सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे ।
सर्वात हॉट स्पॉट असलेल्या धारावी मुंबई येथून इस्लामपूर शहरात चौघे जण छुप्या पध्दतीने दाखल झाल्याने एकच खळबळ माजली आहे. नगरपालिकेच्या प्रशासनाला माहिती मिळताच चौकशी केली असतां अजून १६ जण आल्याची माहिती मिळाल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले. यातील काही जण सांगली येथे नातेवाईकांकडे जाणार होते. हे सर्वजण एकत्रित बसने आल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वांना आरोग्य विभागाने मिरज येथे पाठवले आहे. विनापरवाना जिल्ह्यात प्रवेश केल्याप्रकरणी सुरेखा दशरथ कोंचीकोरवी व शिवराज दशरथ कोंचीकोरवीयांच्यावर इस्लामपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी, धारावीतून खासगी बस कोणत्याही परवानगी शिवाय सांगली जिल्हयाच्या हद्दीत आल्याने कासेगाव चेक पोस्ट येथे अडवण्यात आली. परवाना नसल्याने ती गाडी पुन्हा महामार्गावरून परत धारावीला रवाना केली गेली. अन् हीच संधी साधत सर्व जण थोड्या अंतरावर रस्त्यावर उतरले. यातील चार जण इस्लामपुरात दाखल झाले तर उर्वरित 16 जण कासेगाव पासून कराड रस्त्यावर सेवा रस्त्यावर बसून होते. संबंधितांची नगरपरिषदेमार्फत खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली. इस्लामपूर शहरातील माकडवाले वसाहतीमध्ये धारावी मुंबई येथील नागरिक अनाधिकृतपणे आल्याची माहिती नगरपालिका हेल्पलाईनला मिळाली. त्यानुसार तातडीने मुख्याधिकारी प्रज्ञा पवार व आपत्कालीन पथकाने वसाहतीमधील घरांची तपासणी केली असता एका घरामध्ये दुपारी 12 वाजता चार जण आल्याचे आढळले. तातडीने शासनाचा आरोग्य विभाग, पोलीस स्टेशन यांना कळविण्यात आले. त्यानुसार तातडीने चौघांनाही आरोग्य विभाग पुढील कार्यवाहीसाठी घेऊन गेले. तसेच संबंधित घरातील सदस्यांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.
ताब्यात घेतलेल्या चौघांकडून 21 जण काल रात्री 10 वाजता खाजगी बसने धारावी मुंबई येथून इस्लामपूर व सांगली येथे येण्यासाठी प्रवासाला निघाल्याचे धक्कादायक माहिती मिळाली. त्यांच्याजवळ अधिकृत पास नसल्याने कासेगाव चेक नाक्यावरून ही बस धारावी मुंबई येथे परत पाठविली असता थोड्या अंतरावर यातील सर्व नागरिक उतरले. सदर 21 पैकी 4 जण आडमार्गाने इस्लामपूर शहरामध्ये त्यांचे नातेवाईकांच्या घरी आले असल्याचे स्पष्ट झाले. धारावीहून आलेले उर्वरित 16 नागरिक कासेगांवनजीक महामार्गावर असल्याची माहिती मिळाली. हेे नागरिक छुप्या मार्गाने इस्लामपूर शहरामध्ये येऊ नयेत याबाबत अधिकची चौकशी करण्यासाठी मुख्याधिकारी प्रज्ञा पवार, उपमुमुख्याधिकारी प्रमिला माने, साहेबराव जाधव, अनिकेत हेंद्रे यांच्यासह आपत्कालीन पथक कासेगांव येथे गेले. ही माहिती कासेगांवचे स.पो.नि.सोमनाथ वाघ यांना दिली. प्रांताधिकारी नागेश पाटील यांना कळवल्यावर त्यांनी कासेगावचे वैद्यकीय अधिकारी यांना बोलावून घेत पुढील सर्व कार्यवाही तातडीने करण्यासाठी आरोग्य व पोलीस यंत्रणेस सूचना दिल्या. त्यानुसार सर्व नागरिकांची प्राथमिक तपासणी होऊन कासेगांव आरोग्य विभागाने त्यांना मिरजेला पाठवले आहे.
दरम्यान, धारावीतून आलेल्या २१ जणांपैकी 16 नागरिक कासेगाव येथे ताब्यात घेतले आहेत. तर इस्लामपूर शहरामध्ये 4 नागरिक आले होते. असे एकूण 20 जण आढळून आले. त्यांचे बरोबर आलेला 16 वर्षीय मुलगा बेपत्ता झाला आहे. तो कुठे गेला आहे याबाबत माहिती नसल्याचे इतरानी सांगितल्याने प्रशासनाची धाकधूक वाढली आहे. धारावीतील 21 जण इस्लामपूर व सांगलीकडे येण्यासाठी बुधवारी रात्री निघाले. गुरूवारी सकाळी त्यांनी सांगली जिल्हयाच्या हद्दीत प्रवेश केला. मुंबई ते कासेगाव चेक पोस्ट पर्यत तब्बल चार जिल्हयांच्या सीमा ओलांडून बस आली. या बसला कोणत्याही जिल्ह्याच्या सीमेवर कसे तपासले नाही याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.