NCP Crisis : शरद पवार हे राष्ट्रवादीचे सदस्य नाहीत, मग अध्यक्ष कसे होऊ शकतात? अजितदादा गटाचा मोठा दावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शरद पवार (Sharad Pawar) हे राष्ट्रवादीचे सदस्यच नाहीत, मग अध्यक्ष कसे होऊ शकतात? असा मोठा दावा अजित पवार गटाच्या (Ajit Pawar Group) वकिलांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी झालेल्या सुनावणीत अजित पवार गटाचे वकील विरेंद्र तुळजापूरकर यांनी केलेल्या या दाव्याने खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणी सदस्यांची निवड घटनेनुसार झालेली नसून, शरद पवारांसह प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नेमणूक निवडणूक न घेता झाली असं वकील तुळजापूरकर यांनी म्हंटल.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रतेच्या (NCP Crisis) सुनावणीत शरद पवार गटाच्या जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांची उलट तपासणी झाली तर दुसरीकडे अजितदादा गटाकडून सुनील तटकरे आणि अनिल पाटील यांची उलटतपासणी झाली. सलग दोन दिवस दोन्ही गटाच्या वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आला. शरद पवार हेच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा युक्तिवाद ॲड. जगतियानी यांनी केल्यानंतर अजित पवार गटाच्या वकिलांकडून पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली. बैठकीचे शरद पवार अध्यक्ष हाेते, त्यावेळी स्टेट कमिटीची निवडणूक करण्यात येणार होती. त्यानुसार सर्व नेत्यांना उपस्थित सुद्धा राहण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र त्यावेळी शरद पवारांनी निवडणूक न घेताच सगळ्यांची नेमणूक केली असा दावा अजित पवार गटाच्या वकिलांनी केला. पक्षात वाद असून कोणता गट खरा आणि कोणाला किती जणांचा पाठिंबा याचाही ताळमेळ नाही. मूळात पक्षाची समितीच केवळ कागदावर असल्याने जी व्यक्ती प्रदेशाध्यक्ष, खजिनदार असल्याचे सांगते, ती व्यक्ती सह्या कशी करू शकते? असा सवाल करत अजितदादा गटाच्या वकिलांनी जयंत पाटील यांच्या निवडीवर सुद्धा शंका उपस्थित केली.