सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
भाजपाने विशेष लक्ष केंद्रित केलेल्या पलूस-कडेगाव मतदार संघात कामाचा अजेंडा घेऊन पलूस येथील महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकांची ग्वाही घेऊन अखेर सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम देशमुख यांना साथ देणयाचे आवाहन केले. काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार डॉ. विश्वजित कदम यांची उमेदवारी काँग्रसने जाहीर केली आहे. त्यामुळे या दोन युवा नेत्यांचा सामना रंगतदार होणार यात वाद नाही.
आमदार डॉ. विश्वजित कदम यांना शह देण्यासाठी भाजपाने गेली सहा महिन्यापूर्वीच संग्राम देशमुख यांच्या उमेदवारीचे आव्हान समोर ठेवले आहे. कदम -देशमुख या दोन्हीत दुसऱ्या पिढीतील सामना रोमांचक पाहायला मिळणार आहे. तेव्हा ह्या कडव्या मुकाबल्यासाठी पलूस-कडेगाव मतदार संघ सज्ज झाला आहे. या लढतीने राज्याचे लक्ष वेधून घेणारे आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या पश्चात पोटनिवडणुकीत त्यांचे पुत्र विश्वजित कदम बिनविरोध आमदार झाले. त्यांच्यावर काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष पदाची धुरा सोपावण्यात आली आहे. याचवेळी त्यांचे पारंपरिक कट्टर विरोधक असलेले देशमुख गटाला भाजपाने चांगलेच बळ दिले आहे.
पृथ्वीराज देशमुख यांना भाजपचे जिल्हाध्यक्षपद आणि विधानपरिषदेचे आमदारकी तसेच संग्राम देशमुख यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाची संधी दिली आहे. महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पद्धतशीरपणे डाव मांडून युतीकडे सांगली जिल्ह्यातील सर्व जागा खेचून आणण्यासाठी पुर्ण क्षमतेचे नेतृत्व असणारे संग्राम देशमुख यांची वर्णी लावली आहे. कदम-देशमुख गटातील राजकारण विकासासाठी चालत आलेले आहेत. दोन्ही गट विकासकामात अग्रेसर आहेत. त्यामुळे निवडणूकीत विकासकामांच्या मुद्द्यांवर अजेंडा राहणार आहे.