मुंबई । संचारबंदीचे नियम हळूहळू शिथिल करून समाजजीवन पुन्हा सुरळीत सुरु करण्याचे प्रयत्न सरकार कडून केले जात आहेत. २ संचारबंदीनंतर सरकारने काही दुकाने उघडण्यास परवानगी दिली होती. यामध्ये वाईन शॉप चाही समावेश होता. मात्र वाईन शॉप वर लोकांनी अव्वाच्या सव्वा गर्दी केल्याने शासनाने हा निर्णय मागे घेतला होता. आता चौथ्या संचारबंदीनंतर पुन्हा एकदा हा मुद्दा समोर आला होता. मात्र वाईन शॉप उघडण्याची परवानगी दिली नसली तरी मद्य घरपोच देण्याची परवानगी मुंबईमध्ये देण्यात आली आहे. मुंबईच्या महापालिका आयुक्ता इकबालसिंग चहल ही माहिती दिली आहे.
वाईन शॉप उघडण्यास परवानगी दिल्यावर सामाजिक अलगाव चे पालन होत नसल्याचे दिसून आले आहे. मोठ्या प्रमाणात लोकांची झुंबड जमते, म्हणूनच सामाजिक सुरक्षेचा विचार करून मद्य घरपोच देण्याला परवानगी देण्यात आली असल्याचे चहल यांनी सांगितले आहे. पण ही विक्री करत असताना राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाने घालून दिलेल्या सर्व निर्बंधांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्याचबरोबर कंटेन्मेंट झोनमध्ये कोणत्याच प्रकारच्या विक्री सुविधा दिल्या जाणार नाहीत हेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान राज्यात सर्वाधिक कोरोना बाधित मुंबई मध्ये सापडले आहेत. मुंबईच्या काही भागांना पूर्णतः बंद करण्यात आले असून तिथे काटेकोरपणे संचारबंदीचे सर्व नियम पाळले जात आहेत. शासकीय यंत्रणा या सर्वांवर लक्ष ठेवून आहेत. पण हळूहळू समाजजीवन सुरळीत सुरु करण्यासाठी ज्या क्षेत्रांमध्ये संक्रमणाचा धोका नाही आहे आणि जिथे रुग्णसंख्या कमी आहे तिथे नियम शिथिल केले जात आहेत. पण सामाजिक अलगाव हा सर्वत्र पाळण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.