मुंबई : हॅलो महाराष्ट्र – क्रिकेटविश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे. टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि ‘द वॉल’ म्हणून ओळख असणारा राहुल द्रविड लवकरच टीम इंडियाचा कोच म्हणून सूत्रे हातात घेणार आहे. सध्या राहुल द्रविड बंगळुरुतील नॅशनल क्रिकेट अकादमीचा संचालक आहे. या अगोदर राहुल द्रविड टीम इंडियाच्या अंडर-19 टीमचा कोच होता. राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारताने अंडर-19 वर्ल्ड कप जिंकला होता. टीम इंडियामधील नवीन खेळाडू हे राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली तयार झाले आहेत.
राहुल द्रविड कधी होणार टीम इंडियाचे कोच ?
राहुल द्रविड जरी टीम इंडियाचा कोच होणार असला तरी तो विद्यमान कोच रवी शास्त्री यांची जागा घेऊ शकणार नाही. टीम इंडिया जुलै महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये टीम इंडिया श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या टीमचा कर्णधार कोण असणार हे अजून निश्चित झाले नाही. कर्णधाराच्या शर्यतीमध्ये शिखर धवन, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार आणि श्रेयस अय्यर यांच्यात स्पर्धा आहे.
मात्र या टीमचा कोच राहुल द्रविड असणार आहे असे बीसीसीआयने निश्चित केले आहे. श्रीलंका दौऱ्याच्या वेळी रवी शास्त्रीसह संपूर्ण कोचिंग स्टाफ हा इंग्लंडमध्ये असणार आहे. यामुळे नव्या टीमला प्रशिक्षण देण्यासाठी राहुल द्रविड हेच योग्य नाव असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. टीम इंडिया श्रीलंकेच्या दौऱ्यामध्ये 3 वन-डे आणि 3 टी 20 मॅचची सीरिज खेळणार आहे.