हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील पोलिसांनी एका मोठ्या हनीट्रॅप टोळीचा खुलासा केला आहे. बड्या उद्योगपतींची शिकार करणाऱ्या या टोळीतील तीन सदस्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. त्यापैकी दोन महिला आहेत. याप्रकरणी पोलिस आता अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 3 जून रोजी दिल्लीतील कृष्णानगर पोलिस ठाण्यात गांधी नगरच्या एका व्यावसायिकाविरूद्ध एका 19 वर्षीय मुलीने लैंगिक अत्याचाराची तक्रार केली होती. आपल्या तक्रारीत मुलीने एका 52 वर्षीय व्यक्तीवर नोकरी मिळण्याच्या नावाखाली तिचे शारीरिक शोषण केल्याचा आरोप केला होता. मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक देखील केली होती.
या प्रकरणाच्या तपासादरम्यान दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना शंका आली की, या प्रकरणात काहीतरी वावडे आहे. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एक पथक तयार केले आणि नव्याने तपासास सुरुवात केली. या तपासादरम्यान, मुलीने दिलेल्या निवेदनात बरेच विरोधाभास सापडले. तसेच तक्रार दाखल करणारी मुलगी ही आरोपीच्या मुलाकडून पैशाची मागणी करीत असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली. हे प्रकरण हनीट्रॅप टोळीशी संबंधित आहे, असा संशय पोलिसांना येऊ लागला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलीला तिच्या घरचा पत्ता आणि कुटुंबातील सदस्यांविषयी विचारले असता या मुलीने दुसऱ्याएका मुलीस आपली मोठी बहिण म्हणून सांगितले. मग पोलिसांनी दुसऱ्या मुलीकडे चौकशी केली असता तिने ही आपली बहीण नसल्याचे उघड केले. या दोन मुलींनी दुसऱ्या एका पुरुषासह मिळून गांधी नगर येथील व्यावसायिकाला लैंगिक प्रकरणात अडकवून पैशाची मागणी करण्याचा कट रचल्याचे या मुलीने उघड केले.
पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवला असता त्या मुलींनी आपली संपूर्ण योजना सांगितली. या मुलींच्या मते, गांधी नगरच्या व्यावसायिकाला तिचे नाव प्रिया असे सांगितले आणि दुसऱ्या मुलीची ओळख प्रियाची बहीण म्हणून केली, या दोघांनी मिळून त्या व्यावसायिकाला ट्रॅप करून 20 लाखांची मागणी केली आणि 5 लाखांची रक्कम आगाऊ म्हणून मागितली जेणेकरून ती न्यायालयात होस्टाइल होऊ शकेल.
पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी अशाप्रकारे हनीट्रॅपने बरीच रक्कम वसूल केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी आरोपी अफरोजसह 2 महिलांना अटक केली आहे. पोलिसांकडून आता आरोपींची खोलवर चौकशी केली जात आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.