हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील कोरोनाच्या संकटात वाढ होत असतानाच कर्नाटकातील एका जिल्ह्यात जवळपास ५० माकडे मृतावस्थेत आढळून आली आहेत. यानंतर प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. त्या माकडांवर विषप्रयोग करण्यात आला असावा अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. हे कोणत्या कारणास्तव केले गेले, याबद्दल सध्या काहीही स्पष्ट झालेले नाही. मात्र कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर माकडांच्या या अशा रहस्यमयी मृत्यूमुळे लोकं भयभीत झाले आहेत.
ही घटना कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यामधील आहे. शुक्रवारी येथील बेलथांगडी तालुक्यात सुमारे ५० माकडे ही मृतावस्थेत आढळून आली. एका वृत्तानुसार, या वानरांचे मृतदेह बांदर गावातल्या कुंडलपाळके-पाडमुंझा रोडवर सापडले. या घटनेची माहिती मिळताच जिल्ह्यातील आरोग्य अधिकाऱ्यांनी ताबडतोब घटनास्थळाला भेट दिली आणि सर्व मृत वानरांची तपासणी केली.
वानरांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा शोध घेण्यासाठी बिसराला मंगरुरु येथील पशु रुग्णालयात त्यांचे शव पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, या सर्व माकडांना विष दिले गेले असावे अशी भीती व्यक्त केली जात आहे. यामागील स्पष्ट कारण अद्यापही समोर आलेले नसले तरी पिकाच्या नुकसानीमुळे माकडांवर विषप्रयोग करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
उल्लेखनीय बाब ही आहे की गेल्या काही दिवसांत अनेक राज्यातून अशा आणखी घटना समोर आल्या आहेत, ज्यामध्ये वानरे अशी रहस्यमयरित्या मृतावस्थेत आढळून येत आहेत. एप्रिलच्या उत्तरार्धात, म्हैसूर जिल्ह्यातही तीन माकडांचे मृतदेह सापडले आहेत. मात्र, अधिकाऱ्यांना अशी असे सांगितले आहे की एकतर त्यांना विष देण्यात आले असेल किंवा कीटकनाशके फवारलेली फळे खाऊन त्यांचा मृत्यू झाला असेल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.




