तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असला तरीही त्याच्यावर आजच्या आज कारवाई होणार; फडणवीसांच्या तक्रारींवर अजित पवारांचे आश्वासन

मुंबई । राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत तृतीयपंथीय व्यक्तीला फसवल्याची एक बातमी सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. याबाबत आज विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या पिंपरी चिंचवडच्या एका कार्यकर्त्याने हि खोटी बातमी व्हायरल केल्याचा आरोप केला. यानंतर फडणवीस यांच्या तक्रारीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी असे असेल तर तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असला तरीही त्याच्यावर आजच्या आज कारवाई होणार असे आश्वासन दिले आहे.

सध्या महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाचा आज चौथा दिवस असून महिला अत्याचाराच्या घटनांवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. यावेळी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोशल माध्यमात व्हायरल होत असलेल्या एका बातमीवर सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. यानंतर फडणवीस यांनी सदर बातमी खोटी असून ती राष्ट्रवादीच्या पिंपरी चिंचवडच्या एका कार्यकर्त्यांकडून व्हायरल केली गेल्याचा आरोप केला. तसेच त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.

दरम्यान, फडणवीस यांच्या मागणीनंतर पवार यांनी जर असे घडले असेल तर तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असला तरीही त्याच्यावर आजच्या आज कारवाई केली जाईल असे आश्वासन सभागृहाला दिले. फेक बातम्यांना आळा घालणे गरजेचे असून यावर शासनाने काहीतरी भूमिका घेणे गरजेचे बनले आहे.

You might also like