मुंबई । भाजप नेत्यांच्या राजभवन वाऱ्या सुरूच असून आज भाजपच्या आणखी एका नेत्याने शिष्टमंडळासह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या नेत्याने मुंबईतील कोरोनाच्या गंभीर स्थितीकडे राज्यपालांचे लक्ष वेधले. हे नेते म्हणजे भाजपचे डॉ. किरीट सोमय्या. मुंबईतील रुग्णालयांमधून कोरोनाबाधित रुग्णांचे मृतदेह गायब केले जात आहेत, असा खळबळजनक दावा करत डॉ. किरीट सोमय्या यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे याबाबत चिंता व्यक्त केली. यावेळी गृह व आरोग्य सचिवांना या प्रश्नी लक्ष घालण्यास सांगणार, असे आश्वासन राज्यपालांनी दिल्याची माहिती सोमय्या यांनी दिली आहे.
किरीट सोमय्या यांनी मुंबई महापालिका रुग्णालयांच्या भोंगळ कारभाराचा फटका बसलेल्या पीडित कुटुंबातील सदस्यांसह राज्यपालांची भेट घेतली. अतुल भातखळकरही त्यांच्यासोबत होते. यावेळी सोमय्या यांनी मुंबईतील रुग्णालयांत करोना बाधित रुग्णांची कशी हेळसांड सुरू आहे, हे राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले. मुंबईत किमान अर्धा डझन करोना बाधित रुग्णांच्या बाबतीत धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
हे रुग्ण आधी बेपत्ता वा पळून गेल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर संबंधित रुग्णालयातच या रुग्णांचे मृतदेह आढळले. या रुग्णांवरील उपचाराचे बिलही नंतर नातेवाईकांना देण्यात आले. हा सारा प्रकार चिंताजनक असून याप्रश्नी आपण लक्ष घालावे व सरकारला योग्य त्या सूचना द्याव्या, अशी मागणी सोमय्या यांनी राज्यपालांकडे केली. याबाबत एक निवेदन सोमय्या यांनी राज्यपालांना दिले असून याप्रश्नी लक्ष घालण्याचे आश्वासन राज्यपालांनी दिले आहे.
अर्धा डझन कोरोना पेशंट, ज्यांना हॉस्पीटल नी गायब घोषित केले नंतर त्यांचा मृतदेह सापडला,अशा परिवाराची आज महाराष्ट्राचे राज्यपाल यांची भेट घालून दिली. गृह व आरोग्य सचिवांना ह्यात लक्ष घालण्याचे सांगणार, अशे त्यांनी सांगितले @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @ChDadaPatil @BhatkhalkarA pic.twitter.com/sBfzspbcvF
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) June 12, 2020
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in