सोलापूर प्रतिनिधी । शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सापडू लागल्यापासून आज सर्वाधिक सहा रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सोलापुरातील एकूण चाळीस जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मागील 24 तासात 28 जण नवीन कोरोना बाधित आढळल्याने सोलापुरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या एकूण 516 झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. आज मयत झालेल्या सहा व्यक्तींमध्ये पहिली व्यक्ती सांगोला तालुक्यातील पाचेगाव परिसरातील असून 64 वर्षांचे पुरुष आहेत. 18 मे रोजी दुपारी एक वाजता छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान 20 मे रोजी दुपारी साडेतीन वाजता त्यांचे निधन झाले.
कुर्बान हुसेन नगर परिसरातील 58 वर्षाच्या पुरुषाला 18 मे रोजी सातच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान 21 मे रोजी दुपारी चार वाजता त्यांचा मृत्यू झाला. तेलंगी पाछा पेठ परिसरातील 72 वर्षाच्या पुरुषाला 17 मे रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान 21 मे रोजी रात्री आठ वाजता त्यांचे निधन झाले आहे. सलगर वस्ती (देगाव रोड) परिसरातील 55 वर्षाच्या पुरुषाला 18 मे रोजी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान 20 मे रोजी रात्री साडेसात वाजता त्यांचे निधन झाले आहे. मराठा वस्ती (भवानी पेठ) परिसरातील 58 वर्षीय महिला उपचारासाठी 16 मे रोजी मार्कंडेय रुग्णालयात स्वतःच्या दाखल झाल्या होत्या. उपचारादरम्यान 20 मे रोजी त्यांचा मृत्यू झाला आहे. जुळे सोलापुरातील सिद्धेश्वर नगर परिसरातील 46 वर्षीय पुरुषाला 14 मे रोजी कुंभारी येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान 21 मे रोजी रात्री साडेनऊ वाजता त्यांचे निधन झाले आहे.
आज नव्याने आढळलेल्या 28 रुग्णांमध्ये नइ जिंदगी परिसरातील एक महिला, कुमठा नाका येथील एक पुरुष व एक महिला, निलम नगर येथील तीन पुरुष व सहा महिला, नइ जिंदगी येथील शोभादेवी नगर मधील एक महिला, बुधवार पेठ मिलिंदनगर येथील एक पुरुष, एमआयडीसीतील शिवशरण नगर मधील एक महिला, सातरस्ता येथील एक पुरुष, लोकमान्य नगर येथील तीन महिला, पुना नाका येथील एक पुरुष, मुरारजी पेठ येथील दोन पुरुष व एक महिला, जगदंबा नगर येथील एक पुरुष, हैदराबाद रोड येथील एक पुरुष, पंढरपूर तालुक्यातील उपरी येथील एक पुरुष, भवानी पेठेतील (मराठा वस्ती) येथील एक महिला, कर्णिक नगर येथील एक पुरुषाचा समावेश आहे. अद्यापही 159 रिपोर्ट प्रलंबित असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली. कोरोना मुक्त झालेल्या 14 जणांना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.