Saturday, December 27, 2025
Home Blog Page 2725

डॉक्टर युवतीशी लगट; 48 तासांत दोषारोपपत्र दाखल

Crime

औरंगाबाद – शासकीय कर्करोग रुग्णालयात दाखल एका महिलेवर निवासी डॉक्टर युवतीने उपचार केले. त्या महिलेचे निधन झाल्यानंतर तिचा पती 9 फेब्रुवारीपासून दररोज हॉस्पिटलमध्ये येऊन उपचार करणाऱ्या डॉक्टर सोबत लगट करण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या विरोधात डॉक्टर युवतीने 23 फेब्रुवारी रोजी केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदवला होता.

या गुन्ह्याचा तपास 24 तासात पूर्ण करत 48 तासात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी दिली. सिटी चौक पोलिसांनी आरोपी कन्हैया वसंतराव टाक यास ताब्यात घेतले. या गुन्ह्याचा तपास पोलिस नाईक सरिता भोपळे यांच्याकडे दिला होता. त्यांनी तपास 24 तासांत पूर्ण केला.

ही कामगिरी वरिष्ठ निरीक्षक अशोक गिरी, हवालदार सय्यद शकील, अंमलदार अभिजीत गायकवाड यांच्या पथकाने केली.

भाजपसोबत युती करणार का? उद्धव ठाकरेंनी दिले ‘हे’ उत्तर

uddhav thackeray fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपसोबत 25 वर्षांची युती तोडून शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. त्यातच गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमधील वाद विकोपाला गेला आहे. याच दरम्यान, आगामी काळात भाजपसोबत पुन्हा एकदा युती करणार का असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला असता त्यांनी उत्तर देतानाच भाजपवर जोरदार टीका केली.

उद्धव ठाकरे ‘लोकसत्ता’च्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळी भाजपसोबत युतीबाबत विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले, आधी ते ज्या पद्धतीने चालले आहेत, ते सुधारणार आहेत का? हा प्रश्न आहे. सुरुवातीच्या काळात आमची युती वैचारिक पातळीवर झाली होती. पण आता वैचारिक पातळी कुठे पाताळात गेलीये की काय तेच कळत नाही. कुणाबरोबरही युती करायची असं चाललंय. याबाबत मग त्यांचाच कित्ता आम्ही गिरवला, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

सगळं आम्हालाच पाहिजे ही वाईट वृत्ती मग आम्ही काय धुणी-भांडी करण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली नसल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांनी भाजपवर निशाणा साधला. त्यासोबतच मुख्यमंत्र्यांनी तपास यंत्रणांवरही खोचक शब्दांत टीका केली.दरम्यान, महाराष्ट्राला बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू आहे. बंगाल आणि महाराष्ट्र सोडला तर इतर राज्यात तपास यंत्रणांना काम नाही का?, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला आहे.

ते पुढे म्हणाले, पुढच्या आठवड्यात अधिवेशन सुरू होत आहे. ते झाल्यावर पुन्हा मंत्रालयात काम सुरू करणार आहे. अधिवेशनातही मी जाणार आहे. अनेकांचा मी पुन्हा येईन यावर विश्वास नव्हता. पहिल्या वर्षी आल्यानंतर पुढच्या वर्षी येईन का असे वाटले नव्हते. पुन्हा येईन असे बोलून न येणे यापेक्षा हे बरे, असा टोला उद्धव ठाकरेंनी फडणवीस यांना नाव न घेता लगावला.

कराड येथील एसटी चालकाचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू : विलीनीकरणाच्या लढ्यातील कर्मचारी

कराड | कराड एसटी आगारातील उपोषणात सहभागी एका बस चालकाचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील आटके येथील बाळकृष्ण बापूसो पाटील (वय- 42) यांचा हदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. एसटी बस कर्मचाऱ्यांच्या संपात चालक सहभागी होते, त्यामुळे विलीनीकरणाच्या मुद्यावरून निर्णय होत नसल्याने चिंतेत होते.

मिळालेली माहिती अशी, कराड आगारातील बस चालक बाळासाहेब पाटील यांना आज शनिवारी दि. 26 रोजी पहाटे हदयविकाराचा झटका आला. त्यांना कृष्णा हाॅस्पीटल येथे उपचासाठी आणण्यात आले. मात्र त्यांचा झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच कराड बस आगारातील कर्मचाऱ्यांनी कृष्णा हाॅस्पीटलकडे धाव घेतली.

कराड आगारात बाळासाहेब पाटी यांनी जवळपास 18 वर्षे सेवा बजावली आहे. गेल्या 110 दिवसापासून सुरू असलेल्या विलीनीकरणाच्या लढ्यात ते सहभागी होते. गेल्या काही दिवसापासून ते अर्थिक विवंचनेत असल्याचे काही सहकाऱ्यांनी सांगितले. आपल्यातील चालकाचा अचानक मृत्यू झाल्याने कर्मचाऱ्यांच्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व आई- वडिल असा परिवार आहे.

युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना घरी आणण्यासंदर्भात अजित पवारांनी दिली ‘हि’ महत्वाची माहिती

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या रशिया व युक्रेन या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. भारतीय विद्यार्थी- नागरिकांना युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना आज मायदेशी आणले जाणार आहे. या संदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाचे विधान केले आहे. “366 भारतीय विद्यार्थ्यांची नोंद आमच्याकडे झाली आहे. त्यातील 32 जण आज मायदेशी परततील. 1 वाजून 40 मिनिटांनी 240 विद्यार्थी मायदेशी परतणार आहेत. त्या विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी आम्ही सर्व व्यवस्था करत आहोत, असे पवार यांनी सांगितले.

अजित पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, रशियानेच युक्रेनवर हल्ला केला आहे आहे. किती दिवस जिवंत राहील हे सांगता येणार नाही हे युक्रेनच्या राष्ट्रपतींनी सांगितलं आहे. भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. 366 विद्यार्थ्यांची नोंद आमच्याकडे झाली आहे. त्यातील 32 जण आज मायदेशी परततील. त्या विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी आम्ही सर्व व्यवस्था करत आहोत. राज्य सरकारकडून युक्रेनमधील अडकलेल्या विधार्थ्याची दंगल घेण्यात आलेली आहे. अजूनही कोणी विद्यार्थी अडकले आहेत का? याची माहिती घेतली जात आहे.

दरम्यान युक्रेनमध्ये अडकलेल्या विध्यार्थ्यांना परत मायदेशी आणण्यासाठी गेलेले एअर इंडियाचे विशेष विमान रोमची राजधानी बुखारेस्टमध्ये पोहोचले आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांना रोम मार्गे भारतात आणण्यात येणार आहे.

साडेनऊ कोटींच्या निविदेत गडबड? निविदा प्रक्रिया पुन्हा राबविण्याची मागणी

औरंगाबाद – राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाची दूध डेरी परिसरात साडेनऊ कोटी रुपयांतून इमारत बांधण्यात येणार आहे. यात कार्यालय आणि दोन निवासी क्वार्टर्सचा समावेश असून या कामासाठी मागवण्यात आलेल्या निविदेत गडबड असल्याचा आरोप कंत्राटदारांनी सुरू केला आहे. आज कंत्राटदारांचे शिष्टमंडळ बांधकाम विभागांच्या सचिवांची भेट घेऊन पुन्हा निविदा मागवण्याची मागणी करणार आहेत.

21 फेब्रुवारी रोजी निविदा घेण्यास टाळाटाळ केल्यामुळे एका कंत्राटदाराने मुख्य अभियंत्यांच्या दालनात अंगावर रॉकेल ओतून घेतले. त्यानंतर तीन दिवसांनी साडेनऊ कोटींच्या निविदा वरून बांधकाम विभाग विरुद्ध कंत्राटदार असे चित्र निर्माण झाले आहे. हा सगळा प्रकार विभागातील कामकाजावर अविश्वास दर्शवणारा दिसतो. वर्क ऑर्डर देण्यापूर्वी या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी बांधकाम सचिवांना आज कंत्राटदार भेटून निवेदन देणार आहेत.

हायटेक इन्फ्रास्ट्रक्चर, वंडर कन्स्ट्रक्शन्स, एन.के. कन्स्ट्रक्शन्स, ख्वाजा मिस्त्री, के.के. थोरात, के.एच. कन्स्ट्रक्शन, अमन कन्स्ट्रक्शन, निर्मिती कन्स्ट्रक्शन, स्टार कन्स्ट्रक्शन्स आदींचे टेंडर या कामासाठी आले होते.

साताऱ्यात सर्व तालुक्यासाठी राष्ट्रीय लोकअदालतीचे 12 मार्चला आयोजन

Crime

सातारा | सातारा मुख्यालयात आणि जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात दि. 12 मार्च 2022 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सातारा जिल्हा न्यायालयात लोकअदालतीचे उद्घाटन सातारा जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एम.जे.धोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तृप्ती जाधव यांनी कळविले आहे.

या लोक अदालतीत धनादेश न वटलेली प्रकरणे, वादपूर्व प्रकरणे, मोटार अपघात दावे, थकीत कर्जाची प्रकरणे, वैवाहिक वाद, थकीत ग्रामपंचायतीची मालमत्ता कर व पाणी बिलाची प्रकरणे इ. सर्व प्रकरणांचा समावेश आहे. येत्या लोकअदालतीमध्ये न्यायाधीश, विधीज्ञ, सरकारी वकील इ. तडजोड घडवून आणण्यासाठी पक्षाकरीता मार्गदर्शन व सहकार्य करणार आहेत.

तरी सर्व पक्षकारांनी जास्तीत जास्त संख्येने संबंधित न्यायालयात सकाळी 10.30 वा. उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तृप्ती जाधव आणि जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲङ सुखदेव पाटील यांनी केले आहे.

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ; मुंबईतील शाळा आता ‘या’ तारखेपासून पूर्णवेळ भरणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्य सरकारच्यावतीने आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे शाळा अणे महाविद्यालये सुरु करण्यात आलेली आहेत. दरम्यान, आता पूर्णवेळ शाळा सुरु करण्यासंदर्भात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी महत्वाचे विधान केले आहे. आता मुंबईतील शाळा दोन मार्चपासून पूर्ण क्षमतेने सुरु होणार आहेत. पहिली ते बारावीचे वर्ग पूर्णवेळ भरणार असल्याची माहिती मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मुंबईतील कोरोनाचा प्रभाव कमी झाला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन पूर्णवेळ शाळा सुरु करण्याचा मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी निर्णय घेतला आहे.

नुक्त्याच घेतलेल्या या निर्णयामुळे आता विशेष व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळा व मैदानी खेळ, विविध शैक्षणिक उपक्रम सुरू करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. याबाबतचे पत्रक मुंबई महापालिकेच्या वतीने जारी करण्यात आलेले आहे. त्यामुळे तब्बल दोन वर्षांनी मुंबईत पुन्हा एकदा शाळा भरणार आहेत.

रशियाविरोधात निषेध प्रस्तावावर भारताने मांडली ‘ही’ भूमिका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या 2 दिवसांपासून रशिया आणि युक्रेन मध्ये युद्ध सुरू असून हे युद्ध थांबवण्यासाठी आणि रशियन सैन्याला माघारी बोलावण्याच्या प्रस्तावावर संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत मध्यरात्री मतदान पार पडलं. यावेळी भारताने रशियाला विरोध न करता पुन्हा एकदा तटस्थ भूमिका घेतली आहे. भारताने मतदान केलं नसलं तरी हिंसेचा भारताने विरोध केला आहे. युक्रेनमधील परिस्थितीमुळे चिंतेत असल्याचे भारताने म्हटलं आहे.

यावेळी रशियानं प्रस्तावावर व्हिटो पॉवर वापरली. सुरक्षा परिषदेत ५ स्थायी सदस्यांमध्ये रशियाचा समावेश आहे. तर भारत, चीन आणि यूएईनं हल्ल्याचा निषेध करत मतदानात भाग घेण्याची भूमिका घेतली. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत यूक्रेनवरील हल्ल्याचा निषेध करणारा प्रस्ताव मांडला. त्यात १५ पैकी ११ देशांनी मतदान केले. तर रशियाने प्रस्तावाविरोधात व्हिटो पॉवरचा वापर केला. यावेळी भारताने तटस्थ भूमिका घेतली.

यावेळी, अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांनी भारताकडे मदत मागितली होती. मात्र भारताने तटस्थ भूमिका घेतल्याने अमेरिका नाराज होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे नाटोकडूनंही युक्रेनला थेट लष्करी मदत मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे रशिया-युक्रेन युद्धात युक्रेन सध्या एकटं पडल्याचं पाहायला मिळत आहे.

“महाराष्ट्र म्हणजे केवळ आपली ‘जहांगीरी’ या भ्रमातून बाहेर येण्याची आवश्यकता”; प्रवीण दरेकरांचा पलटवार

Darekar and Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल भाजपवर हल्लाबोल केला. भाजपसोबतच्या युती संबंधी त्यांनी अनेक महत्वाची विधानेही केली. यावेळी त्यांनी भाजपला टोलाही लगावला. यावरून भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांवर पलटवार केला आहे. “महाराष्ट्र म्हणजे केवळ आपली ‘जहांगीरी’ या भ्रमातून बाहेर येण्याची आवश्यकता आहे, असे दरेकर यांनी म्हंटले आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भाजपवरील टीकेनंतर आता भाजप नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला जात आहे. दरम्यान भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी ट्विट करीत पलटवार केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, महाराष्ट्र म्हणजे केवळ आपली ‘जहांगीरी’ या भ्रमातून बाहेर येण्याची आवश्यकता आहे. आम्हीही महाराष्ट्राचे आहोत, सर्व पक्ष महाराष्ट्राची काळजी घेणारे आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा याची काळजी भाजपलासुद्धा आहे.

 

दिवस हे सगळ्यांचे येत असतात. त्यातून सोने करायचे कि माती हे खरं आहे ठरवायचे असते. पंचवीस वर्षे मुंबई महापालिकेची सेवा करण्याची संधी मिळाली. मात्र, आज खऱ्या अर्थाने त्याची सेवा करून सोने केले कि माती याचे उत्तर मिळणे आवश्यक आहे, असे दरेकर यांनी मांडली.

शिखंडीप्रमाणे युद्धात उतरण्यापेक्षा….; शिवसेनेचा भाजपवर टिकेचा बाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजप कडून जाणूनबुजून केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करून सरकारमधील मंत्र्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप सत्ताधाऱ्याकडून करण्यात येतो. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिखंडी सारखे युद्धात उतरण्यापेक्षा आमने सामने येऊन युद्ध करण्याची तयारी दाखवा असे आव्हान शिवसेनेनं दिले.

भारतीय जनता पक्षाने म्हणे भ्रष्टाचाराविरुद्ध युद्ध पुकारले आहे. रशिया आणि युक्रेनचे युद्ध सुरू आहे हे सगळ्यांना माहीत आहे, पण भाजपनेही युद्ध पुकारले आहे. तेही भ्रष्टाचाराविरुद्ध केंद्रीय तपास यंत्रणांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आणि मंत्र्यांवर सूडबुद्धीने केलेल्या कारवाईस हे लोक युद्ध वगैरे म्हणत असतील तर ते मूर्खपणाचे लक्षण आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या ‘आड’ लपून हे लोक युद्धाचा आव आणीत आहेत. हो शिखंडी प्रयोग आहे. असे शिवसेनेनं म्हंटल.

मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे केंद्रीय तपास यंत्रणांचे पथक पोहोचले. त्यांना जो तपास करायचा तो करतील, पण भ्रष्टाचाराविरुद्ध युद्ध पुकारणाऱ्यांना एक आठवण करून द्यायची आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भाजप स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांना महापालिकेतच लाखो रुपयांची लाच स्वीकारताना अटक झाली व आठवडाभर जेल भोगून ते पुन्हा स्थायी समितीचा पुढला भ्रष्टाचार करण्यासाठी रुजू झाले. यावर भाजपवाले तोंड का उचकटत नाहीत? असा सवाल शिवसेनेनं केला.

किरीट व नील सोमय्या या पिता-पुत्रांनी राकेश वाधवानच्या मदतीने केलेला घोटाळा भविष्यात त्यांना तुरुंगात ढकलत नेणार आहे. कर नाही तर डर कशाला हे भाजपवाल्यांचे म्हणणे मान्य केले तर नील किरीट सोमय्या हे सेशन कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी का गेले आहेत? महाविकास आघाडीचे ‘डर्टी पाच डझन’ नेते तुरुंगात जाणार अशी घोषणा चंद्रकांत पाटील व किरीट सोमय्या करतात. म्हणजे केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून आणि वापरूनच हे करणार ना? मग तुमचे ‘डर्टी डझन’ त्या वेळेला काय सिमल्याच्या बर्फात स्वर्गसुखाचा आनंद घेत बसणार आहेत का? किरीट सोमय्या, नील सोमय्या, प्रसाद लाड, पुण्याचे मोहोळ, गिरीश महाजन, मुनगंटीवारांचा ‘झाड’ घोटाळा, अमोल काळे, विजय ढवंगाळे यांचा महापोर्टल आयटी घोटाळा, अगदी चंद्रकांत पाटलांनी सार्वजनिक बांधकाम, महसूलमंत्री म्हणून केलेले उद्योग कोणत्या ‘डर्टी डझन’मध्ये बसतात ते लवकरच कळेल असा इशारा शिवसेनेनं दिला.

पोलीस भरती घोटाळाही रटरटून शिजलाच आहे. आता सुरुवात झालीच आहे तर तुमचेही ‘डर्टी बारा’चे बारा वाजल्याशिवाय राहणार नाहीत. दरेकरांनी तर मुंबै बँक लुटून फस्त केली. त्यामुळे तिथेही तेरावे उरकावेच लागेल! राज्य गमावले म्हणून शिखंडीप्रमाणे युद्धात उतरण्यापेक्षा आमने सामने येऊन युद्ध करण्याची हिंमत दाखवा. चंद्रकांत पाटील म्हणतात, भाजप आता पूर्वीची राहिलेली नसून शिवसेनेला पुरून उरेल. पाटील म्हणतात ते खरेच आहे. भाजप पूर्वी पाठीमागून वार करणारी होती व आता तिचे रूपांतर शिखंडीत झाले आहे. हा बदल तर दिसतोच आहे. पुरून उरण्याची भाषा कसली करता? भविष्यात तुम्हीच किती उरताय ते पहा. युद्धाला युद्ध म्हणायचे असेल तर समोर या आणि लढा असे आव्हान शिवसेनेनं भाजपला दिले.