पडळकरांच्या शरद पवारांवरील वादग्रस्त वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर । राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर टीका करत असताना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा तोल घसरला आहे. शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत, अशी अत्यंत खालच्या पातळीची टीका पडळकर यांनी केली आहे. पडळकर यांच्या या वक्तव्यानंतर एक नव्या राजकीय वादाला तोंड फुटलं असताना राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांचे कान टोचले आहेत.

”मी गोपीचंद पडळकर यांच्याशी चर्चा केली. पवार हे आमचे राजकीय विरोधक आहेत, पण शत्रू नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल असे शब्द वापरणं चुकीचं आहे. कोणत्याही कठोर भावना मांडण्यासाठी योग्य ते शब्द वापरले गेले पाहिजेत,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. ते सोलापूरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

काय म्हणाले होते आमदार पडळकर?
आमदार पडळकर हे आज पंढरपुरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले ,“शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे असं माझं मत आहे. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राचं नेतृत्त्व ते करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. ती ते पुढंही चालू ठेवतील. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. फक्त छोट्या समूह घटकांना भडकवून आपल्या बाजूने करुन घ्यायचं आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायचे त्यांची भूमिका आहे”.

”धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर मागील सरकारने एक हजार कोटींची तरतूद केली होती. मात्र या सरकारने अर्थसंकल्पात कसलीही तरतूद धनगर समाजासाठी केली नाही. त्यामुळे धनगर समाज केवळ राजकारणासाठी पवाराना लागतो. तसेच विधानसभा निवडणुकीनंतरचा नाशिक येथील अवकाळी पाऊस असो किंवा कोकणात वादळी वाऱ्याने झालेले नुकसान असो. या दोन्ही प्रसंगात शरद पवार पाहणी दौऱ्याला गेले. पण त्या ठिकाणच्या लोकांना दमडीचीही मदत मिळाली नाही. त्यामुळे पवारांचे नेतृत्व केवळ राजकारण करण्यापुरते मर्यादित आहे”असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं.

Leave a Comment