व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

राज्य मागासवर्गीय आयोगाची अवस्था “फुकटचं घावलं आणि गाव सारं धावलं” अशी केलीय; पडळकरांची वडेट्टीवारांवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारवर अनेक कारणांनी निशाणा साधला जातो. दरम्यान, आज पडळकरांनी राज्य मागासवर्ग आयोगाच्या मुद्यावरून मंत्री विजय वडेट्टीवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. “केवळ वाहवा मिळवण्यासाठी वडेट्टीवार व उपमुख्यमंत्री पवार यांनी ४५० कोटींची घोषणा केली आहे. वडेट्टीवारांनी तर टक्केवारीसाठी ‘फुकटचं घावलं आणि गाव सारं धावलं’अशी राज्य मागासवर्गीय आयोगाची अवस्था केली आहे,” अशी टीका पडळकरांनी केली आहे.

गोपीचंद पडळकर यांनी ट्विट करीत म्हटले आहे की, “ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार व अर्थमंत्री अजित पवार यांनी नुसती वाहवा मिळवत मागासवर्ग आयोगासाठी ४५० कोटींची घोषणा केली आहे. मात्र, यासाठी त्यांनी फक्त साडेचार कोटी दिले. पण ते खर्च करण्याचे आदेशही आयोगाला मिळाले नाहीत. ना ऑफिस ना पुर्णवेळ सचिव, आयोगाचे संशोधक सोलापूरात तर आयोग पुण्यात आहे. तर दुसरीकडे मंत्री वडेट्टीवारांनी टक्केवारीसाठी ‘फुकटचं घावलं आणि गाव सारं धावलं’अशी राज्य मागासवर्गीय आयोगाची अवस्था केली आहे.

यावेळी पडळकर पुढे म्हणाले की, “काही मंत्री नुसते ओबीसींच्या नावावर मंत्रीपद भूषवत आहेत. आणि त्यांच्याकडून प्रस्थापितांसाठी पोपटपंछी केली जात आहे. उद्या १७ जानेवारीला ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची सुनावणी आहे. या सुनावणी करिता ठाकरे सरकारने आयोगाला अंतिम अहवाल मागितला होता.

मात्र, इथे आयोगाचेच काम सुरू नाही झाले तर आयोग अहवाल कसा देणार? आणि म्हणूनच वडेट्टीवारांनी दिशाभूल करण्यासाठी घाई गडबडीने तीन महिन्याची मुदत न्यायालयाला मागणार, असे जाहीर केले. त्यामुळे या जनतेने आता ओबीसी मंत्र्यांना ते ज्या ठिकाणी भेटतील त्या ठिकाणी त्यांना गाठावे आणि त्यांना जाब विचारा, असे पडळकर यांनी म्हंटले.