सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे ।
कोरोनाच्या संकटात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे नेते व पदाधिकारी नागरिकांना मदतीचा हात देत आहेत. मात्र सत्ता गेल्याचे पोटशूळ उठलेल्या भाजप पक्षाला आहे. आमदार गाडगीळ यांनी कोरोना संकटाच्या काळात किती गरजूंना अन्नछत्र सुरू केले? व्यापारपेठ सुरू करण्यासाठी काय प्रयत्न केले? ते स्वत: ‘क्वारंटाईन’ होते. त्यांच्यात हिम्मत असेल तर कोरोना संकटात कोणी काय काम केले हे एका व्यासपीठावर येऊन मांडावे, असे आव्हान कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी आमदार गाडगीळ यांना दिले. पृथ्वीराज पाटील म्हणाले, देशात भाजपचे सरकार आहे. परदेशातून येणाऱ्या नागरिकांवर बंदी घालावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी मार्च महिन्यात केली होती. तरी देखील परदेशी नागरिकांवर बंदी घातली नाही. विमानसेवा सुरू ठेवली. त्यामुळे देशात कोरोनाचा फैलाव झाला.
मुख्यमंत्र्यांचे राज्यात काम चांगले आहे. मात्र भाजपने महाविकास आघाडीच्या विरोधात शुक्रवारी आंदोलन पुकारले आहे. स्थानिक आमदार गाडगीळ यांनी महाविकास आघाडीवर टीका करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यामुळे त्यांना उत्तर देण्याची वेळ आता आली आहे. आज कोरोनाचे संकट आले असताना लोकप्रतिनिधींनी घरी न बसता रस्त्यावर उतरून काम करावे अशी नागरिकांची अपेक्षा असताना आमदार गाडगीळ जास्तीत जास्त क्वारंटाईनच राहिले आहेत. ‘ग्रीन झोन’ जाहीर झाल्यानंतर मात्र हॉस्पिटलला भेट देत माहिती घेण्याचे नाटक करत आहेत.
जिल्ह्यात रूग्ण सापडल्यानंतर लोकप्रतिनिधी म्हणून मिरजेतील रूग्णालयाला का त्यांनी भेट दिली नाही? असा सवाल पाटील यांनी केला. ते पुढे म्हणाले, महापालिकेत भाजपची सत्ता असताना त्यांचे नगरसेवक कोरोनाच्या संकटात कोठेच दिसत नाहीत. कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे नगरसेवक रस्त्यावर उतरून काम करत आहेत. जनतेच्या मदतीसाठी ते कोठेच दिसत नाहीत. राज्यातील सत्ता गेल्याचे त्यांना दु:ख झाल्याचे दिसून येते. त्यांनी कोठे अन्नछत्र उघडले नाही की पदरमोड केली नाही. चार गावात मदत केल्याचे केवळ सोपस्कार पार पाडले. स्वत:चे एक दुकान फक्त सुरू ठेवले होते, असा आरोप पृथ्वीराज पाटील यांनी केला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.