“महाविकास आघाडी सरकारने आमच्या पिता पुत्रांविरोधात षडयंत्र रचले”; जामीनानंतर नितेश राणेंचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी दिशा सालियनबाबत काही विधाने केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान आज दिंडोशी न्यायालयात त्यांच्या जामीन अर्जावरती सुनावणी घेण्यात आली. यावेळी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. त्याबाबत आमदार नितेश राणे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली असून त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. दिशा सालियन प्रकरणी आम्हा पिता पुत्रांविरोधात महाविकास आघाडी सरकारने एक प्रकारचे षडयंत्र रचले,” अशी टीका राणे यांनी केली.

दिशा सलियन प्रकरणी दिंडोशी न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आल्यानंतर नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार विनाकारण आमच्या पिता पुत्रांविरोधात विरोधात षडयंत्र रचत आहेत. तसेच आम्हाला मुद्दाम त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहे. सरकारमधील कोणी तरी दिशा सॅलीयन प्रकरणात अडकला आहे. राज्यातीलही काही मंत्री या प्रकरणात अडकले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्याची आम्ही मागणी करणार आहोत.

आम्ही गप्पा बसणारे नाही. दिशा सॅलीयनला न्याय देण्यासाठी जे-जे करता येईल ते आम्ही करत राहणारच आहोत. मुंबईच्या महापौर त्यांच्या घरी गेल्यानंतर बऱ्याच हालचाली झाल्या आहेत. आता नवीन पोलिस कमिशनर आले आहेत. त्यांना सुध्दा यादी देण्यात आली आहे, त्यावर आता टिकमार्क करायचे काम सुरू आहे. एक गोष्टीचा प्रामुख्याने विचार करावा लागेल की, नऊ तास चौकशी करताना पोलीस अधिकाऱ्याला दर पंधरा पंधरा मिनिटांनी फोन येत होते. हे येणारे फोन कोणाचे होते याची देखील चौकशी व्हायला हवी, अशी मागणी राणे यांनी केली.