सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
सांगली जिल्ह्यात पूरग्रस्तांसाठी विविध स्वरूपात मदतीसह इतर काही जीवनावश्यक वस्तूंची मदत केली जात आहे. पण भाजपच्या नगरसेविका गीता सुतार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी यावेळी समोर आली. गीता सुतार यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी मराठा सेवा संघ येथील पूरग्रस्त निवारा केंद्र बंद पाडत निवारा केंद्रातील कार्यकर्त्यांना मारहाण केल्याची घटना घडली असून यामध्ये एक पूरग्रस्त महिला आणि एक कार्यकर्ता जखमी झाला आहे. यावेळी एका महिला पत्रकारालाही यावेळी धक्काबुक्की करण्यात आली आहे.
सांगलीतील पूरग्रस्तांसाठी अनेक छावण्या बनवण्यात आल्या आहेत. या छावण्यात पूरग्रस्तांना जेवणासह इतर आवश्यक गोष्टींची सुविधा पुरवण्यात येत. सांगलीतही मराठा सेवा संघ या ठिकाणी पूरग्रस्त निवारा केंद्र उभारण्यात आले आहे. गेल्या ७ ते ८ दिवसांपासून या निवारा केंद्रामार्फत पूरग्रस्तांना मदत केली जात आहे. त्या ठिकाणी जवळपास ५५० ते ६०० लोक राहत आहेत. पण भाजपच्या नगरसेविका गीता सुतार या ठिकाणी आल्या. त्यांनी या ठिकाणी कोणतीही सुविधा मिळत नाही, असा दावा करायला सुरुवात केली. त्यांचा हा दावा खोडून टाकण्यासाठी संघाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पूरग्रस्तांबाबत विचारणा केली. त्यावेळी आम्ही अशाप्रकारे कोणतीही तक्रार केलेली नाही असे पूरग्रस्तांनी सांगितले. यानंतर त्या नगरसेविकेला संताप अनावर झाला. त्यांनी सेवा संघाच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी सेवा संघाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. या मारहाणीत एक पूरग्रस्त महिला, महिला पत्रकार आणि एक कार्यकर्ता असे तिघे जण जखमी झाले आहेत.
जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्या कार्यकर्त्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. धक्कादायक बाब म्हणजे भाजपच्या नगरसेविका आणि तिच्या कार्यकर्त्यांनी सेवा संघात पूरग्रस्त निवारा केंद्रातील मदतीचे सामानही पळविले असल्याचा आरोप मराठा सेवा संघांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. दरम्यान या मारहाणीनंतर घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहे, काही काळ प्रंचड तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हाता, घडामोडीनंतर नगरसेविका सुतार यांनी याबाबत जाहीर माफी मागत असल्याचे सांगत प्रकरणावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.