मुंबई प्रतिनिधी | वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय एमआयएमने घेतला आहे. यासंदर्भात खासदार इम्तियाज जलील यांनी एक पत्रक काढून घोषणा केली होती. मात्र यासंदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी ओवेसी जोपर्यंत युती तोडण्याच्या निर्णयावर काही बोलत नाहीत तोपर्यंत कोणत्याही वावड्या खऱ्या मानू नका असे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. मात्र आज ओवेसींनी देखील हात वर केले आहेत. त्यामुळे एमआयएम आणि वंचित यांच्यात तलाक पूर्ण झाला आहे.
सोमवारी प्रकाश आंबेडकर यांनी या विषयावर भाष्य केले होते. “एमआयएमसोबत युतीसाठी बोलणी सुरू आहे. या युतीसाठी फॉर्म भरण्याच्या दिवसापर्यंत वाट पाहणार आहे. ओवेसी यांच्यासोबत पुण्यात भेट झाली आहे. त्यामुळे त्यांच्यासोबतच्या युतीबाबत मी आशावादी आहे.” आम्ही त्यांची शेवट्पर्यंत वाट बघणार आहोत असे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. मात्र त्यांच्या वक्तव्याच्या एकच दिवस नंतर म्हणजे आज ओवेसींनी वंचित पासून फारकत घेतल्याचे जाहीर केले.
वंचित आघाडीकडे एमआयएमने९८ जागा मागितल्या होत्या. मात्र प्रकाश आंबेडकर यांनी एवढ्या प्रमाणात जागा देण्यास नकार दिल्याने एमआयएम नेते चौताळले आणि त्यांनी युती तोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर खूपच गंभीर परिणाम होणार आहे. भाजप सेनेच्या खात्यात यामुळे अधिक जागा जाण्याची शक्यता आहे. तर वंचितचे उमेदवार देखील मोठ्या प्रमाणावर पराभूत होण्याची शक्यता आहे.