मुंबई : हॅलो महाराष्ट्र – पुढील महिन्यात 18 जून रोजी भारत-न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार आहे. या फायनल मॅचच्या आगोदर न्यूझीलंडची टीम इंग्लंडविरुद्ध दोन टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. या सिरीजचा न्यूझीलंडला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी फायदा होणार आहे, अशी भविष्यवाणी भारताचे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी केली आहे. भारताने इंग्लंडमध्ये शेवटची टेस्ट सीरिज 2007 मध्ये जिंकली होती. त्यावेळी राहुल द्रविड टीमचा कर्णधार होता, तर वेंगसरकर निवड समितीचे अध्यक्ष होते. या नंतर भारत इंग्लंडमध्ये तीन टेस्ट सीरिज खेळला पण भारताला यापैकी एकपण सिरीज जिंकता नाही आली.
‘टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी हा मोठा मोसम आहे. बायो-बबलमध्ये राहणे कठीण आहे, पण टीम इंडियाने गेल्या काही दिवसांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. इंग्लंडमधील हि सिरीज मोठी रंजक होणार आहे. त्यामुळे तिथल्या परिस्थिती आणि वातावरणाशी जुळवून घेणे महत्वाचे असणार आहे. यामुळे तिकडच्या खेळपट्टीवर जास्त काळ घालवणे महत्वाचे ठरणार आहे. आम्हाला या गोष्टीचा फायदा मिळायचा कारण आम्ही सीरिजच्या आधी आणि सीरिजच्या मध्ये काऊंटी क्रिकेट खेळायचो, त्यामुळे परिस्थितीनुसार बदलण्याची आम्हाला संधी मिळायची असे दिलीप वेंगसरकर यांनी सांगितले आहे. तसेच ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्याआधी न्यूझीलंड इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. फायनल त्यांच्यासाठी इंग्लंडमधली तिसरी टेस्ट असेल, तर आपली पहिलीच असेल, याचा न्यूझीलंडला फायदा होईल, पण भारताकडे चांगली बॅटिंग आहे, त्यांनी जर स्वत:च्या क्षमतेनुसार खेळ केला, तर टीमची कामगिरी नक्कीच चांगली होईल,’ असे मत दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केले आहे.
यानंतर दिलीप वेंगसरकर यांनी भारताच्या इंग्लंड दौऱ्याच्या वेळापत्रकाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले कि ‘हे वेळापत्रक बघून हैराण झालो. अशाप्रकारे एखाद्या दौऱ्याचं आयोजन कसे केले जाऊ शकते? तुम्ही दीड महिने क्रिकेट खेळणार नाही, त्यानंतर टेस्ट सीरिज कशी खेळणार? जुलै महिन्यात पाकिस्तान आणि श्रीलंका मर्यादित ओव्हरच्या सीरिजसाठी इंग्लंडला जाणार आहे. भारतीय टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलनंतर दीड महिना तिकडे काय करणार आहे? या कालावधीमध्ये त्यांनी काऊंटी मॅच खेळल्या पाहिजे. दीड महिना हा खूप मोठा कालावधी आहे. एवढ्या दिवसानंतर तुम्ही अचानक टेस्ट सीरिज खेळायला सुरुवात केली तर तुम्हाला वेगळेच वाटेल असे दिलीप वेंगसरकर म्हणाले आहेत. ‘ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय टीमने केलेली कामगिरी सर्वोत्कृष्ट होती, जेव्हा खेळाडू फिट नव्हते तेव्हा युवा खेळाडूंनी शानदार कामगिरी केली,’ असे वक्तव्य वेंगसरकर यांनी केले आहे. तसेच भारताकडे चांगल्या बॅटिंगशिवाय चांगली बॉलिंगही आहे, त्यामुळे भारताला इंग्लंडविरुद्धची सीरिज जिंकण्याची चांगली संधी असल्याचे दिलीप वेंगसरकर म्हणाले.