विशेष प्रतिनिधी । जळगाव
महाराष्ट्राच्या राजकारणात ३ ऑक्टोबर २०१९ हा दिवस एकनाथ खडसेंच्या राजकारणाला चक्रव्युव्हात अडकवणारा दिवस म्हणून नोंदवला जाईल. ४० वर्ष भाजपसारख्या पक्षामध्ये आपलं सर्वस्व झोकून काम केल्यानंतर, महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या नेत्यांमध्ये गणना होऊनसुद्धा एकनाथ खडसेंना उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली तरी तिकीट देण्यात आलं नाही.
पक्षांतर केलेले पहिल्या यादीत नाव पटकावत असताना, आपल्यावर पक्षाचं प्रेम आहे असं मानणाऱ्या खडसेंनी कोणताही दगाफटका नको म्हणून तात्काळ आपल्या उमेदवारीचा फॉर्म अपक्ष म्हणून भरून ठेवला होता. ४ ऑकटोबर हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असतानाही भाजपने ३ तारखेपर्यंत पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याला ताटकळत ठेवलं. ३ तारखेच्या दुपारी “तुमच्या मुलीला तिकीट देण्याचा विचार सुरु आहे” असं आपल्याला सांगण्यात आल्याचं खडसे म्हणाले. रोहिणी खेवलकर-खडसे यांना पक्षातर्फे तिकीट मिळणार असल्याचं खडसे यांनी स्वतःच पत्रकार परिषदेत सांगितलं. गुरुवारी सकाळी गिरीश महाजनही एकनाथ खडसेंवर अन्याय होणार नाही असं बोलले होते. आज मात्र खडसेंच्या मुलीचं नाव पुढं करून अप्रत्यक्षरित्या “खडसे, तुम्ही आता थांबा” हे सांगण्याचा हेतू भाजपने साध्य केला आहे.
राज्यातील भाजपचा बहुजन चेहरा म्हणून एकनाथ खडसेंची ओळख आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देणारा स्वपक्षीय नेता या प्रतिमेतूनच मागील ३ वर्षांत नाथाभाऊंना सक्रिय राजकारणात दुय्यम लेखलं जाण्याचा प्रयत्न केला गेला. उत्तर महाराष्ट्रात दांडगा जनसंपर्क असणारा नेता अशी खडसेंची ओळख असताना त्या ठिकाणच्या गिरीश महाजन यांचं राजकीय वजन मुख्यमंत्र्यांनी मागील ५ वर्षांत वाढवलं आहे. पत्रकार परिषदेत उद्विग्न झालेल्या नाथाभाऊंनी “मी का नको, ते सांगितलं तर जास्त बरं होईल” असा भावनिक सवालही भारतीय जनता पक्षाला केला आहे. खडसेंना राज्याच्या राजकारणातून बाजूला सारून केंद्रात पाठवण्याचा प्रयत्न भाजपने मागेही करून पाहिला होता. राज्यसभेची उमेदवारी नाकारत खडसेंनी राज्यातच राहणं पसंत केलं होत. मागील काही दिवसांपासून खडसेंचं पक्षातील नेत्यांशी वागणंही फटकूनच होतं. एकूणच स्वपक्षीयांनी रचलेल्या चक्रव्युव्हात खडसे अडकले असंच म्हणावं लागेल.
दरम्यान आपल्याला तिकीट मिळालं नसलं तरी आपण भाजपचंच काम करणार असल्याचं खडसे म्हणाले. खडसेंचे समर्थक या घटनेने प्रचंड नाराज झाले असून भाजपमधून बाहेर पडण्याची विनंतीही खडसेंना कार्यकर्त्यांनी केली आहे. ४ ऑक्टोबरचा दिवस २०१९ विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने आयारामांवर प्रेम करणाऱ्या भाजपवर निष्ठा असणाऱ्यांची कसोटी पाहणारा असणार यात शंका नाही.
दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि विधानसभेच्या बातम्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra
इतर महत्वाच्या बातम्या –
आदित्य ठाकरेंच्या बँकेमध्ये १० कोटी रुपयांच्या ठेवी, प्रतिज्ञापत्रातून समोर आली संपत्तीची आकडेवारी
भाजपची तिसरी यादी जाहीर – अबतक १४३; खडसे, तावडे आणि बावनकुळेंवरील माया झाली पातळ
स्वतःच्या उमेदवारीबद्दल एकनाथ खडसेंनी केला मोठा गौप्यस्फोट
खडसेंना राष्ट्रवादीत घेण्याच्या हालचाली वाढल्या; अजित पवारांचा बीड दौरा अचानक रद्द
मनसेच्या नितिन नांदगावकरांचा शिवसेनेत प्रवेश