हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे. त्यामुळे गेल्या वर्ष-दीड वर्षापासून बंद असलेल्या शाळा लवकर सुरु करण्या संदर्भात शिक्षण विभागाकडून विचार केला जात असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली होती. त्यानंतर आता राज्य सरकारकडून परिपत्रक जारी करण्यात आले असून त्यात राज्यातील ग्रामीण भागात दि .17 ऑगस्ट पासून इयत्ता 5 वी ते 7 वी चे वर्ग आणि शहरी भागात इयत्ता 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु करण्यात येत असल्याची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली.
याबाबत अधिक माहिती देताना शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हंटले आहे की, 17 ऑगस्टपासून शाळा सुरु करण्यासंदर्भातील शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आला आहे. मात्र, सरसकट आम्ही शाळा सुरू करत नाहीत. ज्या ठिकाणी सुरक्षा आहे त्याच ठिकाणी शाळा सुरू करत आहोत. शिक्षकांच लसीकरण केलं जाणार आहे. ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव आहे त्या ठिकाणी स्थानिक प्रशासन निर्णय घेतील.
एक वर्षांपूर्वी मार्च 2020 पासून राज्यातील शाळा कोरोनाच्या महामारीमुळे बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारच्यावतीने घेण्यात आला. त्यानंतर आता कोरोनाचे प्रमाण राज्यात कमी झाल्याने त्या ठिकाणची माहिती घेत तेथील शाळा सुरु करण्यासंदर्भात शिक्षण विभागाकडून आठवड्यात बैठक घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आता शाळा सुरु करण्याबाबत आज राज्य सरकारकडून परिपत्रक जारी करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांना घ्यावा लागणार आहे. महापालिका क्षेत्रात शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी खास समिती गठीत केली जाणार आहे. तसेच, नगरपंचायत, नगरपालिका, ग्रामपंचायत, स्तरावरही जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत केली जाणार आहे.
शाळा सुरू करण्यापूर्वी हि घ्यावी लागणार दक्षता –
1) शाळा सुरु करण्यापूर्वी कमीत कमी १ महिना संबंधित शहरात / गावात कोविडचा प्रादुर्भाव कमी झालेला असावा.
2) शिक्षकांचे लसीकरण करणे आवश्यक आहे.
3) विद्यार्थ्यांच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये.
4) कोविड संबंधी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. एका वर्गात जास्तीत जास्त १५-२० विद्यार्थी, मास्कचा वापर बंधनकारक आहे.
5) विद्यार्थी कोविडग्रस्त झाल्याचे आढळल्यास तात्काळ शाळा बंद करुन शाळा निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही मुख्याध्यापकांनी करुन घ्यावी .