खासदार शरद पवारांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकणार्‍यांविरोधात गुन्हा दाखल

युवक प्रदेशाध्यक्ष शेख महेबूब यांनी केली सायबर क्राईमकडे तक्रार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्यावर मुंबई येथील रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली. या दरम्यान सोशल मीडियावर काही विकृत मनोवृत्तीच्या लोकांनी त्यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी सायबर क्राईमकडे नुकतीच तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार संबंधीताविरोधात गुन्हेही दाखल करण्यात आलेले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी कि, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना 29 मार्च रोजी पोटदुखीनंतर ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यानंतर पित्ताशयामध्ये समस्या उघडकीस आली. त्यामुळे डॉक्टरांनी ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला 31 मार्च रोजी ऑपरेशनसाठी वेळ दिला होता, परंतु मंगळवारी पोटदुखी सुरु झाल्याने त्यांना निर्धारित ऑपरेशनच्या एक दिवस आधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. या दरम्यान पवार यांच्या प्रकृती विषयी सर्व स्तरातून विचारपूस करण्यात येत आहे. तसेच समाजातील प्रत्येक घटकांतून त्यांच्याप्रती काळजीचे सूर बाहेर पडत आहेत. त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या जाता असताना दुसरीकडे काही विकृतांनी सोशल मीडियावर हीन दर्जाच्या पोस्ट्स केल्याचा प्रकार घडला.

खासदार शरद पवार यांच्या आजाराच्या कार्यकाळात काही विकृत मनोवृत्तीच्या लोकांनी फेक अकाऊंटद्वारे पवारांबाबत आक्षेपार्ह मॅसेज फॉरवर्ड केले. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष शेख महेबूब यांनी सायबर क्राईम ब्रांचचे एसपी शिंद्रे यांची भेट घेऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार कलम 153 अ, 505 (2), 500, 504, 469, 499, 507, 35 नुसार गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. महेबूब यांच्या समवेत कार्याध्यक्ष रविकांत वरपे, सुरज चव्हाण हे देखील उपस्थित होते.

You might also like