मुंबई । केंद्र सरकारकडून 119 जणांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील सहा दिग्गजांचा समावेश आहे. परंतु राज्यातील ठाकरे सरकारने पद्म पुरस्कारांसाठी केंद्राकडे 98 मान्यवरांच्या नावांची शिफारस केली होती. पण, त्यातील केवळ ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्रीचा बहुमान मिळाला. शिवाय, सिंधुताईंना पद्मभूषण द्यावे, अशी शिफारस राज्याने केली होती. मात्र, त्यांना पद्मश्रीने गौरविले जाणार आहे.
राज्य सरकारने शिफारस केलेल्या नावांच्या यादीत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचंही नाव होतं. मात्र, केंद्राने केवळ एकाच नावाला पंसती दिली असून इतर 97 व्यक्तींना यंदा तरी पद्म पुरस्कारासाठी नाकारले आहे. संजय राऊत यांच्यासह विविध मान्यवरांचा या यादीत समावेश होता. टीम इंडियाचा कसोटी कर्णधार अजिंक्य राहणे, मसालाकिंग धनंजय दातार, प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी, लिटिल मास्टर सुनील गावसकर, एचडीएफसी बँकेचे अध्यक्ष दीपक पारेख यांचे नाव पद्मविभूषणसाठी पाठविले होते.
मात्र, महाराष्ट्रातून कोणालाही हा पुरस्कार मिळालेला नाही, तर सिंधुताई सपकाळ, ‘सिरम’चे अदर पूनावाला, प्रोफेशनल स्कायडायव्हर शीतल महाजन, अभिनेत्री माधुरी दीक्षित, अभिनेते मोहन आगाशे, कै. राजारामबापू पाटील व डॉ. मिलिंद कीर्तने यांची नावे पद्मभूषणसाठी गेल्या सप्टेंबरमध्येच केंद्राकडे पाठविण्यात आली होती. पद्मश्रीसाठी खा. संजय राऊत, यशवंतराव गडाख, डॉ. जगन्नाथ दीक्षित, मधुकर भावे यांच्यासह 88 नावांची शिफारस राज्याकडून केली गेली होती.
याशिवाय राजकीय क्षेत्रातील केवळ 2 ते 3 जणांची नावे सरकारने सूचवली होती, त्यामध्ये विद्यमान खासदार असलेले एकमेव नेते संजय राऊत आहेत. त्यांसोबतच, कै. राजारामबापू पाटील आणि यशवंतराव गडाख यांच्याही नावाचा समावेश होता. मात्र, केंद्राने राजकीय नेत्यांपैकी एकाही व्यक्तीची शिफारस मान्य केली नाही.
ठाकरे सरकारने शिफारस केलेल्या नावांची यादी
पद्मविभूषण
प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी
दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर
एचडीएफसी बँकेचे अध्यक्ष दीपक पारेख
पद्मभूषण
सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ,
‘सिरम’चे अदर पूनावाला
स्कायडायव्हर शीतल महाजन
अभिनेत्री माधुरी दीक्षित
अभिनेते मोहन आगाशे
पद्मश्री
लेखक मारुती चितमपल्ली
बालमोहन विद्यामंदिरचे शिवराम (दादासाहेब) रेगे (मरणोत्तर)
लेखक शं.ना. नवरे (मरणोत्तर)
सामाजिक कार्यकर्ते यशवंतराव गडाख
मसालाकिंग धनंजय दातार
कुस्तीपटू खाशाबा जाधव (मरणोत्तर)
नेमबाज अंजली भागवत
क्रिकेटपटू अजिंक्य राहाणे
क्रिकेटपटू स्मृती मानधना
जलतरणपटू वीरधवल खाडे
रंगभूमीकार अशोक हांडे
अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी
शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर टिकेकर
अभिनेता हृतिक रोशन
अभिनेता रणवीर सिंग
अभिनेता जॉनी लिवर
अभिनेता ऋषी कपूर (मरणोत्तर)
अभिनेत्री राणी मुखर्जी
अभिनेते विक्रम गोखले
अभिनेते अशोक सराफ
अभिनेते दिलीप प्रभावळकर
अभिनेता सुबोध भावे
अभिनेता मिलिंद गुणाजी
अभिनेत्री मुक्ता बर्वे
दिग्दर्शक नागराज मंजुळे
संगीतकार अशोक पत्की
संगीतकार अनिल मोहिले (मरणोत्तर)
संगीतकार अजय-अतुल
निवेदक सुधीर गाडगीळ
खासदार संजय राऊत
खासदार डॉ. अमोल कोल्हे
डॉ. जगन्नाथ दीक्षित
आहारतज्ज्ञ डॉ. ऋतुजा दिवेकर
बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’