हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे जगभरातील क्रीडा स्पर्धांवर गंडांतर आले होते. कोरोनाला रोखण्यासाठी जगभरात लॉकडाऊन सुरु करण्यात आलेला होता. त्यामुळे जवळपास सर्वच देशातील खेळाडू हे घरातच होते. आता बहुतेक करून सर्व देशांमध्ये हळूहळू लॉकडाऊन मध्ये शिथिलता देण्यास सुरुवात झाली आहे. अशातच भारतीय क्रिकेट संघानेही मैदानावर पुन्हा परतण्याची घोषणा केली आहे. अशातच भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड याने नुकतेच कर्णधार विराट कोहली याचे कौतुक केले आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली हा कसोटी क्रिकेटचा मोठा चाहता असून त्याला कसोटी सामन्यांत खेळण्याचे महत्त्व चांगलेच ठाऊक आहे, अशा शब्दांत माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडने कोहलीवर स्तुतीसुमने उधळली आहेत.
कोहलीच्याच कर्णधारपदाखाली भारतीय संघाने तब्बल तीन वर्षे जागतिक क्रमवारीतील आपले अग्रस्थान टिकवून ठेवले होते. ‘‘विराट कोहली हा कसोटी सामन्यांचे महत्त्व जाणून आहे. कसोटी क्रिकेटच्या दृष्टीने ही फारच आनंदाची गोष्ट आहे. जेव्हा एखाद्या संघाचा कर्णधार हा क्रिकेटच्या या पारंपरिक प्रकाराचे महत्त्व जाणतो, त्या वेळी त्याची आणि संघाचीही त्या प्रकारातील कामगिरी सर्वोतम होते,’’ असे द्रविड याने सांगितले.या माजी क्रिकेटपटूने संजय मांजरेकर यांच्याशी साधलेल्या ऑनलाइन संवादादरम्यान कोहलीविषयीचे आपले मत मांडले.
‘‘कोणताही क्रिकेटपटू हा कसोटी सामन्यांत अशी कामगिरी करतो यावरूनच जास्त ओळखला जातो. आमचा जेव्हा कधी संवाद होतो, त्या वेळी कोहली कसोटी क्रिकेटचा आवर्जून उल्लेख करतो. कसोटी सामन्यांमधील त्याची गेल्या काही वर्षांतील कामगिरी अत्यंत कौतुकास्पद आहे. भारताच्या अनेक युवा खेळाडूंनी त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे,’’ असेही द्रविडने यावेळी सांगितले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.