Friday, December 26, 2025
Home Blog Page 2898

बाळासाहेब ठाकरे म्हणजे सत्य, न्याय आणि स्वाभिमानाचे प्रतीक- संजय राऊत

raut balasaheb

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज 23 जानेवारी रोजी 96 वी जयंती आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल भरभरून बोलले. बाळासाहेबांनी मराठी माणसाला अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ दिले अस संजय राऊत म्हणाले. बाळासाहेब ठाकरे म्हणजे सत्य, न्याय आणि स्वाभिमानाचे प्रतीक होते अस राऊत यांनी म्हंटल.

बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक गोष्टी दिल्या, त्यांनी दिलेल्या शिदोरीवर राज्य आणि देश पुढे चालला आहे. बाळासाहेबांचा शब्द म्हणजे बंदुकीची गोळी होती. त्यांनी कधी कोणावर अन्याय होऊ दिला नाही. बाळासाहेब ठाकरे म्हणजे सत्य, न्याय आणि स्वाभिमानाचे प्रतीक होते. त्यांचे जीवन म्हणजे धगधगत अग्निकुंड होत असे संजय राऊत यांनी म्हंटल.

यावेळी त्यांनी भाजपला टोला लगावला. बाळासाहेब असताना कोणाची पोपटपंची चालली नाही. विरोधी पक्षात आज जी कावकाव सुरू आहे, फडफड सुरू आहे,जर बाळासाहेब असते तर ती थंड पडली असती असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला.

माझ्या संपूर्ण जीवनावर बाळासाहेबांचा विशेष प्रभाव होता. बाळासाहेब नसते तर मी सुद्धा आज तुम्हाला दिसलो नसतो. आज मी जो कोणी आहे ते फक्त त्यांच्यामुळे आहे असं म्हणत दुसरे बाळासाहेब होणे नाही अस संजय राऊत यांनी म्हंटल.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या इंडिया गेटवरील थ्रीडी प्रतिमेचं नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज 125 वी जयंती आहे. केंद्र सरकारने सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या दिवसापासून प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यास सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान दिल्ली येथील इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा बसवण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या इंडिया गेटवरील थ्रीडी प्रतिमेचे नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण केले जाणार आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांची इंडिया गेटवरील थ्रीडी प्रतिमा तयार करण्यात आली आहे. हि प्रतिमा तयार करण्यासाठी होलोग्राफिक या डिजीटल तंत्राचा वापर करण्यात आलेला आहे. हे तंत्रज्ञान प्रोजेक्टर सारखे काम करते. यामध्ये कोणतीही गोष्टी थ्रीडी स्वरुपात दाखवता येते. आपण समोर पाहत असलेली गोष्ट खरी असल्याचा भास होतो पण आपण थ्री़डी इमेज पाहत असतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दिल्ली येथील इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा बसवण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. नरेंद्र मोदी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचा फोटो देखील जारी केला होता. जोपर्यंत पुतळा तयार होत नाही तोपर्यंत नेताजी बोस यांची होलोग्राम स्वरुपातील प्रतिमा त्या ठिकाणी दिसणार आहे.

प्रशांत पाटील याचे हदयविकाराच्या धक्क्याने निधन

कराड | साकुर्डी येथील प्रशांत आनंदराव पाटील (वय- 33) यांचे हदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. शनिवारी दि. 22 रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास पुणे येथे प्रशांत पाटील यांना हदयविकाराचा धक्का बसला. त्यांना वैद्यकीय उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले होते. मात्र, डाॅक्टरांनी त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले.

प्रशांत यांचा मृतदेह कराड तालुक्यातील साकुर्डी या मूळ गावी आज रविवारी दि. 23 रोजी सकाळी 7 वाजता आणण्यात आला. ऐन तारूण्यात त्याचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कराडसह पुण्यात त्यांचा मोठा मित्र परिवार होता.

प्रशांत हे पुणे येथे खासगी कंपनीत इंजिनिअर म्हणून काम करत होते. त्याच्या पश्चात पत्नी, दीड वर्षाची मुलगी, बहिण, भाऊ, आई- वडिल असा परिवार आहे. सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असे. रक्षाविसर्जन मंगळवारी दि. 25 रोजी साकुर्डी येथे होणार आहे.

आज एमपीएससीची राज्यसेवा पूर्व परीक्षा

MPSC

औरंगाबाद – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने राज्यसेवेची पूर्वपरीक्षा आज 23 जानेवारी रोजी होणार असून, 47 केंद्रांवर 15 हजार 234 उमेदवारांची आसनव्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी 10 ते दुपारी 12 व दुपारी 3 ते संध्याकाळी 5 अशा दोन सत्रात ही परीक्षा होईल. परीक्षेसाठी 1 हजार 726 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे सामान्य प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांनी कळवले आहे.

या परीक्षेत दोन्ही सत्रांमध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नपत्रिका असेल. परीक्षा कक्षात उमेदवाराने प्रवेश प्रमाणपत्र स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड किंवा स्मार्ट कार्ड वाहन चालवण्याचा परवाना यापैकी एक ओळखपत्र सोबत बाळगणे अनिवार्य आहे. प्रवेश प्रमाणपत्र काळ्या व निळ्या शाईचे बॉलपॉइंट पेन, ओळखपत्र, सॅनिटायझर, पारदर्शक पाणी बाटली या व्यतिरिक्त अन्य साहित्य वस्तू परीक्षा कक्षामध्ये घेऊन जाण्यास परवानगी नाही.

उमेदवारांना परीक्षा कक्षात मोबाईल, डिजिटल डायरी, मायक्रोफोन, ब्लूटूथ, कॅमेरा फोन किंवा तत्सम कोणतेही संदेशवहन उपकरण, इलेक्ट्रॉनिक साहित्य घेऊन जाण्यास मनाई आहे. असे साहित्य आणले तर उमेदवारांना स्वतःच्या जबाबदारीवर परीक्षा केंद्राच्या आवारात मुख्य दरवाजाबाहेरच ठेवावे लागेल.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती; जाणून घेऊया बाळासाहेबांबद्दल खास गोष्टी

Balasaheb Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज 96 वी जयंती. महाराष्ट्रात सत्ता असताना आणि सत्तेबाहेर असतानाही राज्याच्या राजकारणावर आपला रिमोट कंट्रोल कायम ठेवून हिंदुत्त्वाची मशाल देशभर पोचवणारे बाळासाहेब ठाकरे यांचे संपूर्ण जीवन खऱ्या अर्थाने झंझावाती होते.

फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वर्तमानपत्रात व्यंगचित्रकार म्हणून आपल्या व्यावसायिक कारकीर्दीची सुरुवात करणारे बाळासाहेब ठाकरे यांना वडील प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचा वारसा लाभला होता. आपल्या लेखणीतून, व्याख्यानांतून आणि लोकजागरण मोहिमांमधून समाजातील अनिष्ट रूढी-परंपरांवर कोरडे ओढणारे प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली.

मराठी माणसाच्या न्यायहक्कांसाठी बाळासाहेब ठाकरे सतत लढले. आपल्या बेधडक भाषणाने बाळासाहेबांनी विरोधकांना अक्षरशः घायाळ केलं. आक्रमक हिंदुत्वाचा आणि कडव्या मुस्लिमविरोधाचा प्रखर पुरस्कार करताना बाळासाहेब ठाकरे अनेकदा टीकेचे आणि वादाचेही धनी झाले, पण त्यांनी कधीही आपला शब्द फिरवला नाही.

बाबरी मशीद पाडल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली होती, आणि जबाबदारी घ्यायला कोणी तयार नव्हते, तेव्हा जर बाबरी माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे असं बेधडक विधान बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते. प्रत्येक मुस्लीम आपला शत्रू नाही, तर देशविरोधी मुस्लीमच शत्रू आहे हीच बाळासाहेबांची भूमिका होती.

१९९० या काळात, काश्मीर मधील इस्लामी दहशतवाद्यांनी कश्मिरी पंडितांना तिथून हकलावायला लावले होते. अमरनाथ यात्रा सुरू होती. दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रा थांबविण्याची धमकी दिली. दहशतवाद्यांनी असे धमकाविले की जो कोणी या यात्रेसाठी येईल तो परत घरी जाणार नाही. तेव्हा बाळासाहेबांनी असे निवेदन केले की, ९९% हज यात्रेकडे जाणार्या फ्लाइट मुंबई विमानतळावरून जातात. बघूया मक्का-मदीना ला येथून प्रवास कसा केला जातो आणि दुसऱ्याच दिवशी अमरनाथ यात्रा सुरू झाली.

बाळासाहेब ठाकरेंची विशेष गोष्ट म्हणजे ते कधीही कोणाला स्वत:हून भेटले नाहीत. ज्यांना आपल्याला भेटण्याची इच्छा आहे त्यांनी घरी यावे, असे त्यांचे मत होते. भारतातील सर्व महान हस्ती त्यांना भेटण्यासाठी मातोश्री, मुंबई येथे त्यांच्या घरी यायचे. बॉलीवूडमधील कलाकार त्यांच्या घरी भेटण्यासाठी यायचे. लिट्टे आणि हिटलर यांचे ते नेहमी कौतुक करायचे.

काहीसा दिलासा : सातारा जिल्ह्यात नवे 1 हजार 124 कोरोना पाॅझिटीव्ह

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यात शनिवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणीत रिपोर्टमध्ये 1 हजार 124 जण बाधित आढळले आहेत. कोरोनाचा पाॅझिटीव्ह रेट 28. 82 टक्क्यांवर गेल्याने चितेंचे वातावरण कायम आहे. मात्र पाॅझिटीव्ह रेट काहीशा प्रमाणात कमी होताना दिसत आहे.

गेल्या चोवीस तासात सातारा जिल्ह्यात 3 हजार 900 लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 1 हजार 124 लोक बाधित आढळून आले आहेत. आजच्या अहवालात पाॅझिटीव्ह रेट 29 टक्क्यांजवळ आला आहे, दोन दिवासापूर्वी पाॅझिटीव्ह रेट 33 टक्क्यांवर होता, तो आता काहीशा प्रमाणात खाली आला आहे.

शनिवारी दिवसभरात 1052 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 4 जणाचा मृत्यू झाला आहे. काल सायंकाळी जिल्ह्यात विविध ठिकाणी 7664 रूग्ण सक्रीय होते. तर केवळ 326 रूग्ण रूग्णालयात उपरार्थ आहेत.

महात्मा गांधींची प्रिय धून प्रजासत्ताक दिन सोहळ्यातून हद्दपार; ‘ही’ वाजणार धून

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारच्या वतीने भारतात साजऱ्या केल्या जाणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर अनेक बदल केले जात आहेत. स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या दिवसापासून प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यास सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता राष्ट्रपिता महात्मा गांधी याची आवडती धून असलेली ‘अबाईड विथ मी’ हि प्रजासत्ताक दिनाच्या सांगता समारंभातून वगळली असून त्याऐवजी यंदा ‘सारे जहाँ से अच्छा’ ही धून वाजवण्यात येणार आहे.

भारतीय लष्कराच्यावतीने शनिवारी एक कार्यक्रम पत्रिका प्रसिद्ध करण्यात आली. त्यामध्ये प्रजासत्ताक दिनाच्या सांगता समारंभाद्वारे (बिटिंग द रिट्रीट) तिन्ही सेना दलांना आपआपल्या बराकींमध्ये परतण्याचा अधिकृत संदेश दिला जातो. या समारंभात तिन्ही सेना दले सहभागी होतात आणि पारंपरिक धून वाजवत माघारी फिरतात. या सर्व धून लष्कराच्या बॅण्डद्वारे वाजवण्यात येतात. त्यांत ‘अबाईड विथ मी’चाही समावेश होता.

‘अबाईड विथ मी’ ही पद्यरचना महात्मा गांधी यांच्या आवडत्या भजनांपैकी एक आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सांगता समारंभाच्या अखेरीस ‘अबाईड विथ मी’ची धून वाजवण्यात येत होती, परंतु यंदा ‘सारे जहाँ से अच्छा’ ही धून वाजवण्यात येईल, असे लष्कराच्या कार्यक्रम पत्रिकेत म्हटले आहे. विजय चौकात होणाऱ्या या समारंभात २६ धून वाजवण्यात येणार आहेत. त्यांत जय जनम भूमी, वीर सियाचेन, अमर चट्टान, गोल्डन अ‍ॅरोज, स्वर्ण जयंती, वीर सैनिक, जय भारती, हिंद की सेना, कदम कदम बढाए जा, ए मेरे वतन के लोगों आदी धूनचा समावेश आहे.

न्यायालयीन लढ्याला कंटाळून माथेफिरूने जाळल्या दुचाकी

fire
fire

औरंगाबाद – दुचाकी जाळणाऱ्या माथेफिरुला उस्मानपुरा पोलिसांनी अटक केली. अनिल ऊर्फ सोनू ज्ञानेश्‍वर दाभाडे (वय 23, रा. नागसेननगर, उस्मानपुरा) असे आरोपीचे नाव आहे. त्‍याला 25 जानेवारी पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. कोर्ट केस मुळे न्यायालयात चकरा माराव्या लागत असल्याने हे कृत्य केल्याची कबुली आरोपीने दिली आहे.

सागर कचरु आढाव (रा. एकनाथनगर, उस्मानपुरा) याने फिर्याद दिली. त्‍यानुसार, १७ जानेवारी रोजी रात्रीसाडे दहा वाजेच्‍या सुमारास सागरने आपली दुचाकी (क्रं. एमएच-20 ईएस- 2867) व ॲक्टीव्हा (क्रं. एमएच-20 डीएल- 1778) घरासमोर उभी केली होती. त्‍यावेळी माथेफिरुने सागर आढाव याच्‍या दुचाकीसह त्‍यांच्या शेजारी राहणाऱ्या संजय नेरकर यांच्‍या दुचाकीला (क्रं.एमएच- 20 आर- 8876) आग लावून पसार झाला. पहाटे तीन वाजेच्‍या सुमारास दुचाकीला आग लागल्‍याचे सागरला निदर्शनास आले. प्रकरणात उस्‍मानपुरा पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरून आरोपी अनिल ऊर्फ सोनू दाभाडे याला अटक केली. त्‍याने गुन्‍ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील भाग्यश्री संचेती यांनी युक्तिवाद केला. आरोपी हा सराईत गुन्‍हेगार असून त्‍याच्‍या विरोधात उस्‍मानपुरा पोलिस ठाण्‍यात तब्बल आठ गुन्‍हे दाखल आहेत. या गुन्‍ह्यात आरोपीचे आणखी कोणी साथीदार आहेत काय, गुन्‍हा करण्‍यामागे आरोपीचा आणखी कोणता हेतू होता काय याचा तपास बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.

महाविकास आघाडी सरकार बरखास्त करा ; चंद्रकांतदादांची राज्यपालांकडे मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आणि भाजप असा संघर्ष  पहायला मिळत आहे. अशात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारचे मंत्रिमंडळच बरखास्त करावे, अशी थेट मागणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. मंत्रिमंडळ बरखास्त करून मंत्र्यांवर गुन्हे दाखल करावेत, असे पाटील यांनी राज्यपालांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी भाजप कार्यकर्त्यांच्यासमवेत राज्यपाल भगतसिह कोश्यारी याची भेट घेतली. राज्यपालांची चर्चा करीत त्यांना निवेदनही दिले. त्यामध्ये अवैध बांधकामाबद्दलचा दंड आणि व्याज माफ करून महाविकास आघाडी सरकारने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना वैयक्तिक लाभ करून दिला आहे. त्यामुळे मंत्रिपदाच्या शपथेचा भंग झाला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचे मंत्रिमंडळ बरखास्त करावे, असे निवेदनात म्हंटले आहे.

ज्यावेळी सरकार स्थापन केले जाते. त्यावेळी सरकारमधील मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेताना कोणाही एखाद्या व्यक्तीला वैयक्तिक लाभ करून देणार नाही, अशी शपथ घेतलेली असते. मात्र, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना वैयक्तिक लाभ करून देणारा निर्णय घेऊन महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाने शपथेचा भंग केला आहे.

या प्रकरणी राज्याच्या अर्थखात्याने अनेक आक्षेप घेतले होते पण त्याकडे दुर्लक्ष करून मंत्रिमंडळाने निर्णय घेतला, असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.

शेततळ्यात बुडून आईसह दोन मुलींचा मृत्यू; घात की अपघात?

सोलापूर : पाथरी येथे शेततळ्यात बुडून आईसह दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. गेल्या 15 दिवसांतील उत्तर सोलापूर तालुक्यातील ही दुसरी घटना आहे. ही घटना ‘घात आहे की अपघात’, अशी चर्चा सुरू आहे. दुपारी दोन वाजल्याच्या दरम्यान शेतात पाखरं हाकलण्यासाठी गेले असता हा अपघात घडल्याचं कळतंय.

मिळालेल्या माहितीनुसार, सारिका ढेकळे यांचे पती अक्षय यांचं शेतातचं घर असल्याचं समोर येतंय. द्राक्षबागेची काळजी घेता यावी म्हणून ढेकळे परिवार इथेच राहतो. पोलीस सध्या या प्रकरणात ढेकळे मायलेकींचा पाय घसरुन मृत्यू झाला की आत्महत्या या दृष्टीकोनातून तपास करत आहेत. शेततळ्यात पडून तिघांचा मृत्यू होण्याची ही जानेवारीतील दुसरी घटना आहे. याआधी उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी येथे अशाच पद्धतीने तीन मुलींचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला होता.

मायलेकींचा मृत्यू झाल्याची माहिती कळताच नातेवाईकांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. तिघांचेही मृतदेह शेततळ्यातून काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन तपासाला सुरुवात केली आहे. मृत्यूमागचं खरं कारण हे तपासाअंती समोर येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.