पुण्यातील भुशी डॅमसह जिल्ह्यातील इतर पर्यटनस्थळे बंदच राहणार – जिल्हाधिकारी 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । राज्यात आता मान्सूनचे वेध लागले आहेत. पुढच्या दोन तीन दिवसात पाऊस कोसळण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तविली आहे. संचारबंदीचे नियमही शिथिल करण्यात आले आहेत. अनेकांनी या सर्व परिस्थितीमुळे पर्यटन स्थळांना भेटी द्यायचे नियोजन केले असेल. सामाजिक अलगाव राखत जिल्ह्यातील डॅमना भेटी द्यायचे नागरिकांचे नियोजन यावेळी होऊ शकणार नाही. कारण तसे नियोजन करण्यासाठी जिल्ह्यातील कोणत्याच पर्यटनस्थळांना खुले करण्याची परवानगी अद्याप देण्यात आली नाही. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी हे स्पष्ट केले असून बंदी कायम ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

संचारबंदीचे नियम शिथिल करून जिल्ह्यातील आर्थिक व्यवहार हळूहळू सुरु करण्याचे काम प्रशासनाने सुरु केले आहे. मात्र सर्वच ठिकाणी सामाजिक अलगाव चे नियम बंधनकारक करण्यात आले आहेत. पुण्यात मावळ. मुळशी, हवेली, आंबेगाव, जुन्नर, भोर आणि वेल्हा या तालुक्यांमध्ये सर्वाधिक पाऊस पडत असतो. याठिकाणी विविध धरणे आहेत. जिल्ह्यात या ठिकाणी अनेक पर्यटन ठिकाणे, गड-किल्ले, आहेत. नागरिक दरवर्षी पावसाळ्यात येथे जाऊन पावसाचा आनंद घेत असतात. मात्र जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी यावर्षी अद्याप या स्थळांना खुले करण्यास मनाई केली आहे.

मुळशी तालुक्यात मुळशी धरण आणि ताम्हिणी घाट परिसर, हवेली तालुक्यात खडकवासला धरण, आंबेगाव तालुक्यात भीमाशंकर, जुन्नर तालुक्यातील माळशेज घाट, भोर तालुक्यातील भाटघर धरण, वेल्हा तालुक्यातील पानशेत धरण तसेच या सर्व ठिकाणचा निसर्ग अनुभवण्यासाठी नागरिक आतुर असतात. दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येथे येत असतात. यावर्षी कोरोना तसेच इतर कोणत्याच घटना घडू नयेत यासाठी ही खबरदारी घेण्यात आल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले. त्यामुळे यावर्षी वर्षापर्यटनाचा अनुभव पुण्यातील नागरिकांना घेता येणार नाही असेच दिसून येत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.