मुख्यमंत्री साहेब, देश अन् हिंदुत्वासाठी शिवसेनेनं काय केलं? – भाजप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु असून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी भाजपला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन हिणवले होते. आर.एस.एस. स्वातंत्र्यचळवळीत नव्हती असे विधान ठाकरे यांनी विधानसभेत केले होते. आता यावर मुख्यमंत्री साहेब, देश अन् हिंदुत्वासाठी शिवसेनेनं काय केलं? असा प्रश्न भाजपकडून विचारला गेला आहे.

ज्या-ज्या वेळी देश संकटात सापडला, त्यावेळी संघाचे स्वयंसेवक प्राणांची पर्वा न करता मदतीसाठी झटले. केरळमधला पूर असो की माळीणचं भूस्खलन… संघाचे स्वयंसेवक तिथे सर्वप्रथम पोहोचले. मुख्यमंत्री साहेब, कदाचित तुम्हाला जाणीव नसेल, पण आम्हाला जनसेवा आणि हिंदुत्व वगैरे शिकवूही नका! अशा आशयाचे ट्विट भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवर करण्यात आले आहे.

दरम्यान, विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज पाचवा दिवस सुरु आहे. भाजप अन् महाविकास आघाडी सरकार यांच्यात अनेक मुद्द्यांवरुन खडाजंगी पहायला मिळत आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरुन भाजपवर निशाणा साधला होता. पैसे जनतेने द्यायचे मात्र नाव यांचं असं म्हणत ठाकरेंनी टिकेची झोड उठवली होती. तसेच अमित शहा यांनी बंद खोलीतील आश्वासन पाळले नाही यावरुन हेच का यांचे हिंदुत्व असं म्हणत ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला होता. आता भाजपकडून शिवसेनेला प्रत्युत्तर दिले जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like