मुंबई | गटारात पडून महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी घाटकोपर येथे आंदोलन करणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना पोलिसांनी अटक केली आहे. किरीट सोमय्या घाटकोपर येथे आंदोलन करत होते. महिलेच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सोमय्या यावेळी करत होते. याचदरम्यान पोलिसांसोबत सोमय्या यांची बाचाबाचीदेखील झाली. पोलिसांनी सोमय्या यांना ताब्यात घेतले असून घाटकोपर पोलीस ठाण्यात नेले आहे.
याआधी सोमय्या यांनी ट्विट करत दुपारी १२ वाजता घाटकोपरमध्ये चिराग नगर पोलीस स्टेशनबाहेर महिलेच्या कुटुंबासोबत ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती दिली होती. पोलिसांनी १२ दिवसांनंतर अद्यापही एफआयआर दाखल केला नसल्याचा आरोपही सोमय्या यांनी ट्विटरवरून केला होता.
"शितल दामा चा परिवाराला न्याय हवा" आज दुपारी १२ वाजता घाटकोपर पश्चिम चिराग नगर पोलिस स्टेशन चा बाहेर, शीतल चा परिवार सोबत मी धरणा/ ठिय्या आंदोलन करणार. पोलीसांनी १२ दिवसा नंतर ही एफ आय आर FIR ही रजिस्टर केला नाही @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil @mipravindarekar pic.twitter.com/GNKiQPfMoI
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) October 15, 2020
नेमकं काय आहे प्रकरण ?
घाटकोपरमधील असल्फा येथे राहणाऱ्या शीतल दामा या गिरणीवर पीठ आणण्यासाठी घरा बाहेर पडल्या होत्या. पण एक तास होऊन गेला तरी त्या घरी न परतल्याने कुटुंबाने शोधाशोध सुरू केली. त्यांच्या कुटुंबियांना त्यांनी पीठ आणण्यासाठी नेलेली पिशवी एका नाल्याजवळ दिसली. या नाल्यावरील काँक्रीटचे झाकण उचकलेले होते. शीतल घराबाहेर पडल्या तेव्हा बाहेर मुसळधार पाऊस पडत सुरू होता. मुसळधार पाऊस असल्याने त्या नाल्यात पडल्या आणि मृत्यू झाला असे सांगितले जात आहे. हाजीअलीजवळ त्यांचा मृतदेह आढळला असून पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.