नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या संघाचे नेतृत्व भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी करत आहे. त्याच्या टीममध्ये प्रमुख खेळाडू व दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर फॅफ ड्यू प्लेसिस याने त्याच्या आयुष्यातील सर्वात भीतीदायक घटना सांगितली आहे. त्याला व त्याच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याचा खुलासा त्याने केला आहे.
२०११च्या वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला ४९ धावांनी पराभूत केले होते. या सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला २२२ धावांचे आव्हान दिले होते. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ १७२ धावांवर गडगडला. हा सामना शेर ए बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. या सामन्यात फॅफ ड्यू प्लेसिसने ४३ चेंडूंत ३६ धावांची खेळी केली होती, परंतु तरीदेखील संघाला विजय मिळवता आला नाही. यानंतर फॅफ ड्यू प्लेसिस व त्याच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
काय म्हणाला फॅफ ड्यू प्लेसिस
”सामन्यानंतर मला व पत्नीला सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी दिली गेली होती. तो मॅसेज पाहून आम्ही दोघंही खूप घाबरलो होतो. काय करावं हेच सूचत नव्हते. यामध्ये अशा काही धमक्या होत्या, ज्या मी सांगूही शकत नाही. अशा घटनांनंतर तुम्ही लोकांप्रती अंतर्मुख होता आणि स्वतःभवती एक ढाल तयार करता. सर्व खेळाडूंना यातून जावेच लागते,” असे फॅफ ड्यू प्लेसिस म्हणाला.
त्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या २७.४ षटकांत ४ बाद १२१ धावा झाल्या होत्या. नॅथन मॅकक्युलनमने जेपी ड्युमिनिला बाद केल्यानंतर फॅफ ड्यू प्लेसिस फलंदाजीला आला. एबी डिव्हिलियर्स ३५ धावांवर धावबाद झाला त्यानंतर आफ्रिकेची अवस्था ३७.४ षटकांत ८ बाद १४६ अशी झाली होती. फॅफ ड्यू प्लेसिसने एक बाजू लावून धरली होती पण अखेर ४३व्या षटकात फॅफ बाद झाला आणि पुढे दक्षिण आफ्रिकेचा डाव पूर्णपणे गडगडला.