Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 2864

फलटणला खासगी सावकारी बोकाळली, चाैथा गुन्हा दाखल

फलटण | फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अंतर्गत खाजगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून खाजगी सावकाराच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचा सपाटा सुरूच असून दाखल चौथ्या गुन्ह्यात सुरवडी येथील एका तरुणाने गावातील दोन सावकाराच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अविनाश रघुनाथ जगताप (वय- 40 वर्ष रा. सुरवडी ता. फलटण) संशयित आरोपी धनाजी उर्फ धनंजय पांडुरंग साळवे (रा. सुरवडी ता. फलटण) याच्याकडून जानेवारी 2011 मध्ये व्याजदराने बेकायदेशीररीत्या 70 हजार रुपये फिर्यादीच्या घरी घेतले होते. त्या बदल्यात त्यांनी 1 लाख 46 हजार रुपये परत दिले होते. व्याजाचे पैसे वेळेवर येत नसल्याने साळवे याने फिर्यादीस शिवीगाळ दमदाटी केली तसेच जानेवारी 2012 मध्ये संशयित आरोपी संतोष बाबुराव साळुंखे (रा. सुरवडी ता. फलटण) यांच्याकडून 1 लाख पंचवीस हजार रुपये 12.5 टक्के व्याजाने यांनी घेतले होते. त्या मोबदल्यात जानेवारी 2013 ते सन 2015 पर्यंत व्याजापोटी 2 लाख 64 हजार 500 रुपये त्यामधील 1 लाख रुपये चेक फिर्यादी याने दिले होते. तसेच सदरचे व्याजाचे पैसे वेळेवर न दिल्याने फिर्यादीस आरोपीने शिवीगाळ दमदाटी केली होती.

संशयित आरोपी यांनी फिर्यादीस तुझ्याकडे व्याजाचे पैसे राहिले आहेत म्हणून सतत त्रास देऊन शिवीगाळ दमदाटी करत होते. सन 2016 मध्ये फिर्यादीस पैशाची गरज होती. गावांमध्ये कोणीही त्यांना पैसे देत नव्हते. त्यावेळी वर नमूद दोन्ही आरोपी यांनी फिर्यादीच्या गट नंबर 470 मधील 22 गुंठे जमीन साठेखत करून घेतली. त्यामध्ये त्यांनी 6 लाख 80 हजार रुपये दिल्याचे सांगितले. परंतु त्यांनी फिर्यादीस रोख 1 लाख 60 हजार रुपये दिले व राहिलेले 5 लाख 20 हजार रुपये हे पाठीमागील 2011 व 2012 मधील दिलेले पैशांपैकी 3 लाख 40 हजार रुपये व्याज व चालू दिलेले पैशाचे 1 लाख 80 हजार अगाऊ व्याज असे 5 लाख 20 हजार रुपये व्याजापोटी घेतले.

फिर्यादीने 3 लाख 55 हजार रुपये रोख असे व्याजाने घेतले होते. त्या बदल्यात फिर्यादी यांनी त्यांना वेळोवेळी 9 लाख 30 हजार 500 रुपये व्याजापोटी दिली असे, असताना सुद्धा अजून व्याजापोटी 6 लाख 80 हजार रुपये मागत आहेत. तसेच गेल्या पंधरा दिवसापूर्वी आरोपी हे फिर्यादीच्या घरी येऊन आत्तापर्यंत व्याजाचे पैसे द्यायचे जमत नसेल तर तू आम्हाला साठेखत करून दिली जमीन आमच्या नावावर करून दे असे म्हणून दमदाटी करत होते.

याप्रकरणी फिर्यादी अविनाश रघुनाथ जगताप याने धनाजी उर्फ धनंजय पांडुरंग साळवे व संतोष बाबुराव साळुंखे या दोन्ही खाजगी सावकारांच्या विरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक वास्तविक फिर्यादी यांनी वर तपास पोलीस उपनिरीक्षक अरगडे करीत आहेत.

स्वाभिमानीच्या रेट्यापुढे खा. संजयकाका पाटील नमले, शेतकऱ्यांना दिला एक कोटींचा धनादेश

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सलग आठ दिवस ठिय्या आंदोलन केल्यानंतर तासगाव आणि नागेवाडी कारखान्याचे एक कोटी रुपयांचे 29 जानेवारीचे धनादेश ख़ा. संजयकाका पाटील यांनी आंदोलक महिला शेतकर्‍यांना दिले. उर्वरित बिले 15 ही फेब्रुवारी पर्यंत सर्व शेतकर्‍याच्या खात्यावर वर्ग करण्याचे लेखी पत्र ही यावेळी खासदारांनी आंदोलनस्थळी येवून दिले. यानंतर आठ दिवस सुरू असलेले ठिय्या आंदोलन स्थगित केले.

गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनास खासदार पाटील यांनी शनिवारी भेट दिली. “आमची चूक झालेली आहे, मला ती मान्य आहे, कारखाना आता आर्थिक अडचणीत आहे, कुठूनही पैसे उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे पैसे देण्यास विलंब झाला. आज मी कोटींची बिले वर्ग करतो तर चार आणि 12 फेब्रुवारीला उर्वरित बिले वर्ग करतो. कुणाचा एक रुपया बुडविणार नाही,”अशी ग्वाही यावेळी खासदार पाटील यांनी दिली. यानंतर खा. संजयकाका पाटील यांच्या हस्ते मोर्चातील महिलांच्या पतीना बिलाचे धनादेश देण्यात आले.

यावेळी बोलताना खराडे म्हणाले,”गेली एक वर्ष आमचा लढा सुरू आहे. या लढ्याला यश ही आले. आतापर्यंत तब्बल 30 कोटींची बिले मिळाली. बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केलेनंतर तरी सर्व पैसे मिळतील ही अपेक्षा होती. मात्र ही फोल ठरली आहे, आतापर्यंत अनेकदा फसव्या तारखा आणि फसवे चेक देऊन दिशाभूल केली आहे. आठ दिवस आंदोलन करून एक कोटी घेणे आंदोलनाचे यश नाही. मी आणि शेतकरी खुश नाही, मात्र आंदोलन किती दिवस चालू ठेवायचे हाही प्रश्न आहे. त्यात कोरोना आणि प्रचंड थंडी, याशिवाय या आंदोलकांच्या जेवणासाठी येणारा खर्च प्रचंड आहे.” खा. संजय पाटील यांनी माझ्याकडे आता पैसेच नाहीत म्हणून हात वर केले आहेत. यामुळे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

बेकायदेशीर सुरू असणारी झाडांची कत्तल पाडली बंद, तोडलेल्या शेकडो झाडांसह ट्रॅक्टर आणला थेट पोलीस ठाण्यात

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

सांगली विश्रामबाग परिसरात असणाऱ्या महापालिकेच्या ओपनस्पेस जागेतील बेकायदेशीर व विनापरवाना सुरू असणारी झाडांची कत्तल राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आज उघडकीस आणली. महापालिकेच्या कंत्राटदाराने कंत्राट संपलेले असतानाही बेकायदेशीर वृक्षांची कत्तल सुरू ठेवली होती. सदरचा प्रकार निदर्शनास येताच नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी ही कत्तल बंद पाडून तोडलेल्या शेकडो झाडांसह ट्रक पोलीस ठाण्याच्या आवारात आणला.

सदरचा प्रकार समजताच महापालिकेचे उद्यान निरीक्षक तातडीने दाखल झाले. या प्रकरणी आता विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याचे काम सुरु होते. दरम्यान, खुलेआम वृक्षांची सुरू असणारी कत्तल कोणाच्या आशीर्वादाने सुरू होती याची चौकशी करुन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केली आहे.

दरम्यान, ज्या व्यक्तीकडे झाडे तोडण्याचे कंत्राट होते त्याने फक्त निलगिरीची झाडे तोडण्याचे आदेश असताना त्याने या परिसरातील सर्व झाडे तोडली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आता महापालिका प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

फसवणूक : ग्रामपंचायतीच्या सरपंच, ग्रामसवेकासह 15 जणांवर गुन्हा दाखल

Phaltan Police

फलटण | बनावट व खोटे संमतीपत्र तयार करून बनावट कागदपत्रांच्या आधारे, बरड तालुका फलटण गावच्या हद्दीतील दुकान गाळ्यांची बेकायदेशीर नोंद केल्याप्रकरणी बरड ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांच्यासह एकूण 15 जणांच्या विरोधात फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि 15 जानेवारी 2018 रोजी बरड (ता . फलटण) गावचे हददीत बापुराव रामा लंगुटे (रा. बरड) यांचा पुतण्या गणेश विठठल लंगुटे व भाऊ विश्वनाथ रामा लंगुटे (दोन्ही रा. बरड ता. फलटण) यांनी त्यांच्या नावाने मालमत्ता क्रमांक 1624 व मालमत्ता क्रमांक 1625 यांची नोंद करताना ग्रामपंचायत बरड यांना दिलेले 100 रुपयाचे स्टॅम्प पेपरवर गट नं. 54 मधील इतर मिळकत धारक व बापुराव रामा लंगुटे यांच्या नावावर खोटया सहया व अंगठे करुन, बनावट व खोटी कागदपत्रे तयार करुन बरड येथे असणाऱ्या गाळयांची नोंद करण्याकामी ग्रामपंचायत बरड यांना 100 रुपयाचे संमतीपत्र व अर्ज, प्रतिज्ञापत्र दिले होते.

ग्रामपंचायत बरडचे तत्कालीन ग्रामसेवक दतात्रय सोपान भोसले (रा. घाडगेवाडी ता. फलटण) व दि. 16/1/2018 रोजीच्या मासीक मिटींग कामी हजर असणारे ग्रामपंचायतीचे सरंपच तृप्ती संतोष गावडे, उपसरपंच गोरख बबन टेंबरे, सदस्य सौ. माधुरी गणेश लंगुटे, प्रीतम विठठल लोंढे , रतन गुणवंत बागाव, गजानन रामदास गावडे, हेमलता हणमंत गावडे, कमल सुभेदार लोंढे, रुक्मीणी तुकाराम शिंदे, शेखर दिलीप काशिद, वनिता अण्णा लंगुटे, सचिन गजानन हाके (सर्व रा. बरड ता. फलटण) यांनी सर्वांनी आपआपसात संगणमत करुन बरड ग्रामपंचायती मध्ये गणेश विठठल लंगुटे यांच्या नावाने मालमत्ता क्रमांक 1624 व विश्वनाथ रामा लंगुटे यांच्या नावाने मालमत्ता क्रमांक 1625 या गाळयांची बेकायदेशीर नोंद घेण्यात आली असल्याची फिर्याद बापुराव रामा लंगुटे (वय- 62 वर्षे रा. बरड ता. फलटण) यांनी दिली आहे.

आमची वायनरी असेल तर सोमय्यांनी ती ताब्यात घ्यावी; राऊतांचे प्रत्युत्तर

raut somaiya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वाईन विक्री करणाऱ्या कंपनीत पार्टनरशीप आहे असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केल्यानंतर राऊतांनी आता सोमय्यांना प्रत्युत्तर दिले आहे. जर आमची कोणती वायनरी असेल तर ती सोमय्यांनी ताब्यात घ्यावी असा पलटवार संजय राऊत यांनी केला.

व्यवसाय करणे हा गुन्हा आहे का? चोऱ्या करण्यापेक्षा व्यवसाय करणे कधीही चांगले अस म्हणत तुमची मुले काय चणे विकतात का असा उलट सवाल संजय राऊत यांनी केला. आम्ही ड्रग तरी विकत नाही असेही संजय राऊत यांनी म्हंटल. तसेच भाजपने अशा प्रकारचे घाणेरडे राजकारण बंद करावे असा इशारा त्यांनी केला.

किरीट सोमय्या यांनी काय आरोप केले??

संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांची वाइन उद्योगात मोठी गुंतवणूक आहे. संजय राऊत यांच्या दोन्ही मुली आणि पत्नी एका वाइन वितरणाचा व्यवसाय असलेल्या कंपनीत भागीदार असल्याचा गौप्यस्फोट भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केला. . १६ एप्रिल २०२१ रोजी संजय राऊत यांनी अशोक गर्ग यांच्याशी भागीदारी केली. त्यांच्या कन्या विधिता आणि पूर्वशी राऊत या दोघीही कंपनीत भागीदार आहेत. संजय राऊत यांनी आपल्या हितसंबंधांची माहिती जाहीर करायला हवी होती, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले.

“नरेंद्र मोदी कांदा-बटाट्याचे भाव कमी करायला पंतप्रधान झालेले नाहीत”

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतीत भाजप नेत्यांकडून अनेकवेळा कौतुकास्पद आणि आदर तीथ्यपूर्वक बोलले जाते. मात्र, पंतप्रधान मोदींच्या भूमिकेबाबत बोलताना भाजप नेते तथा खासदार कपिल पाटील यांनी एक वक्तव्य केले आहे. “पाकव्याप्त काश्मीर हा भारतात फक्त नरेंद्र मोदीच आणू शकतात. त्यामुळे महागाईच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर टीका करण्यात अर्थ नाही. नरेंद्र मोदी हे कांदा-बटाट्याचे भाव कमी करायला पंतप्रधान झालेले नाहीत, असे वक्तव्य पाटील यांनी केले आहे.

भाजप नेते कपिल पाटीलयांनी नुकत्याच एका कार्यक्रमास उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी पाकव्याप्त काश्मीरच्या मुद्द्यावर भाष्य केले. यावेळी ते म्हणाले की, कांदे, बटाटे, तूरडाळ, मुगडाळ या सगळ्यातून आपण बाहेर आले पाहिजे. देशच नसेल तर कांदे बटाटे कुठून खरेदी करणार? महागाईचे समर्थन कोणीही करु शकत नाही. पण कांदा आणि बटाट्याचे भाव कमी करण्यासाठी नरेंद्र मोदी पंतप्रधान झालेले नाहीत.

पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग आहे. त्याचा पुन्हा भारतामध्ये समावेश होणे, ही देशातील प्रत्येक नागरिकाची अशी इच्छा आहे. त्याच्यासाठी आपण सर्वजण आशेवर आहोत, असेही पाटील यांनी म्हंटले.

विद्यापीठाच्या पदवी परीक्षा ‘या’ तारखेपासूनच

bAMU
bAMU

औरंगाबाद – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने सर्व अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या हिवाळी सत्र परीक्षांसाठी आवेदन पत्र भरण्यास 31 जानेवारी अखेरपर्यंत मुदतवाढ दिली. पण या ऑनलाइन परीक्षा मात्र 8 फेब्रुवारीपासूनच घेण्यात येणार असल्याचे परिपत्रक काल विद्यापीठाने काढले.

शैक्षणिक वर्ष 2021-22 मधील सत्र परीक्षा फेब्रुवारी मार्चमध्ये होणार आहेत. यासाठी आवेदनपत्र भरण्याची मुदत 20 जानेवारीपर्यंत होती. ती रोज 10 रुपये विलंब शुल्कासह पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 31 जानेवारीपर्यंत अति विलंब शुल्कासह पदवीसाठी 1 व 2 फेब्रुवारी तर पदव्युत्तर साठी 1 व 5 फेब्रुवारीपर्यंत वाढवून दिली.

ही ऑनलाइन परीक्षा सकाळ व दुपार अशा दोन सत्रात होईल. परीक्षेसाठी प्रत्येक सत्यासाठी 3 तासांचा अवधी राहिल.

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, आता तुमचे पैसे बुडणार नाहीत; जाणून घ्या संपूर्ण माहिती

नवी दिल्ली । म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांना बाजार नियामक सेबीने मोठा दिलासा दिला आहे. सेबीच्या ‘या’ एका पाऊलामुळे गुंतवणूकदारांचे पैसे आता बुडणार नाहीत. वास्तविक, सेबीने म्युच्युअल फंड नियम आणखी कडक केले आहेत, गुंतवणूकदारांच्या हिताचे संरक्षण वाढवले ​​आहे. या अंतर्गत आता म्युच्युअल फंड कंपन्या स्वतःहून कोणतीही योजना बंद करू शकणार नाहीत.

कोणतीही योजना बंद करण्यासाठी, म्युच्युअल फंड कंपन्यांना युनिटधारकांची म्हणजेच गुंतवणूकदारांची मंजुरी घ्यावी लागेल. ‘या’ नवीन नियमांनुसार, म्युच्युअल फंड ट्रस्टीजनी बहुसंख्य मतांनी योजना बंद करण्याचा किंवा मुदतीपूर्वी रिडीम करण्याचा निर्णय घेतल्यास, त्यांना म्युच्युअल फंड युनिटधारकांची संमती घ्यावी लागेल.

एका मताच्या आधारे निर्णय
नवीन नियमांनुसार,ट्रस्टीजना प्रति युनिट एक मताच्या आधारे उपस्थित आणि मतदान करणाऱ्या युनिटधारकांच्या साध्या बहुमताची संमती घ्यावी लागेल. ट्रस्टीज जेव्हा एखादी योजना बंद करण्याचा निर्णय घेतील तेव्हा ते एका दिवसात नियामकाला कळवतील. यामध्ये योजना बंद करण्याचे कारण त्यांना द्यावे लागेल. यानंतर, युनिट धारकांद्वारे मतदान केले जाईल आणि त्यानंतर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून 45 दिवसांच्या आत त्याचे निकाल जाहीर करावे लागतील. युनिट धारकांची संमती मिळविण्यात ट्रस्टीजना यश आले नाही, तर मतदानाचा निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून ती योजना पुन्हा व्यावसायिक कामांसाठी खुली केली जाईल.

फ्रँकलिन टेम्पलटन प्रकरणातील आदेशानंतर निकाल
जुलै 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर सेबीचा हा निर्णय आला आहे. फ्रँकलिन टेम्पलटन म्युच्युअल फंडाच्या सहा कर्ज योजना बंद करण्यासंबंधीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला होता. फंड हाउसने 23 एप्रिल 2020 रोजी सहा डेट म्युच्युअल फंड योजना बंद केल्या होत्या. यासाठी कॅश मार्केटमधील लिक्विडीटीचा अभाव आणि रिडंप्शनचा दबाव हे कारण सांगण्यात आले. यावर सुप्रीम कोर्टाने म्हटले होते की, कोणतीही योजना बंद करण्यापूर्वी ट्रस्टीजना म्युच्युअल फंड योजनेतील गुंतवणूकदारांचे बहुमत मिळवावे लागेल.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर कोरोनामुक्त, प्रकृतीत सुधारणा; आरोग्यमंत्र्यांची माहिती

lata mangeshkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गानसम्राज्ञी लता मंगेशकर या कोरोनामुक्त झाल्या असून याबाबतची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. लता दीदींच्या प्रकृतीत चांगली सुधारणा दिसून येतेय. त्या गेल्या 15 दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होत्या. मात्र आता त्यांचं व्हेंटिलेटर काढून टाकण्यात आलेलं आहे. असेही टोपे म्हणाले.

लता दीदी कोरोनातून ठीक झाल्या आहेत पण, सध्या ब्रेन इन्फेक्शन आहे. यामध्ये सुधारणा करण्याबाबत डॉक्टरांचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या लता दीदी डोळे उघडत आहेत आणि थोडं बोलतही आहेत. त्या डॉक्टरांच्या उपचाराला चांगला प्रतिसादही देता आहेत. असंही राजेश टोपेंनी सांगितलं.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांनतर त्यांचे चाहते चिंतेत होते. काही दिवसांपूर्वी मंगेशकर कुटुंबीयांनी निवेदन दिलं होतं. लता दीदींच्या प्रकृतीबाबत दररोज माहिती देणं शक्य नाही असे त्यांनी म्हंटल होत.