उद्धव ठाकरेंच्या माफिया सरकारचा अंत; फडणवीसांच्या भेटीनंतर सोमय्यांचे ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेना व राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आज भाजप नेते देवेंद्र फडणवीस याची भेट घेतली. यानंतर त्यांनी नुकतेच ट्विट केले असून ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. “अखेर उद्धव ठाकरे यांच्या माफिया सेनेचा अंत झाला आहे. आज मी देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांची भेट घेतली आहे, असे ट्विट सोमय्या यांनी केले आहे.

शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर वारंवार निशाणा साधण्याचे काम किरीट सोमय्या यांच्याकडून केले जाते. दरम्यान राज्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर आता सोमय्या यांनी देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांची मुंबईत फडणवीस यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यानंतर सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्या माफिया सेनेचा अंत झाल्याचे सूचक असे ट्विट केले.

सोमय्या यांनी केलेल्या ट्विटनंतर आता ठाकरे सरकार व शिवसेनेतील आमदार फोडण्यामागे भाजपचा हात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान आता नुकतेच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारमधून आपण बाहेर पडू पण त्यापूर्वी मुंबईत येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करावी, असे आवाहन केले आहे.