हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना आज तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्वाची बैठक बोलवली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने हालचाली वाढवण्यात आलेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्यांकडून मलिक यांच्या बाजूने असल्याचे सांगण्यात आले आहेत. दरम्यान थोड्याच वेळात मलिक यांच्या अटक प्रकरणी त्यांना कोर्टात अजर करण्यात आले असून युक्तिवादाला सुरुवात होणार आहे.
ईडीच्यावतीने नवाब मलिक यांची सकाळपासून चौकशी करण्यात आली होती. इक्बाल कासकर याने नाव घेतल्यानंतर नवाब मलिक यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. त्यानंतर आता ईडीने अटकेची कारवाई केली आहे. नवाब मलिक यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान मलिक यांना अटक झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी संवाद साधला. कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीनं दोघांमध्ये चर्चा झाली. आज सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित बैठक आयोजित करण्यात आली आहे.