परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे
देशावर कोणतंही संकट आलं की काँग्रेसचे नेते राहुल गांधी इटलीला पळून जातात. राज्यात पूर आलेला असतानाही ते पळून गेले. असा पळपुटा नेता पक्षाला आणि देशाला पुढं कसा नेणार? अशी घणाघाती टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सेलू येथील जाहीर सभेत केली. राज्यात निष्क्रिय झालेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका करताना त्यांनी राज्यातील स्थिर युती सरकार पुन्हा निवडून द्यायचं आवाहन परभणीतील जनतेला केलं. कलम ३७० रद्द केल्यामुळे आतंकवादी कारवायांना अटकावच होईल असा विश्वास व्यक्त करत मोदी सरकारचं कौतुक योगी आदित्यनाथ यांनी केलं.
राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने आता चांगलाच जोर धरला आहे. राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांच्या सभा होऊ लागल्या आहेत. योगी आदित्यनाथ यांनी सेलू आणि जिंतूर विधानसभेच्या उमेदवार मेघना बोर्डीकर यांच्या प्रचारासाठी सेलू येथे सभा घेतली. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आता स्थानिक मुद्द्यांपेक्षा देशपातळीवरील मुद्द्यावरच प्रचार होऊ लागला आहे. योगी आदित्यनाथ यांनीही आपल्या संपूर्ण भाषणामध्ये महाराष्ट्रातील तुरळक घटनांचा उल्लेख सोडता केंद्रातील सरकारने केलेल्या कामाचा पाढा वाचला. ३७० कलमासोबत मुस्लीम महिलांसाठी बनवण्यात आलेला तीन तलाक विरोधी कायदा यावरही त्यांनी भाष्य केले. देश आर्थिक स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रगती करत असून, यूपीए सरकारच्या काळात अकराव्या क्रमांकावर असलेली आपली अर्थव्यवस्था आता पाचव्या नंबरवर पोहचल्याचं योगी आदित्यनाथ यावेळी म्हणाले.