मुंबई : हॅलो महाराष्ट्र – गोरगरिबांची एकवेळच्या भोजनाची सोय व्हावी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवभोजन थाळी सुरु केली होती. दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये राज्यात कठोर निर्बंध लादण्यात आले त्यानंतर गोरगरिबांचे हाल होऊ नये म्हणून राज्यात शिवभोजन थाळी मोफत देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. शिवभोजन थाळीचा लाभ लाखो लोकं घेत आहेत. मात्र आता शिवभोजन घेण्यासाठी केंद्रावर गेलेल्या एका वृद्ध महिलेला केंद्रचालकाकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे.
भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी यासंदर्भातील एक ट्विट रिट्विट करत शेअर केले आहे. हा व्हिडीओ आशिष मेरखेड या व्यक्तीने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शिवभोजन केंद्रावर झालेल्या किरकोळ बाचाबाचीमुळे एका महिलेला हाकलून देण्यात आले आहे. हा व्हिडीओ नांदेड बसस्थानकाजवळ असलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्याच्या शिवभोजन केंद्रातील असल्याचा दावा आशिष मेरखेड यांच्याकडून करण्यात आला आहे. या व्हिडिओवरून भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
शिवभोजन घ्यायला गेलेल्या वृद्धेला मारहाण. हे असे मिळतेय गरिबांना 'शिवभोजन'. छत्रपती शिवरायांचे नाव घेऊन महाराष्ट्रात टक्केवारी सेनेची अशी वाटमारी सुरू आहे. https://t.co/x7dHe868x9
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 22, 2021
या प्रकारावर आपली प्रतिक्रिया देताना अतुल भातखळकर म्हणाले, शिवभोजन घ्यायला गेलेल्या वृद्धेला मारहाण झाली आहे. हे असे मिळतेय गरिबांना ‘शिवभोजन’.छत्रपती शिवरायांचे नाव घेऊन महाराष्ट्रात टक्केवारी सेनेची अशी वाटमारी सुरू आहे, असा आरोप अतुल भातखळकर यांच्याकडून करण्यात आला आहे.