मुंबई । राज्याची खरीप हंगाम आढावा बैठक नुकतीच पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही ऑनलाईन बैठक झाली. राज्यात महात्मा जोतिबा फुले योजनेचा लाभ न मिळालेले ११ लाख १२ हजार शेतकरी आहेत. अशा शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पीक घेण्यासाठी नवे कर्ज देण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत सांगितले. तसेच कोरोना मुळे जगभरातील अन्नधान्याची गरज बदलणार असल्यामुळे त्यादृष्टीने पीक घेण्यात येईल याची आखणी करा असे त्यांनी कृषी विभागाला सांगितले.
राज्यात ३० लाख शेतकऱ्यांची यादी कर्जमुक्तीसाठी देण्यात आली होती. पैकी १९ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर साधारण १२ हजार कोटी रुपये मार्चपर्यंत जमा करण्यात आले होते. पण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता उपाययोजनांसाठी निधी वापरण्यात येतो आहे. त्यामुळे सरकारी तिजोरीची अवस्था ठीक नाही. त्यामुळे जवळपास ८ हजार १०० कोटी रुपयांची कर्जमाफी देता आली नाही. मात्र ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली नाही अशांना नवे कर्ज देण्यात येईल त्यांना दुर्लक्षित केले जाणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिली आहे. साधारण ४४ हजार कोटींच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे.
दरम्यान २० जूनपर्यंत कापूस, मका, तूर, हरभरा, ज्वारी, धानाची खरेदी खूप संथ गतीने सुरु असल्याने त्यांच्या खरेदीचा वेग वाढवा असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बैठकीत सांगितले. २० जूनपर्यंत कापसाची खरेदी पूर्ण झाली पाहिले असे ते म्हणाले. कोरोना विषाणूच्या संकटाचा सामना करत असताना कृषी क्षेत्र आपल्याला तारू शकेल असे त्यांनी सांगितले. राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता उद्योगधंदे सुरळीत होण्यास काही कालावधी जाण्याची शक्यता आहे. या धरतीवर आता शेती व्यवसायाला उभारी देता येऊ शकते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.