Wednesday, February 1, 2023

ठाकरेंसाठी अंधेरी पोटनिवडणुक प्रतिष्ठेची का आहे?? जाणून घ्या ‘ही’ 5 कारणे

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या अकाली निधनानंतर अंधेरी पूर्व मतदासंघाची पोटनिवडणूक लागली आहे. ३ नोव्हेंबरला याठिकाणी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून मुरजी पटेल हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकूण २५ जणांनी उमेदवारी अर्ज भरला असला तरी मुख्य लढत ऋतुजा लटके आणि मुरजी पटेल यांच्यातच होणार हे नक्की… राज्यातील सत्तांतर आणि शिवसेनेला मिळालेलं नवं चिन्ह यानंतरची ही पहिलीच विधानसभा पोटनिवडणूक आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता अशी काही कारणे आहेत ज्यामुळे उद्धव ठाकरेंसाठी हि लढत खूप महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची मानली जात आहे. त्याचाच घेऊया सविस्तर आढावा…

1) शिवसेनेतील फुटीनंतर जनता कोणाच्या बाजूने?

एकनाथ शिंदे यांच्यासहित ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंड केल्याने शिवसेनेत उभी फूट पडली. काँग्रेस- राष्ट्रवादी सोबतच्या आघाडीला कंटाळून आम्ही उठाव केला असा दावा बंडखोर आमदारांनी केला. मात्र आमदार खासदार गेले तरी मूळ शिवसैनिक हा उद्धव ठाकरेंसोबतच आहे असा दावा सातत्याने ठाकरे गटाकडून करण्यात येतो. त्यामुळे ही पोटनिवणूक जिंकून सामान्य जनता आपल्या सोबतच आहे हे दाखवून देण्याचे आव्हान उद्धव ठाकरेंसमोर आहे.

2) मशाल चिन्ह घराघरात पोचेल का?

- Advertisement -

निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यांनंतर ठाकरेंच्या गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव मिळालं असून मशाल हे चिन्ह देण्यात आलं आहे. त्यामुळे धनुष्यबाणा नंतर होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. अशा वेळी खूप कमी वेळेत लोकांपर्यंत मशाल हे चिन्ह पोचवण्यासाठी ठाकरे गटाला मोठी कसरत करावी लागणार आहे. लोकांचा मशाल चिन्हावर किती विश्वास बसतो हे सुद्धा आता पाहावं लागेल.

3) काँग्रेस- राष्ट्रवादीची साथ-

खरं तर अंधेरी पूर्व मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशीच पारंपरिक लढत आत्तापर्यंत पाहायला मिळाली. परंतु आता महाविकास आघाडी एकत्र असल्याने काँग्रेसने ही जागा शिवसेनेसाठी सोडली. यापूर्वी शिवसेनेने कोल्हापूर उत्तर आणि नांदेड येथे काँग्रेससाठी जागा सोडली होती आणि येव्हडच नव्हे तर काँग्रेस उमेदवाराला निवडून आणण्यात शिवसैनिकांनी मोलाची भूमिका बजावली होती. २०१९ च्या समीकरणानुसार काँग्रेसची तब्बल २८ हजार मते अंधेरी पूर्व मतदारसंघात आहेत त्यामुळे ही मते ठाकरेंकडे वळतील का? यावर विजयाचे सगळं गणित आहे. याठिकाणी काँग्रेसने स्वतः मैदानात उतरून ठाकरेंना विजय मिळवून दिल्यास भविष्यात महाविकास आघाडी अधिक चांगल्या प्रकारे विरोधकांचा सामना करू शकेल.

4) आगामी मुंबई महापालिका –

मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर असताना उद्धव ठाकरेंसाठी अंधेरी पूर्वची जागा जिंकणं खूप महत्त्वाचं आहे. शिंदे गटाने शिवसेनेत मोठं बंड केलं असलं तरी मुंबईत मात्र ठाकरेंचाच वरचष्मा आहे. त्यातच ज्याप्रकारे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हाव लागलं त्यामुळे लोकांच्या मनात त्यांच्याविषयी मोठी सहानभूती आहे. अशा वेळी अंधेरीची पोटनिवडणूक जिंकल्यास महापालिका निवडणुकीसाठी शिवसैनिकांना चांगलाच बूस्ट मिळेल आणि शिवसैनिक अत्यंत जोरदारपणे महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरतील.

5) भाजपला हरवून शिंदे गटाला इशारा –

आमचीच खरी शिवसेना असं सांगणाऱ्या शिंदे गटाने अंधेरी पूर्व ही हक्काची जागा भाजपला दिल्याने आधीच लोकांसमोर त्यांचा खरा चेहरा उघड झाला आहे. त्यातच आता भाजपचा थेट पराभव करून शिंदे गटाला अप्रत्यक्ष इशारा देण्यासाठी अंधेरी पोटनिवडणूक जिंकणं उद्धव ठाकरेंसाठी महत्त्वाचं आहे. असं झाल्यास जे काही काठावर असलेले पदाधिकारी आहेत ते सुद्धा भविष्यात शिंदेंकडे न जाता ठाकरेंसोबत राहू शकतात. आणि याचा मोठा फायदा उद्धव ठाकरेंना न्यायालयीन लढाईवेळी होऊ शकतो. त्यामुळे उद्धव ठाकरेंना अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुक कोणत्याही परिस्थितीत जिंकावीच लागणार आहे.