कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
मुलाची शाळेची फी भरण्यासाठी व्याजाने घेतलेले पैसे परत करूनही जादा व्याजाची रक्कम झाली आहे. अजून मुद्दल बाकी आहे असे म्हणून वारंवार पैशाची मागणी केल्याप्रकरणी विनापरवाना सावकारी व्यवसाय करणार्या एकावर कराड शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद आयाज गुलाब शेख (वय 33, रा. प्रकाशनगर, मंगळवार पेठ, कराड) यांनी दिली आहे. गणेश संजय वायदंडे (रा. बुधवार पेठ, कराड) असे गुन्हा नोंद झालेल्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी आयाज शेख यांनी फेब्रुवारी 2020 महिन्यात गणेश वायदंडे याच्याकडून मुलाच्या शाळेची फी भरण्याकरीता पैसे मागितले होते. त्यावेळी गणेश याने 100 रूपयांच्या स्टँपवरती काहीतरी लिहून घेऊन त्यावर फिर्यादीची सही घेऊन त्याची दुचाकी ताब्यात घेऊन त्याच्याकडून बँकेचे कोरे दोन चेक घेऊन फिर्यादीस 15 हजार रूपये दिले. परंतु गणेश याने सदर स्टँपवरती 15 हजार ऐवजी 20 हजार रूपये घेतले असे लिहले होते. त्यावेळी त्याने हे पैसे तुला 20 टक्के व्याजाने देत आहे असे सांगितले.
त्यानंतर फिर्यादीने जमेल तसे गणेशला थोडे थोडे पैसे दिले. मे महिन्यापर्यंत घेतलेले 15 हजार व व्याजाचे 5 हजार असे एकूण 20 हजार रूपये फिर्यादीने परत दिल्यानंतर तुझे पैसे जमेल तसे फेडत आलो आहे. मला माझी मोटार सायकल परत दे असे म्हणाला असता गणेशने तु आतापर्यंत घेतलेल्या रक्कमेचे व्याज दिले आहेस मुद्दल अजून बाकी आहे. घेतलेले 15 हजार रूपये परत दे असे म्हणाला.
त्यावेळी गणेश हा फिर्यादीकडून जादाचे पैसे मागू लागल्याने फिर्यादीने त्याबाबत माहिती घेतली असता तो विनापरवाना सावकारी करून लोकांना दिलेल्या पैशापेक्षा जादाचे पैसे मागणी करून वारंवार त्रास देऊन वसूल करत असल्याचे समजले. याबाबत आयाज शेख यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली असून विनापरवाना सावकारी व्यवसायप्रकरणी गणेश वायदंडेवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.