परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे
जिल्ह्यातील मुरुंबा येथे मागील गेल्या चार दिवसापूर्वी मृत पावलेल्या 900 पेक्षा अधिक कोंबड्या ह्या बर्ड फ्लू च्या आजारामुळे मृत्यू झाल्याचा अहवाल आल्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आज जिल्हा प्रशासनाच्यावतीने गावातील 5550 जिवंत कोंबड्या पाच फूट खोल खड्ड्यांमध्ये पुरुन टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आहे. त्यासाठी सकाळपासूनच याठिकाणी जेसीबी यंत्राच्या साह्याने खोदकाम चालू आहे.
परभणी पासून आठ किलोमीटर असणाऱ्या मुरुंबा गावामध्ये चार महिला बचत गट यांना बँकेच्या वित्तीय सहाय्याने प्रत्येकी दोन लाख रुपयाचे कुकुट पालन कर्ज मंजूर करण्यात आले होते. यातून त्यांना शेड , एक हजार कोंबडीचे पिल्लं व त्यांना लागणारे खाद्य पुरवण्यात आले होते. दरम्यान त्यातील एका महिला बचत गटाच्या शेडमधील सर्व कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्यानंतर त्या मृत पावल्या होत्या.
यासंदर्भात पशुसंवर्धन विभागाने या कोंबड्यांचे रक्ताचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवल्यानंतर सदरील कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने मुरुंबा गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. गावातील जिवंत असणाऱ्या कोंबड्या खोल खड्ड्यात पुरून मारण्याचा निर्णय घेतला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.