातील साधारण ४६ जंगले जळाली आहेत आणि त्यामध्ये एकूण ५१.३४ हेक्टर परिसर जळून खाक झाला आहे. राज्यातील केवळ कुमाऊ भागातील २१ जंगलांना आग लागली आहे. त्यानंतर गढवाल परिसरात १६ जंगले जळाली आहेत. याशिवाय ९ भागामध्ये रिजर्व जंगलामध्ये आग लागली आहे. अल्मोडा, बागेश्वर, नैनीताल, पौढी, चमोली, पिथोरगड, आणि डेहराडून अशा सर्वच जंगलांमध्ये आग लागली आहे. आतापर्यंत या आगीमुळे दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. एक व्यक्ती जखमी झाला आहे.

जंगलांमध्ये लागणाऱ्या या आगीमुळे मोठ्या प्रमाणात जंगलातील जैवविविधता नष्ट होण्याचीही भीती निर्माण झाली आहे. वनाधिकारी आग विझवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत आहेत. मात्र गेले काही दिवस आग थांबण्याचे नावच घेत नाही आहे. या आगीचे फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. उत्तराखंडच्या जंगलातील ही अवस्था खूप वाईट असल्याचे दिसून येत आहे. लवकरच आग आटोक्यात आली नाही तर मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment