विशेष प्रतिनिधी | सत्तास्थापनेवरुन महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप यांच्यात चांगलीच जुंपली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना आग्रही असताना भाजप मात्र मुख्यमंत्रीपद सोडण्यास तयार नाही. मुख्यमंत्रीपदावरुन महायुती बिघाड झाल्याने आता शिवसेना आघाडीसोबत जाऊन सरकार स्थापन करणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून समोर येत आहे.
महायुतीला मतदारांनी स्पष्ट कौल दिलेला असूनही सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे. महायुतीमधील कलह दिवसागणिक वाढत असताना आता शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येणार अश्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मुख्यमंत्रिपदासाठी आक्रमक झालेली शिवसेना राष्ट्रवादीसोबत घरोबा करण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे यासाठी 1995 चा फॉर्म्युला वापरण्यात येईल. मात्र पक्ष बदललेले असतील असं बोललं जात आहे.
राष्ट्रवादी शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करू शकते. या सरकारला काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा असेल. त्या बदल्यात काँग्रेसला विधानसभेचे अध्यक्षपद दिलं जाईल, अशी राजकिय वर्तुळात चर्चा आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची काल दिल्लीत भेट घेतली. यावेळी पवारांनी पत्रकार परिषदेत म्हणाले भविष्याबद्दल बोलू शकत नाही, असं म्हणत पवारांनी काहीही घडू शकतं याचे संकेत देत सस्पेन्स वाढवला.