Thursday, December 25, 2025
Home Blog Page 2751

शहीद रोमित चव्हाण यांना अखेरचा निरोप, मूळ गावी शासकीय इतमामात करण्यात आले अंत्यसंस्कार

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

भारतीय सैन्य दलात कर्तव्य बजावत असताना शहीद झालेले जवान रोमित तानाजी चव्हाण यांच्यावर शिगाव तालुका वाळवा या त्यांच्या गावी वारणा नदीकाठी शासकीय इतमामात अंत्य संस्कार करण्यात आले. यावेळी आबालवृद्धांना अश्रू अनावर झाले. रोमितच्या मित्रांनी एकच टाहो फोडला. आपल्या जवान मित्राला साश्रु नयनांनी आखरेचा निरोप दिला. तत्पूर्वी सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान रोमितचे पार्थिव शिगाव येथे त्याच्या घरी दाखल होताच गावच्या सुपत्राचे दर्शन घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. आई, वडील, बहीण, नातेवाईक, मित्र, गावकरी यांनी रोमितचे पार्थिव पाहताच एकच टाहो फोडला.

काश्मीरमधील सोफिया भागात एका घरात लपलेल्या दहशतवाद्यांवर कारवाई करताना शनिवारी सकाळी रोमित चव्हाण यांच्यासह आणखी एक जवान शहीद झाला होता. रोहित चव्हाण यांना गोळी लागल्याचे समजताच सांगली जिल्ह्यातील शिगाव गावावर शोककळा पसरली होती. रोमित हा तानाजी चव्हाण यांचा एकुलता एक मुलगा होता. लहानपणापासूनच सैन्यदलाचे आकर्षण असल्यामुळे वयाच्या १९ व्या वर्षीच तो सैन्यदलात भरती झाला होता. गेल्या वर्षभरापासून तो काश्मीरमध्ये सेवा बजावत होता. दोन महिन्यांपूर्वीच सुट्टीहून परत गेल्यानंतर त्याचे काश्मीरमधील सोफियाँ भागात पोस्टिंग झाले होते. तीन मार्चला त्याचा वाढदिवस असल्याने तो पुन्हा सुट्टीवर येणार होता. पण वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी रोमित चव्हाण यांनी देशासाठी हौतात्म्य पत्करले.

रोमितच्या घरापासून अंत्ययात्रा निघाली. संपूर्ण मार्गावर रांगोळी काढून फुले अंथरण्यात आली होती. यावेळी अमर रहे, अमर रहे रोमित चव्हाण अमर रहे, वीर जवान तुझे सलाम आशा भावपूर्ण घोषणा देण्यात आल्या. ग्रामपंचायत मार्गे छत्रपती शिवाजी महाराज व्यासपीठ येथे त्याचे पार्थिव लोक दर्शनासाठी ठेवण्यात आले. तदनंतर छत्रपती शिवाजी महाराज व्यासपीठ येथून महादेव मंदिर मार्गे शिवतेज चौक ते वारणा नदी काठी हे पार्थिव आणण्यात आले. यावेळी लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, जवान यांनी पुष्पचक्र अर्पण केले. कष्ट, जिद्द, चिकाटीच्या जोरावर अवघ्या 18 व्या वर्षी सैन्यात दाखल झालेल्या रोहितला पाच वर्षे सेवा बजावीत वयाच्या 23 व्या वर्षी वीरमरण आले. गावात तीन दिवस दुखवटा पाळण्यात आला. यावेळी राजकीय, सहकार, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच लष्करातील आजी माजी पदाधिकाऱ्यांनी श्रध्दांजली वाहिली.

जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी, पोलीस प्रमुख दीक्षित गेडाम, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील, माजी मंत्री सदाभाऊ खोत, तहसीलदार प्रदीप उबाळे, प्रांत, राजाराम बापू कारखान्याचे चेअरमन पी.आर.पाटील, जिल्हा परिषद सदस्य संभाजी कचरे, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक वैभव शिंदे, सरपंच निवास गावडे, सांगली व कोल्हापूर जिल्हा माजी सैनिक, कर्नल प्रदीप ढोले, वडील तानाजी चव्हाण, 4 महार रेजिमेंट सुभेदार कांबळे, स्टेशन कमांडर कोल्हापूर, चीफ ऑफ आर्मी स्टाफ वतीने कर्नल नागेश यांनी पुष्पचक्र वाहिले. लष्कर व पोलिसांच्या वतीने बंदुकीच्या फैरी हवेत झाडण्यात आल्या. रोमित यांचा जन्म 3 मार्च 1999 रोजी शिगाव येथील सर्वसामान्य कुटुंबात झाला. वडील राजाराम बापू पाटील कारखाना येथे नोकरीस आहेत. आई गृहिणी असून बहीण शिक्षण घेत आहे. रोमितचे प्राथमिक शिक्षण शिगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले तर माध्यमिक शिक्षण रामचंद्र चंद्रोजी बारवडे विद्यालय येथे झाले तर बारावी पर्यंतचे शिक्षण बळवंतराव यादव महाविद्यालय पेठ वडगाव जिल्हा कोल्हापूर येथे झाले. कला शाखेतून बारावी झालेनंतर ते 2017 साली मुंबई येथे सैन्यदलात भरती झाले होते.

चारा घोटाळ्या प्रकरणी लालूप्रसाद यादव यांना 5 वर्षांची शिक्षा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | डोरंडा कोषागारशी संबंधित चारा घोटाळ्याप्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना 5 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. रांची सीबीआय कोर्टचे विशेष न्यायाधीश एसके शशी यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही शिक्षा सुनावली. लालू प्रसाद यांना ६० लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

विशेष सीबीआय न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांना आयपीसीच्या कलम 409, 420, 467, 468, 471, कट रचण्याशी संबंधित कलम 120बी आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 12(2) अंतर्गत दोषी ठरवले आहे. या प्रकरणात सीबीआयने एकूण 170 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते, तर 26 सप्टेंबर 2005 रोजी 148 आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले होते

दरम्यान, लालूप्रसाद यांच्या वकिलांनी लालूंना जामीन मिळावा म्हणून अर्ज करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. परंतु, लालूंना जामीन न मिळाल्यास त्यांना तुरुंगातच राहावं लागणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

PM किसान योजनेत सरकारने केले 2 मोठे बदल; 2000 रुपये मिळवण्यासाठी करावे लागेल ‘हे’ काम

PM Kisan

नवी दिल्ली । केंद्र सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये ट्रान्सफर करते. नवीन वर्षात, पीएम किसान योजनेअंतर्गत, सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात 10 व्या हप्त्याचे 2000 रुपये ट्रान्सफर केले आहेत. लवकरच सरकार शेतकऱ्यांना 11व्या हप्त्याची भेट देणार आहे. मात्र त्याआधी हे लक्षात घ्या की, पुढचा हप्ता येण्यापूर्वीच सरकारने या योजनेत 2 मोठे बदल केले आहेत.

काही दिवसांपूर्वीच लाभार्थ्यांना e-KYC करणे बंधनकारक करण्यात आले होते आणि आता राज्यातील तपासणीची पद्धतही बदलली आहे.

स्टेट्स पाहू शकणार नाही
यापूर्वी, पीएम किसान पोर्टलला भेट देऊन, कोणीही त्यांच्या हप्त्याच्या स्टेट्सबद्दलची माहिती मिळवू शकत होता, मात्र आता त्याचे नियम बदलले आहेत. आता नव्या बदलांमुळे, तुम्ही पीएम किसान पोर्टलवर मोबाईल नंबरवरून तुमचे स्टेट्स पाहू शकणार नाही. आता तुम्ही फक्त तुमच्या आधार नंबर किंवा बँक अकाउंट नंबरवरून स्टेट्स जाणून घेऊ शकाल.

e-KYC शिवाय पैसे मिळणार नाहीत
पीएम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांनी e-KYC पूर्ण केल्यानंतरच 11वा हप्ता मिळेल. सरकारने या योजनेत ही प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक केले आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, तुम्ही e-KYC न केल्यास तुमचा 11 वा हप्ता अडकू शकतो.

e-KYC ची प्रक्रिया काय आहे ते जाणून घ्या
सर्वप्रथम तुम्ही https://pmkisan.gov.in/ पोर्टलवर जा.
उजव्या बाजूला अनेक प्रकारचे टॅब दिसतील. सर्वात वर तुम्हाला e-KYC लिहिलेले दिसेल. त्यावर क्लिक करा.
त्यानंतर मागितलेले तपशील भरा. e-KYC प्रक्रिया पूर्ण होईल.

संजय राऊत पवारांच्या अजेंड्यावर काम करत आहेत- चंद्रकांत पाटील

raut pawar patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमधील वाद विकोपाला गेले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अजेंड्यावर काम करत आहेत असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं.

राष्ट्रवादीच्या खासदार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना थेट मुख्यमंत्री पदावर बसवता येणार नसल्याने संजय राऊतांना मुख्यमंत्री पदापर्यंत नेण्यासाठीचा राष्ट्रवादीचा अजेंडा असल्याचं आपल्याला वाटतं आणि तेच आपण बोलून दाखवल्याचं पुण्यामध्ये चंद्रकांत पाटील पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना म्हणाले.

चंद्रकांत पाटलांनी राऊतांना ज्ञान शिकवण्याबाबत वक्तव्य केलं होतं. याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, पाटील म्हणाले की, संजय राऊतांना मी सल्ला दिलेला नाही आणि त्यांना सल्ला देण्याचं धाडस परमेश्वरही करणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमचे मित्र आहेत. तसेच अनेक वर्ष आम्ही एकत्र कामं केली आहेत. कोण संजय राऊत?, काल-पर्वा शिवसेनेत आले आणि आम्हाला शिकवत आहेत.

संभाजीराजेंची सगळी आंदोलनं ‘ब्रेक के बाद’; मराठा आरक्षणाच्या मुद्यांवरून नितेश राणेंचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी अनेकवेळा आंदोलन केले. तसेच मोर्चेही काढले. त्याच्या या वारंवार केल्या जाणाऱ्या आंदोलनावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी खासदार संभाजीराजे छत्रपतींवर निशाणा साधला आहे. “मराठा आरक्षणासाठी संभाजी राजेंचे 26 फेब्रुवारीला उपोषण आहे. ब्रेक के बाद त्यांची सगळी आंदोलनं आणि उपोषणं असतात, असा टोलाही राणे यांनी लगावला.

नितेश राणे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आतापर्यंत मराठा आरक्षण प्रश्नी अनेक आंदोलने केली गेली, मोर्चेही काढण्यात आले. मात्र ते स्वार्थासाठी काढले जाऊ नये याचे भान असणे गरजेचे आहे.

आज खासदार संभाजीराजे यांच्याकडूनही आंदोलने करण्यात आली. ते आरक्षण प्रश्नी आंदोलनं करतात, ब्रेक घेतात, परत आंदोलनं करतात. संभाजी राजेंचे उपोषण हे मराठा आरक्षणासाठी असावं, ते स्वतःच्या खासदारकीसाठी असू नये.”, असा टोलाही राणेंनी संभाजीराजे छत्रपती यांना लगावला.

NSE Scam : गुंतवणुकदारांचे 10 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्यानंतर चित्रा रामकृष्ण यांना NSEची कमान कशी मिळाली जाणून घ्या

नवी दिल्ली । नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) च्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांनी हिमालयात राहणाऱ्या एका ‘बाबा’च्या सांगण्यावरून निर्णय घेणे, आर्थिक अनियमितता आणि ‘बाबा’सोबत गोपनीय माहिती शेअर करणे यासारख्या प्रकरणांमध्ये चौकशीला सामोरे जात आहेत. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का की चित्रा NSE ची CEO कशी बनली आणि कोणाच्या मदतीने तिला एवढ्या मोठ्या एक्सचेंजची कमान मिळाली?

वास्तविक, हे प्रकरण 5 ऑक्टोबर 2012 च्या सकाळचे आहे, जेव्हा एक्सचेंजमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि गुंतवणूकदारांचे सुमारे 10 लाख कोटी रुपये बुडाले. यानंतर तत्कालीन सीईओ रवी नारायण यांना घाईघाईत आपले पद सोडावे लागले होते. याच्या काही महिन्यांनंतर, चित्रा रामकृष्ण यांचा स्टॉक ट्रेडिंगच्या पुरुष प्रधान जगात प्रवेश झाला आणि 13 एप्रिल 2013 रोजी त्यांच्याकडे एक्सचेंजची कमान सोपवली गेली.

चित्रा रामकृष्ण यांचा तंत्रज्ञानावर प्रचंड विश्वास आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या सीईओ झाल्यानंतर तिने 8 वर्षांपूर्वी सांगितले होते… तंत्रज्ञान हा असा सिंह आहे, ज्यावर प्रत्येकजण स्वार आहे. यानंतर एक्सचेंजमध्ये तांत्रिक बिघाड झाला, ज्याचा दोष रवि नारायण आणि चित्रा रामकृष्ण यांच्यावर पडला. यानंतर, ती NSE ची सीईओ बनली, जिने एका वर्षातच देशातील सर्वात मोठे स्टॉक एक्सचेंज म्हणून 100 वर्षे जुन्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) ला मागे टाकले.

20 वर्षांपासून बाबांचा सल्ला घेत होती
चित्राचा दावा आहे की ‘बाबा’ हिमालयाच्या टेकड्यांमध्ये राहतात आणि गेल्या 20 वर्षांपासून ते तिला वैयक्तिक आणि व्यावसायिक बाबींवर सल्ला देत आहेत. ती त्याला ‘शिरोमणी’ म्हणायची. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्यात आणखी काही गोष्टींची भर पडली. आता हे प्रकरण आनंद सुब्रमण्यम यांची चीफ स्ट्रॅटेजिक एडव्हायझर म्हणून नियुक्ती आणि ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आणि व्यवस्थापकीय संचालकांचे सल्लागार म्हणून नामकरण करण्याच्या कंपनीच्या कामकाजातील त्रुटींशी संबंधित आहे.

त्रुटी निर्माण करून नफा
तपास केवळ बाबाची ओळख पडताळून पाहण्यापुरताच मर्यादित नाही, तर मंडळ, नियामक आणि सरकारसह विविध स्तरांवरून तपास सुरू आहे. एका माजी नियामकाने सांगितले की, यावरून असे दिसून येते की माजी आणि सेवारत नोकरशहा, काही अत्यंत महत्वाकांक्षी दलाल, उच्च सरकारी अधिकारी आणि काही कॉर्पोरेट अधिकारी या एक्सचेंजमध्ये सामील असलेल्या एका सर्कलने स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी विविध त्रुटी निर्माण केल्या आणि त्यांचे शोषण केले.

NSE Scam : चित्रा रामकृष्ण यांचा रहस्यमय योगी कोण असू शकेल ते जाणून घ्या

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठे स्टॉक एक्स्चेंज NSE च्या माजी एमडी आणि सीईओ चित्रा रामकृष्ण यांची फसवणूक उघडकीस आल्यापासून या प्रकरणातील रहस्यमय योगीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चित्रा ज्याला गोपनीय माहिती पाठवत असे त्या ‘सिद्धपुरुषाचा’ शोध बाजार नियामक सेबीलाही लावता आलेला नाही. सेबीकडे [email protected] हा ईमेल आयडी होता, ज्यावर चित्राकडून सिक्रेट्स पाठवली गेली. आतापर्यंत केलेल्या तपासाच्या आधारे अनेक जण रहस्यमय योगी असल्याचे संकेत मिळत आहेत.

आनंद सुब्रमण्यम यांच्यावर सर्वांच्या नजरा
चित्रा रामकृष्ण यांचे सल्लागार आणि NSE चे माजी सीओओ आनंद सुब्रमण्यम यांच्याकडे पात्रतेशिवाय अनेक अधिकार आहेत. आनंदला भरघोस पगार देऊन अनेक सुविधा देण्याच्या सूचना थेट एका हिमालयबाबांकडून दिल्या गेल्या. अनेक ईमेलमध्ये आनंदला CC मध्येही ठेवण्यात आले होते. दोघांनाही ज्योतिषात विशेष रस होता. त्यामुळे आनंदने बाबांच्या रूपाने चित्राला सूचना दिल्या असण्याची शक्यता जास्त आहे.

मंत्रालयाचा कोणी अधिकारी होता का?
सूत्रांचे म्हणणे आहे की, या कथित योगीचा ना हिमालयाशी संबंध आहे आणि ना तो बाबा आहे. चित्रा रामकृष्ण यांची कारकीर्द उजळून टाकण्यात अर्थमंत्रालयातील नोकरशहा यांचा मोठा हात असण्याची शक्यता आहे. सेबीला योगी यांच्या ईमेलवरील संभाषणावरूनही कळले आहे की, या व्यक्तीला NSEचे कामकाज आणि अधिकाऱ्यांच्या हेराफेरीची पूर्ण माहिती होती. आनंद हा बाहेरचा माणूस होता आणि त्याला NSE चे इतके तपशील माहीत नव्हते. अशा स्थितीत कथित बाबा मंत्रालयाशी संबंधित व्यक्ती असण्याची शक्यता जास्त आहे.

फक्त CBI च पोल उघडू शकते
या प्रकरणाशी संबंधित उच्चपदस्थ सूत्रांचे म्हणणे आहे की, या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी CBI कडे सोपवली, तरच काही तरी उघडकीस येण्याची शक्यता आहे. अन्यथा, आतापर्यंत SEBI ने NSE ला आरोपी बनवून दंड ठोठावला आहे. या कारवाईमुळे कथित योगींचे नाव उघड करणे आणि तपासाच्या ज्योतीपर्यंत पोहोचणे कठीण जात आहे.

उद्धव ठाकरे- चंद्रशेखर राव यांच्या भेटीवरून फडणवीसांनी दिली ही प्रतिक्रिया, म्हणाले की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी काल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत देशपातळीवरील राजकारणाबाबत चर्चा झाल्याचे दोन्ही नेत्यांकडून सांगण्यात आले. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी या भेटीबाबत आपल्याला फारसं काही वाटत नाही असे म्हंटल.

फडणवीस म्हणाले, एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री येऊन एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना येऊन भेटणे यात काही नवीन गोष्ट नाही. मी मुख्यमंत्री असतानाही तेलंगणचे मुख्यमंत्री भेटण्यासाठी आले होते. त्यामुळे याच्यात फार काही वाटत नाही”. या सगळ्या मंडळींनी मागील लोकसभेतही हातात हात घालून मोठी आघाडी तयार केली. पण त्याचा काही परिणाम झाला नाही.

उत्तर प्रदेशासह देशाच्या विविध राज्यांमध्ये त्यांनी हा प्रयोग करुन पाहिला. कुठेही याचा परिणाम झाला नाही. खरे तर आता तेलंगणात टीआरएसची अवस्था वाईट आहे. मागच्या लोकसभेत तेलंगणात भाजपच्या चार जागा निवडून आल्या होत्या. पुढच्यावेळी तेलंगणात भाजपच नंबर वन असेल, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

SBI च्या ग्राहकांनी तातडीने करावे ‘हे’ काम अन्यथा बँकेशी संबंधित काम थांबू शकते !

PIB fact Check

नवी दिल्ली । स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने ग्राहकांना एक महत्त्वाची नोटीस जारी करून त्यांचे पॅन कार्ड आधारशी लिंक करण्यास सांगितले आहे. SBI च्या ग्राहकांनी निर्धारित मुदतीत हे केले नाही, तर त्यांना बँकिंग सर्व्हिस मिळणे कठीण होईल.

सरकारने पॅन कार्ड आधारशी लिंक करणे अनिवार्य केले आहे. सध्या, पॅन-आधार लिंक करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर ते 31 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत SBI ने आपल्या ग्राहकांना शक्य तितक्या लवकर पॅनला आधारशी लिंक करण्याचे आवाहन केले आहे.

पॅनला आधारशी कसे लिंक करायचे ते जाणून घ्या

>> सर्वप्रथम, इन्कम टॅक्स वेबसाइटच्या मदतीने, तुमचा पॅन आधारशी लिंक आहे की नाही हे जाणून घ्या.

>> यासाठी पहिले इन्कम टॅक्सच्या वेबसाइटवर जा.

>> आधार कार्डवर एंटर केल्याप्रमाणे नाव, पॅन क्रमांक आणि आधार क्रमांक टाका.

>> आधार कार्डमध्ये जन्मवर्ष नमूद असेल तरच चौकोनावर टिक करा. नंतर कॅप्चा कोड टाका.

>> यानंतर आधार लिंकवर क्लिक करा. तुमचा पॅन आधारशी लिंक केला जाईल.

SMS पाठवून लिंक कसे करावे ?
SMS द्वारेही पॅनला आधारशी लिंक करता येते. यासाठी तुम्हाला तुमच्या फोनवर UIDPAN टाइप करावे लागेल. यानंतर, 12-अंकी आधार क्रमांक आणि 10-अंकी पॅन क्रमांक एंटर करा. आता हा मेसेज 567678 किंवा 56161 वर पाठवा. तुमचा पॅन आधारशी लिंक केला जाईल.

इनऍक्टिव्ह पॅन कसे सक्षम करावे ?
इनऍक्टिव्ह पॅन कार्ड पुन्हा कार्यान्वित केले जाऊ शकते. यासाठी तुम्हाला SMS पाठवावा लागेल. तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवरून मेसेज बॉक्समध्ये 12अंकी पॅन टाकावे लागतील. यानंतर स्पेस देऊन 10 अंकी आधार क्रमांक टाका. त्यानंतर हा संदेश 567678 किंवा 56161 वर SMS करा.

चंद्रशेखर राव यांच्या भेटीने काही फरक पडणार नाही – देवेंद्र फडणवीस

औरंगाबाद – तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. बिगर-भाजप आघाडी करण्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. यासंदर्भात भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रशेखर राव यांच्या भेटीने काहीही फरक पडणार नाही. राज्यातील महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार सुडाचे राजकारण करत आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री दुसऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटत असतो. त्यात काही नवीन गोष्ट नाही. मी मुख्यमंत्री असताना चंद्रशेखर राव मलाही येऊन भेटले होते. त्यांच्या भेटीने काहीही फरक पडणार नाही. यापूर्वीही विरोधकांनी लोकसभेत आणि विविध राज्यांमध्ये हातात हात घालून आघाडीचे प्रयोग केले होते. त्यांचा प्रयोग फसला होता. औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्यावर मुंबई महापालिका कारवाई करणार आहे. यावर बोलताना, हे सरकार सुडाचे राजकारण करत आहे. मात्र, न्यायालय आहे. त्या संदर्भात योग्य कार्यवाही करेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. दररोज काय होत आहे. हे सर्वजण उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. राणेंवर काय कारवाई झाली, त्यांच्या मुलाबाबत काय झाले. सोमय्यांचा कशा पद्धतीने जीव घेण्याचा प्रयत्न झाला. रवी राणांबाबत काय चालले आहे, हे सगळे जनता पाहत आहेत. सुडाचे राजकारण कोण करत आहे सर्वजण पाहत आहेत. सरकारची सुडाची भावना त्यातून पुढे येत आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.