कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सातारा जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी वरदान ठरलेल्या कृष्णा हॉस्पिटलमधून आज कोरोनामुक्त झालेल्या 8 रूग्णांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलने योग्य उपचाराने तब्बल 206 रूग्णांना कोरोनामुक्त करण्यात यश प्राप्त केले असून, कृष्णा हॉस्पिटलने कोरोनामुक्तीचे द्विशतक पार केले आहे.
दक्षिण महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात कोरोनाने मोठा हाहाकार निर्माण केला. अगदी पहिल्या टप्प्यातच सांगली व कोल्हापूर जिल्ह्यापेक्षा तुलनेने सातारा जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. त्यातही कराडमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने संपूर्ण जिल्ह्यात भितीचे वातावरण पसरले. दरम्यान, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा हॉस्पिटलच्या कोरोना विशेष वॉर्डमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचारास प्रारंभ झाला आणि 18 एप्रिल रोजी कराड तालुक्यातील पहिल्या असणाऱ्या तांबवे येथील कोरोनामुक्त रूग्णाला टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर कृष्णा हॉस्टिलटने यशस्वी उपचाराने कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांना, सन्मानपूर्वक डिस्चार्ज देण्याची मालिकाच सुरू केल्याने लोकांमधील कोरोनाबद्दलची भिती कमी होण्यास मदत झाली. आज 206 व्या कोरोनामुक्त रूग्णाला कृष्णा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला.
आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या रूग्णांमध्ये कराड तालुक्यातील केसे येथील 20 वर्षीय युवक, 50 वर्षीय महिला, 43 वर्षीय महिला, 20 वर्षीय युवती, 60 वर्षीय महिला, तुळसण येथील 40 वर्षीय महिला, 25 वर्षीय महिला, शिंदेवाडी-विंग येथील 42 वर्षीय महिला अशा एकूण 8 जणांचा समावेश आहे.
यावेळी कोरोनाची लढाई यशस्वीपणे जिंकलेल्या या कोरोनामुक्त रूग्णांना कराडचे पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिनगारे, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, वित्त अधिकारी पी. डी. जॉन, परीक्षा नियंत्रक डॉ. रजनी गावकर, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, डॉ. प्रणिता पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ प्रदान करण्यात आला.
कोरोनाग्रस्तांची अतिशय चांगली काळजी घेणारे सेंटर म्हणून कृष्णा हॉस्पिटल ओळखले जात असून, कोरोना संकट काळात कृष्णा हॉस्पिटलचे योगदान कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार कराडचे पोलीस उप अधीक्षक सुरज गुरव यांनी यावेळी काढले. याप्रसंगी डॉ. विनायक राजे, डॉ. व्ही. सी. पाटील, डॉ. संजय पाटील, रोहिणी बाबर यांच्यासह हॉस्पिटलचा अन्य स्टाफ उपस्थित होता.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.