Saturday, December 27, 2025
Home Blog Page 2726

सत्तारांचा आशीर्वाद मिळाला तर 2024 मध्ये माझ्यासाठी ‘अच्छे दिन’

Abdul Sattar

औरंगाबाद – शिवसेना व एमआयएम हे राजकीय पक्ष कट्टर विरोधक आहेत. पण, शुक्रवारी महापालिकेच्या नेहरू भवन पुनर्विकास कार्यक्रमात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांचे कौतुक केले तर इम्तियाज जलील यांनी ‘सत्तार यांचे आशीर्वाद मिळाले तर, 2024 मध्ये माझ्यासाठी अच्छे दिन असतील’ असे वक्तव्य केल्याने कार्यक्रमाला उपस्थित नागरिक अवाक् झाले. महापालिकेने बुढीलेन येथील नेहरू भवनची जुनी इमारत पाडून भव्य व्यापारी संकुल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या कामाचे शुक्रवारी खासदार इम्तियाज जलील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. व्यासपीठावर राज्यमंत्री अब्दुल सत्तार, माजी महापौर नंदकुमार घोडेले, एमआयएमचे माजी गटनेता नासेर सिद्दिकी, माजी नगरसेवक जमीर कादरी, अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.

यावेळी सत्तार यांनी आपल्या शैलीत टोलेबाजी करत उपस्थितांमध्ये हशा पिकविला. ‘इम्तियाज जलील पढा लिखा अच्छा आदमी है. कहॉं किसका नाक दबाना, किसका मुँह खोलना, उनको अच्छी तरह मालूम है’!, लोकसभा निवडणुकीत ते लंगड्या घोडीवर बसून आले होते, तरीही ते जिंकले. त्यांच्याकडे विरोधी पक्षाचे लायसन्स आहे. माझ्याकडे सत्तेचे आहे, असे सत्तार म्हणाले. प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी शहरात केलेल्या विकासकामांचे त्यांनी कौतुक केले. एका हाताने ते आयुक्ताची तर दुसऱ्या हाताने प्रशासकाची सही करतात. त्यामुळे कामांची गती वाढली आहे.

इम्तियाज जलील म्हणाले, नेहरू भवनच्या नव्या इमारतीचे स्वप्न मी पाहिले होते. ते आता पूर्ण होत आहे. औरंगाबाद शहराच्या सौंदर्यात भर घालणारी ही इमारत असेल. कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. केंद्र शासनाकडून निधी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वंदे मातरम् सभागृह व हज हाऊसचे काम अंतिम टप्प्यात आहे. सत्तारांनी लक्ष घालून निधी उपलब्ध करून दिला तर लवकरच या दोन्ही सभागृहांचे लोकार्पण होईल. प्रशासक श्री. पांडेय यांनी स्मार्ट सिटीतून हाती घेतलेल्या कामांमुळे औरंगाबादसाठी अच्छे दिन आले आहेत. मौलाना आझाद संशोधन केंद्र व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राचे नूतनीकरण करण्याची मागणी त्यांनी केली. शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी प्रास्ताविक केले. 30 कोटी रुपये खर्च करून व्यापारी संकुल उभारले जाईल, असे त्यांनी नमूद केले. प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी मनोगत व्यक्त केले.

युध्दग्रस्त युक्रेनमध्ये सातारा जिल्ह्यातील 8 विद्यार्थी अडकले

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

युद्धग्रस्त युक्रेनमध्ये सातारा जिल्ह्यातील 8 विद्यार्थी अडकून पडले असल्याची माहिती समोर आली आहे. वैद्यकीय तसेच अभियांत्रिकी शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेलेल्या या विद्यार्थ्यांच्या पालकांसह मित्र व नातेवाईकांची झोप उडाली आहे. काल कराड तालुक्यातील विरवडे येथील आशिष वीर हा मायदेशी परतला आहे.

सध्या मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिक्षा अरबुणे (कराड), आशुतोष राजेंद्र भुजबळ, राधिका संजय वाघमारे, सौरभ बाळासाहेब जाधव (काळचौंडी, ता. माण), योगिनी संदीप यादव, सुभाष द्विवेदी (नवीन एमआयडीसी, सातारा), योगेश जयपाल महामुनी (वडूज, ता. खटाव), ओमकार जयसिंग शिंदे हे विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. यामध्ये अजूनही वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

रशिया-युक्रेन यांच्यातील वाढत्या तणावामुळे युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली होती. कालपासून प्रत्यक्ष युद्धालाच तोंड फुटल्याने पालकवर्गाची चिंता वाढली आहे. युक्रेनमध्ये कोणी असल्यास नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

मराठवाड्यातील 91 विद्यार्थी अडकले युक्रेनमध्ये

औरंगाबाद – रशियाने युक्रेनवर हल्ले सुरूच ठेवले आहे. त्यामुळे युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. त्यात मराठवाड्यातील 91 जणांचा समावेश आहे. ते भीतीच्या सावटाखाली आहेत. त्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने टोल फ्री क्रमांकासह मेल आयडी दिला आहे. विद्यार्थ्यांच्या मदतीसह पालकांच्या माहितीसाठी संबंधित जिल्ह्यांमध्ये मदत कक्ष सुरू केले आहेत.

जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती निवारण अधिकाऱ्याशी पालकांनी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी केले आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील सर्वाधिक 29 तर बीड जिल्ह्यातील सर्वात कमी 1 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकला आहे.

जिल्हानिहाय विद्यार्थी –
औरंगाबाद – 7
जालना – 7
बीड – 1
परभणी – 6
हिंगोली – 1
नांदेड – 29
लातूर – 28
उस्मानाबाद – 12

दारुड्याला पत्नीने घरात घेतले नाही; रात्री नशेत झोपला गाडीखाली अन्…

औरंगाबाद – खाजगी कंपनीच्या गाडीखाली झोपलेल्या कामगाराला चिरडल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता उघडकीस आली आहे. या प्रकरणात मुकुंदवाडी पोलिसांनी गाडीचालकाला ताब्यात घेतले असल्याची माहिती निरीक्षक ब्रह्मा गिरी यांनी दिली. रवी किशोर मगरे (30, ह.मु. नारळीबाग, मूळ गाव पळसवाडी, ता. खुलताबाद) असे मृताचे नाव आहे.

रवी हा मुकुंदवाडीतील झेंडा चौकासमोरील रस्त्याजवळ पार्क केलेल्या गाडीखाली झोपला होता. ती पाटील ट्रान्सपोर्टची गाडी (एमएच 20 डब्ल्यू 9491) होती. सकाळी कंपनीतील शिफ्ट चेंज होत असल्यामुळे कामगारांना आणण्यासाठी चालक गणेश शिवलाल राठोड (45, रा. जय भवानीनगर, गल्ली नंबर 11) याने गाडी सुरू करून घेऊन गेला. त्याच वेळी गाडीखाली झोपलेला रवी हा मागच्या टायरखाली आला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. सकाळी येणाऱ्या-जाणाऱ्यांना मृतदेह दिसल्यानंतर मुकुंदवाडी पोलिसांना कळविण्यात आले. मुकुंदवाडीचे निरीक्षक ब्रह्मा गिरी यांच्यासह गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी घटनास्थळी धाव घेतली.

घटनास्थळाचे बारकाईने निरीक्षण केल्यानंतर हा अपघात असावा, अशी शक्यता व्यक्त करुन त्या दृष्टीने तपासाला सुुरुवात केली. घटनास्थळापासून काही अंतरावर पाटील कंपनीच्या गाड्या पार्क करण्यात येत होत्या. त्यातील एका गाडीच्या चालक गणेश राठोड यास ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याने गाडी खाली झोपलेला असल्यामुळे माणूस दिसून आला नाही. सकाळी लवकर जायचे असल्यामुळे गाडी सुरु करून निघून गेलो. चाकाखाली आल्यानंतर कोणी तरी झोपलेले असल्याचे समजल्याची कबुली त्याने दिल्याची माहिती निरीक्षक गिरी यांनी दिली.

पत्नीने घरात घेतले नाही –
रवीला दारूचे प्रचंड व्यसन होते. त्याच्या व्यसनामुळे पत्नीने राजनगरातील माहेर गाठले होते. गुरुवारी रात्रीही तो दारु पिऊन पत्नी असलेल्या ठिकाणी गेला, तेव्हा त्यास घरात घेतले नाही. त्यामुळे तो पुण्याला जात असल्याचे सांगून निघून गेला. तेथून तो या वाहनाखाली येऊन झोपला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

पनवेलच्या वाघेज पावभाजी सेंटरमध्ये चोरी, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Raigad Crime

रायगड : हॅलो महाराष्ट्र – पनवेल शहरात सध्या चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या चोऱ्यांच्या घटनांमुळे दुकानदार आणि सर्वसामान्य लोक त्रस्त झाले आहेत. आता तर चक्क पावभाजी सेंटरमध्ये चोरी झाल्याची समोर आली आहे. पनवेल शहरातील वाघेज पावभाजी सेंटरमध्ये अज्ञात चोरट्यांनी हॉटेलमध्ये घुसून रोख रक्कमेसह इतर ऐवज चोरुन नेला आहे. वाघेज पावभाजी सेंटर हे बंद असल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करून तिथल्या गल्ल्यावर डल्ला मारला आहे. हि चोरीची घटना वाघेज पावभाजी सेंटरमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

सीसीटीव्ही फुटेज आले समोर
वाघेज पावभाजी सेंटरमध्ये झालेल्या चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने पोलिसांना चोरट्यांचा शोध घेणे सोपे जाणार आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने या चोरांचा शोध सुरू केला आहे. दुकानांमध्ये सीसीटीव्ही असूनसुद्धा चोरांची चोरी करण्याची हिंमत पाहून पोलिससुद्धा हैराण झाले आहेत. त्यामुळे या चोऱ्या थांबवण्याचे आणि या चोरांना पकडण्याचे आवाहन आता पोलिसांसमोर आहे.

https://twitter.com/Abhishekkaran16/status/1497206385934696450

चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ
या परिसरात छोट्या धंद्यांची संख्या मोठी आहे. अनेकजण दुकान बंद झाले तरी पैसे गल्ल्यातच ठेवतात. चोरांनी हेच हेरून ही चोरी केली आहे. गेल्या काही दिवसात वाढलेल्या चोरीच्या घटना पोलिसांची डोकेदुखी ठरत आहे. तसेच या चोरीच्या घटनांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे आता पोलीस या चोरांवर कशाप्रकारे अंकुश घालतात ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

कराड विमानतळाच्या आसपासच्या बांधकाम परवानग्यांचा प्रश्न मार्गी : आ. पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड विमानतळाच्या आसपास 20 किलोमीटरच्या परिघामध्ये कोणत्याही बांधकामावर बंदीच्या अनुषंगाने विमानतळ विकास प्राधिकरणाच्या जाचक अटी काढल्या जाव्यात व त्याचा कलर कोडेड झोनिंग नकाशा लवकरच प्रसिद्ध व्हावा यासाठी आज माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या समवेत कराडचे नगरसेवक व बांधकाम व्यावसायिक यांनी केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांची व भारतीय विमानपतन प्राधिकरणचे अध्यक्ष संजीव कुमार यांची भेट घेतली. यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या समवेत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा बांधकाम व्यावसायिक शिवराज मोरे, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, क्रिडाईचे तनय जाधव, कराडचे नगरसेवक राजेंद्र माने, इंद्रजीत गुजर, जावेद शेख, धनराज शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.

या चर्चेदरम्यान केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी तात्काळ महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना फोन करून कलर कोडेड नकाशा प्रसिद्ध करण्याच्या व त्यानुसार बांधकाम बाबतच्या अटी शिथिल कराव्यात असे आदेश दिले. त्यानुसार महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण विभागाला सूचना आल्या असून आदेशाची नवीन नियमावली सहित कलर कोडेड झोनिंग नकाशा ची त्वरित अंमलबजावणी केली जाणार आहे.

कराड व मलकापूर शहरासह आसपासच्या बांधकाम व्यावसायिकांना व नागरिकांना सुद्धा हा अत्यंत महत्वाचा विषय असून त्याचे निराकारण माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या पुढाकाराने झाले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांचा दिल्ली येथील २२ वर्षांचा अनुभव तसेच केंद्रीय मंत्री पदाचा अनुभव मुळे केंद्रातील मंत्र्यांशी व अधिकाऱ्यांशी सुकर चर्चा करून मार्ग काढण्यात यश आले.

गेल्या काही दिवसांपूर्वी विमानतळ प्राधिकरणाकडून महाराष्ट्रात सर्वत्र विमानतळाच्या परीघामधील 20 किलोमीटर आसपासच्या बांधकामावर बंदी घातली गेली होती. तो नियम कराड विमानतळाला सुद्धा लागू झाल्याने त्या अटींमध्ये शिथिलता व सुस्पष्टता यावी यासाठी कराडच्या बांधकाम व्यावसायिकांनी व क्रिडाईच्या प्रतिनिधींनी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन देत चर्चा केली. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी बांधकाम व्यावसायिकांचा विषय पूर्ण समजून घेऊन महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी फोनवरून व त्यानंतर प्रत्यक्ष मुंबईमध्ये चर्चा केली. तसेच केंद्रीय पातळीवर सुद्धा प्रयत्न करीत मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांच्यासमवेत केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया व या विभागाचे सचिव संजीव कुमार यांच्याशी चर्चा करून कराड शहराच्या विमानतळाबाबत योग्य ती माहिती देत वस्तुस्तिथी मांडली व जाचक अटी शिथिल करण्याची मागणी केली. त्यानंतरही महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांशी पृथ्वीराज चव्हाण यांनी चर्चा केली त्याप्रमाणे महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी कलर कोडेड झोनिंग नकाशा तयार करून मान्यतेसाठी केंद्रीय विभागाला पाठविला होता. तोच नकाशा तात्काळ प्रसिद्ध व्हावा यासाठी आज माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी बांधकाम व्यावसायिक यांच्यासमवेत केंद्रीय मंत्री व सचिवांची भेट घेऊन चर्चा केली.

गेल्या चार महिन्यापासून विमानतळ प्राधिकरणाच्या निर्बंधांमुळे कराड परिसरातील बांधकाम ठप्प आहेत, त्यांना लवकरात लवकर गती मिळण्यासाठी व शहराच्या विकासासाठी विमानतळ प्राधिकरणाने कलर कोडेड झोनिंग नकाशा प्रसिद्ध करावा अशी मागणी यावेळी चर्चेदरम्यान पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. त्यानुसार तात्काळ या मागणीचा विचार केंद्रीय मंत्र्यांनी कलर कोडेड झोनिंग नकाशाला परवानगी देत, अटींमध्ये सुस्पष्टता व शिथिलता आणून नवीन नियमावली जाहीर करण्याचे आदेश महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाला दिले असून त्याची अंमलबजावणी संबंधित विभागाकडून झाली आहे, यामुळे बांधकाम व्यावसायिक व नागरिकांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे.

ज्याच्याकडे न्यायासाठी गेली त्यानेच केला अन्याय, आरोपीने पिडीतेसोबत केले ‘हे’ कृत्य

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यातील दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका वकिलाने न्याय मिळवून देण्याच्या बहाण्याने एका महिलेसोबत दुष्कृत्य केले आहे. या आरोपी वकिलाने न्यायालयातील सर्व खटले चालवून न्याय मिळवून देतो असे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केले. हा आरोपी नराधम वकील मागील नऊ वर्षांपासून पीडित महिलेचे लैंगिक शोषण करत होता. अखेर शेवटी आरोपीच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने आरोपी विरोधात दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी लैंगिक शोषणासह अन्य कलमाअंतर्गत आरोपी वकिलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नंदकुमार डिकोजी पाटील असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी वकिलाचे नाव आहे. तो पुण्यातील विजयनगर कॉलनी परिसरातील रिमझिम बंगल्यातील रहिवासी आहे. या नराधम वकिलाच्या विरोधात 38 वर्षीय पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. हा धक्कादायक प्रकार 2013 पासून सुरू होता असे पीडित महिलेने आपल्या तक्रारीत म्हंटले आहे.

काय आहे प्रकरण ?
गेल्या काही वर्षांपासून फिर्यादी महिला आणि तिच्या पतीमध्ये घरगुती कारणावरून वाद सुरू होता. पतीसोबत वाद झाल्यापासून फिर्यादी महिला एकटी राहत होती. तिला कुणाचाही आधार नव्हता. अशात पतीसोबतच्या वादात न्याय मिळावा म्हणून या महिलेने न्यायालयात काही खटले दाखल केले होते. संबंधित सर्व खटले न्यायालयात लढून न्याय मिळवून देतो, असं आमिष आरोपी वकिल नंदकुमार पाटील याने या महिलेला दाखवले होते. त्यानंतर आरोपीनं न्याय मिळवून देण्याच्या नावाखाली पीडित महिलेवर अनेकदा जबरदस्तीने अत्याचार केले. मागच्या 9 वर्षांपासून हा सगळा प्रकार सुरु होता. त्यामुळे अखेर त्रास सहन न झाल्याने पीडितेने दत्तवाडी पोलिसांत आरोपी वकिलांविरोधात गुन्हा दाखल केला. दत्तवाडी पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

घाटीतील रिक्त पदे भरती बाबत शपथपत्र द्या; खंडपीठाचे आदेश

Aurangabad Beatch mumbai high court

औरंगाबाद – महाराष्ट्रातील रिक्त वैद्यकीय पदे भरतीसंदर्भातील वस्तुस्थिती आणि खासदार इम्तियाज जलील यांनी 14 जून 2019 रोजी सादर केलेल्या अतिरिक्त शपथपत्रात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यातील नमूद केलेल्या विविध समस्यांबाबत दोन आठवड्यात शपथपत्र दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती एस.जी. डिघे यांनी काल दिले.

उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर सुद्धा वैद्यकीय पदे रिक्तच असल्याबद्दल घाटी रुग्णालयात बद्दल खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. तसेच खासदार जलील यांनी दाखल केलेली जनहित याचिका ॲडव्हर्सरियल नाही, शासनाने त्याचा तसा विचार करू नये, असे स्पष्ट केले. पुढील सुनावणी दोन आठवड्यानंतर होणार आहे. सुनावणीदरम्यान खासदार जलील यांनी 14 जून 2019 रोजी दाखल केलेल्या अतिरिक्त शपथपत्रातील 13 मुद्द्यांवर घाटीच्या प्रशासनाने आजपर्यंत कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण अथवा खुलासा केल्याने असल्याचे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले व सर्व मुद्दे वाचून दाखवले.

खासदार जलील यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रिक्त वैद्यकीय पदे भरती संदर्भात एप्रिल 2019 ला दाखल केलेल्या जनहित याचिकेला उच्च न्यायालयाने औरंगाबाद पुरते सीमित न ठेवता संपूर्ण राज्यातील रिक्त पदांसंदर्भात कारवाई करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिले होते. उच्च न्यायालयाने दिनांक 7 मे 2019 रोजी आदेश दिल्यानंतर सुद्धा कोणत्याही संवर्गातील रिक्त पदे शासनाने भरली नसल्याचे खासदार जलील यांनी निदर्शनास आणून दिले. शासनातर्फे ॲड. एस.बी. यावलकर यांनी काम पाहिले.

‘या’ कारणामुळे मनसेच्या पदाधिकाऱ्याला भाजपकडून मारहाण

Buldhana Crime

बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा संघर्ष पेटला असताना बुलडाण्यात मात्र भाजप विरुद्ध मनसे संघर्ष पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी अजय खरपास यांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याच्या कारणावरून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बेदम मारहाण केली होती. या मारहाणीप्रकरणी चिखली पोलीस स्टेशनमध्ये सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप या आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. यामुळे या आरोपींच्या अटकेसाठी आज पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत पोलिसांना निवेदन देण्यात आले. राज्यात आगामी नगरपंचायती आणि जल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे सध्या जोरदार तयारी करत आहेत. खळखट्याक अशी ओळख असणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यालाच मारहाण झाल्याने राजकीय वर्तुळात याची चर्चा रंगू लागली आहे.

मनसेचा पोलीस स्टेशनवर मोर्चा
बुलडाणा जिल्ह्यातील चिखलीचे मनसेचे शहर सचिव अजय खरपास यांना भाजप पदाधिकाऱ्यांकडून मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांनी पत्रकार परिषद घेऊन दोन दिवसात आरोपींना अटक करा , अन्यथा आम्ही आंदोलनाचा मार्ग पत्करू असा इशारा दिला होता. मात्र तरीदेखील पोलिसांनी अद्याप त्यांना अटक केली नव्हती. यामुळे जखमी अजय खरपास यांचे नातेवाईक सह धनवट समाजाने एकत्रित येत चिखली पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदारासह पोलीसाना निवेदन देत आरोपींना तात्काळ अटक करा अशी मागणी केली आहे. आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे.

भाजप पदाधिकाऱ्यांना प्रकरण भोवणार?
काही दिवसांनी राज्यात महानगरपालिका, नगरपंचायती आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सध्या राज्यभर दौरे सुरु आहेत. भाजपसुद्धा या निवडुकीत पूर्ण तयारीनिशी उतरले आहे. स्थानिक लेव्हलच्या निवडणुका या प्रतिष्ठेच्या मानल्या जातात. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचे या निवडणुकांकडे लक्ष असते. या निवडणुका तोंडावर आल्या असताना मनसे आणि भाजपमधील संघर्ष मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मनसे पदाधिकाऱ्याच्या पोस्टवर आक्रमक होत भाजप कार्यकर्त्यांनी केलेली ही मारहाण आता भाजप पदाधिकाऱ्यांना चांगलीच महागात पडणार आहे. त्यामुळे या प्रकरणाचा निवडणुकीवर काय परिणाम होतो ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

नगरसेवकाकडून बीड जिल्हाधिकारी कार्यालयात गोळीबार

Beed Crime

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीड शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयात गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये रजिस्ट्री ऑफिसमध्ये एका नगरसेवकाने आपल्या काही साथीदारांच्या मदतीने दोघांना काठीने आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत त्यांच्यावर गोळीबारसुद्धा केला आहे. या गोळीबारात दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या गोळीबारानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

काय आहे नेमके प्रकरण ?
आज सकाळी अकराच्या सुमारास बीड जिल्हाधिकारी कार्यालयातील रजिस्ट्री ऑफिसमध्ये काही जणांमध्ये जमिनीवरून वाद सुरु होता. या ठिकाणी मोठ्या आवाजात बाचाबाची सुरू असल्याने अनेक आसपासच्या नागरिकांनी याठिकाणी गर्दी केली. यानंतर हा वाद एवढा विकोपाला गेला कि बीडमधील एका नगरसेवकाने आपल्या काही साथीदारांच्या मदतीने दोन जणांना काठी आणि लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

यादरम्यान आजूबाजूच्या नागरिकांनी भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला. पण संतापलेल्या नगरसेवकाने आणि त्यांच्या साथीदारांनी सतीश क्षीरसागर आणि फारुक सिद्दीकी या दोघांवर गोळीबार केला. यामध्ये सतीश क्षीरसागर यांच्या पायाला गोळी लागली असून खोलवर जखम झाली आहे. तर फारुक सिद्दीकी यांच्या पायाला गोळी चाटून गेली असून तेही या घटनेत जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यानंतर दोन्ही जखमींना बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. बीड पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.