हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे आणि फडणवीस सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिल्यानंतर उद्धव ठाकरे गट अधिक आक्रमक झाला आहे. या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन वादळी होण्याची चिन्हं आहेत. आगामी निवडणुकीसाठी हे बजेट शिंदे-फडणवीस सरकारसाठी अत्यंत महत्वाचा मानलं जात आहे.
दरम्यान, विरोधकांनी काल सत्ताधाऱ्यांच्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. त्यामुळे आजपासून सुरू होणारे अधिवेशन अधिकच गाजणार आहे. शिंदे सरकारचं हे पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. या राज्य विधिमंडळ अधिवेशनात ठाकरे गट शिंदे सरकारची कशाप्रकारे अधिवेशनात कोंडी करतं याकडे पाहावं लागणार आहे.
काल चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्यानंतर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी, अर्थसंकल्पीय अधिवेशन शिंदे-फडणवीस सरकारला जड जाणार असा इशारा दिला आहे. त्यामुळे विरोधक यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन कोणत्या मुद्यावर गाजवतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.