हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केरळ मध्ये झालेल्या हत्तीणीच्या हत्येने सर्वत्र संतप्त वातावरण आहे. भाजपा केरळमध्ये झालेल्या या हत्येचा निषेध करत आहे. त्याबद्दल कारवाई करण्याची मागणी करत आहे. मात्र केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटक या तीनही राज्यात दहशत पसरवणारा आणि तब्बल २००० हत्तींची हत्या करणाऱ्या वीरप्पनची मुलगी विद्या राणी हिने भाजपा मध्ये प्रवेश केला असल्याची माहिती मिळाली आहे. पक्षाचे सरचिटणीस मुरलीधर राव यांच्या उपस्थितीत तिने पक्षप्रवेश केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्याणकारी योजनांनी प्रेरित होऊन आपण या पक्षात प्रवेश घेतल्याचे तिने सांगितले. विद्या राणी ही कुप्रसिद्ध डाकू वीरप्पन याची मोठी मुलगी आहे.
हत्तीच्या दातांची आणि चंदनाची तस्करी करणारा कुप्रसिद्ध डाकू अशी वीरप्पन ची ओळख होती. तो अत्यंत क्रूर आणि निर्दयी होता आणि कोणताही विचार न करता कुणाचीही हत्या करायचा अशी त्याची ओळख होती. त्याने त्याच्या संपूर्ण आयुष्यात १० हजार टन चंदनाची तस्करी केली होती. तसेच २००० हजाराहून अधिक हत्तीची हत्या केली आहे. त्याच्या या तस्करीच्या कामात अडथळा निर्माण करणाऱ्या लोकांना तो मारून टाकत असे. त्याने बहुतेक वनाधिकारी आणि पोलिसांच्या हत्या केल्या आहेत. दाक्षिणात्य अभिनेते राजकुमार यांचे अपहरण करून त्याने सरकारकडून २० कोटी रुपये घेतले होते. त्याने जवळपास १०५ दिवस त्यांना स्वतःच्या कैदेत ठेवले होते.
ज्या व्यक्तीने २००० हत्तीची हत्या केली त्याची मुलगी पक्षात असताना भाजपाच्या भूमिकेविषयी शंका व्यक्त केली जात आहे. अशाप्रकारचा एक संदेश सध्या व्हाट्सअप वर व्हायरल होतो आहे. दोन वर्षांपूर्वी माजी केंद्रीय मंत्री पोन राधाकृष्णन यांची विद्या राणी यांनी भेट घेतली होती त्यावेळी राधाकृष्णन यांनी पक्षप्रवेशाचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला होता. वीरप्पनला लोकांची सेवाच करायची होती, मात्र त्यांनी निवडलेला मार्ग चुकीचा होता असे त्या म्हणाल्या. विद्या राणी या पेशाने वकील आहेत. तसेच सामाजिक कार्यात सक्रिय असतात. कोणत्याही जाती-धर्माची पर्वा न करता शिक्षणाद्वारे लोकांना उन्नत करायचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्या मागील एक वर्षांपासून एक शिक्षण संस्था चालवीत आहेत. असे असले तरी भाजपावर सध्या टीकेचा चांगलाच भडीमार सुरु आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.