कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कोरोना सारख्या महामारीवर मात करून आपल्या पत्नीने गोंडस बाळाला जन्म दिला.मात्र कोरोना सारख्या प्रतिकूल परिस्थिशी मुकाबला करण्यासाठी राज्याचे गृहराज्यमंत्री ना शंभुराज देसाई यांनी आपल्या कुटुंबाला दिलेला मायेचा आधार आणि मुंबई सारख्या ठिकाणी बेड मिळत नसतानाही माझ्यासारख्या दुसऱ्या तालुक्यातील सामान्य व्यक्तीला असामान्य मदत केली. म्हणूनच मदत करणारी व्यक्ती पुढे कधीही न विसरू नये यासाठी स्वतःच्या मुलाचे नावच चक्क ‘शंभूराज’ ठेवून आभार व्यक्त केल्याची घटना घडली.
याबाबत असे मूळचा सातारा जिल्ह्यातील उत्तर कोरेगाव येथील रहिवासी असलेले रणजित चव्हाण यांच्या नऊ महिन्याची गरोदर असलेल्या पत्नीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांनी आपल्या पत्नीला मुंबई येथील नायर हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करण्याचा निर्णय घेतला.मात्र तेथे गेल्यानंतर त्यांच्या पत्नीला ऍडमिट करण्यासाठी बेड च शिल्लक नव्हता.
अशा परिस्थितीत कोरोनाची भीती आणि पत्नीच्या काळजीने अक्षरशः भेदरलेल्या चव्हाण यांनी दिनांक 3 मे रोजी राज्याचे गृहराज्य मंत्री ना शंभुराज देसाई यांना थेट मोबाईल वरून संपर्क साधून आपली सविस्तर हकीकत सांगितली. मंत्री देसाई यांनीही आपल्याकडे असणाऱ्या संवेदनशील अशा पाच खात्यांच्या व्यस्त कामांतून चव्हाण यांचा फोन रिसिव्ह ही केला आणि नायर हॉस्पिटल येथे बेड ची व्यवस्था करून दिली.
त्यानंतर ही चव्हाण यांची संकटांनी पाठ सोडली नाही त्यांना दिनांक 14 मे रोजी पुत्र रत्न झाला मात्र तीन दिवसानंतर म्हणजे 17 मे रोजी तीन दिवसांच्या बाळाचा अहवाल ही कोरोना पॉझिटिव्ह आला त्यामुळे चव्हाण कुटुंबियांच्या तोंडचे पाणी गेले.मात्र मंत्री देसाई यांचा फोन द्वारे सातत्याने असणारा संपर्क यामुळे धीर न सोडता 14 दिवस त्यांचे कुटुंब क्वारंटाईन झाले आणि चौदा दिवसानंतर पत्नी आणि बाळ या दोघांनी कोरोना सारख्या महामारीवर मात केली आणि बाळ आणि माता या दोघांचे ही अहवाल निगेटिव्ह आले.
यासंदर्भात रणजित चव्हाण यांनी मंत्री देसाई यांना आभार पत्र पाठविले असून या पत्रात त्यांनी, माझी पत्नी आणि माझे बाळ आज ठणठणीत असून ते केवळ साहेबांच्या मदती मुळे आणि सहकार्यामुळे वेळेत उपचार झाल्यानेच सुखरूप आहेत अन्यथा माझ्यावर दुर्दैवी वेळ आली असती.
माझ्या कुटुंबावर मंत्री देसाई यांचे अनंत उपकार झाले आहेत त्यामुळे या उपकरातून फुल ना फुलांची पाकळी म्हणून परतफेड करण्याची मंत्री देसाई यांनी मला संधी द्यावी.अशी विनंती करुन ज्या देवासमान व्यक्तीने माझ्या कुटुंबाला संकटातून बाहेर काढले त्या मंत्री देसाई यांचे नाव आपल्या कुटुंबाच्या स्मरणात कायम राहण्यासाठी त्या माझ्या बाळाचे नावच ‘शंभुराज’ठेवले असल्याचे रणजित चव्हाण यांनी मंत्री देसाई यांना पाठविलेल्या आभार पत्रात म्हटले आहे.
दरम्यान कोरोनाचा पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात मंत्री शंभुराज देसाई जनतेचे कुठलेही काम एकदम छोटेसे असले तरी ते मन लावूनच करायचे हा त्यांचा शिरस्ता असल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातून ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता हक्काचा आधार देणारा मंत्री म्हणून ना.शंभूराज देसाईंकडे पहात आहे. ना.शंभूराज देसाईंचा मोबाईल नंबर राज्यातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचला असून या माध्यमातून जनतेला येणाऱ्या अनेक समस्या ते ना.देसाईंकडून सोडवून घेत आहेत. ना. देसाई हे गत तीन महिन्यांपासून रोज रस्त्यावर उतरुन नियोजन करीत आहेत तर कधी दुचाकीवरून फेरफटका मारुन बंदोबस्तातील पोलिस अधिकारी,कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची विचारपुस करताना दिसत आहेत.त्यातच मंत्री देसाई यांचे आता नावच आपल्या मुलाला ठेवल्याच्या घटनेने राज्यभर मंत्री देसाई यांच्या अनोख्या कार्यकर्तृत्वाची चर्चा रंगू लागल्या आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.