Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 5833

फडणवीसांच्या शाहू महाराजांवरील ‘त्या’ पोस्टवर सोशल मीडियात संतप्त प्रतिक्रिया

मुंबई । राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी एका नव्या वादाला निमंत्रण दिले आहे. आज छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा यांचा स्मृतीदिन. यानिमित्तानं फडणवीस यांनी सोशल मीडियावर शाहू महाराजांना अभिवादन करताना त्यांच्या उल्लेख ‘थोर सामाजिक कार्यकर्ते’ असा केल्यानं नेटकरी चांगलेच संतापले आहेत. या प्रकारानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर फडणवीस यांना चांगलेच फैलावर घेतले आहे. सोशल मीडियावर वादंग वाढत असल्याचे समजताच काही वेळानंतर फडणवीस यांनी ती पोस्ट काढून टाकली.

दरम्यान, शाहू महाराजांचे कार्य आणि त्यांचे समाज सुधारणेचे काम पाहता फडणवीसांनी त्यांचा उल्लेख ‘थोर सामाजिक कार्यकर्ते’ करण्याला नेटकऱ्यानी तीव्र आक्षेप घेतला आहे. बऱ्याच जणांनी फडणवीस यांनी मुद्दाम खोडसाळपणा केल्याचा त्यांच्यावर आरोप केला आहे. या वादग्रस्त प्रकारानंतर सोशल मीडियावर फडणवीस यांनी शाहू महाराजांचा अपमान केल्याप्रकरणी जाहीर माफी मागावी अशी मागणी जोर धरत आहे. या प्रकारावरून फडणवीस सध्या सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल होत आहेत.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच विधान परिषदेचे भाजपचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी सोशल मीडियावर फडणवीसवर टीका केली जात असल्याच्या कारणावरून थेट मुंबई पोलीस आयुक्तांना कारवाई काण्याची मागणी केली होती. तसेच फडणवीस यांच्यावर सोशल मीडियावर टीका करणाऱ्यांना जशाच तसं उत्तर भाजप देण्यास समर्थ असल्याचा त्यांनी इशारा दिला होता. दरम्यान, आता शाहू महाराजांचा सामाजिक कार्यकर्ते असा उल्लेख करून फडणवीस यांनी सोशल मीडियावर स्वतःहून रोष ओढवून घेतला आहे.

EXU7DPrVcAUW-KDब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

लॉकडाऊन सुरु झाल्यापासून राज्यात तब्ब्ल ९५ हजार गुन्ह्यांची नोंद; ‘इतक्या’ लाखांचा दंड वसूल

मुंबई । राज्यात लाँक डाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील ९५ हजार पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच पोलिसांवर हल्ला होण्याच्या १८४ घटना घडल्या. त्यात ६६३ व्यक्तींना ताब्यात घेतले गेले आहे अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

राज्यात लॉकडाऊनच्या कालावधीत कलम १८८ नुसार ९५,६७८ गुन्हे नोंद झाले असून १८,७२२ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ३ कोटी ५१ लाख ३८ हजार ६९४ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. पोलीस विभागाचा १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो असे गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले आहे. तसेच या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १२७९ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व ५३,०७१ वाहने जप्त करण्यात आली . तसेच परदेशी नागरिकांकडून झालेले व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, लाँकडाऊन च्या काळात या १०० नंबर वर ८४,९४५ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे अशा ६४२ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण २,११,६३८ व्यक्ती Quarantine आहेत अशी माहिती देशमुख यांनी दिली आहे.

मोदी सरकारचं करोनाशी दोन हात करण्याचं धोरण काय; सोनिया गांधी यांचा प्रश्न

नवी दिल्ली । १७ मे रोजी लॉकडाउन ३ ची मुदत संपणार आहे. त्यानंतर मोदी सरकारचं करोनाशी दोन हात करण्याचं धोरण काय आहे असा प्रश्न सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला आहे. सोनिया गांधी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे काँग्रेस शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत मोदींशी चर्चा केली. तेव्हा त्यांनी अनेक प्रश्न विचारले आहेत.

या बैठकीत खासदार राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचा ही सहभाग होता. लॉकडाउन ३ नंतर म्हणजेच १७ मेनंतर मोदी सरकार काय निर्णय घेणार ? लॉकडाउनसाठीचे नेमके काय निकष १७ मेनंतर असतील असेही प्रश्न सोनिया गांधी यांनी विचारले आहेत.

लॉकडाउनचा कालावाधी १७ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. या सगळ्या दिवसांमध्ये काँग्रेस शासित राज्यांची स्थिती नेमकी काय आहे? तिथे करोनाचे रुग्ण किती आहेत? काय काय उपाय योजण्यात आले आहेत. याबाबत आज सोनिया गांधी यांनी काँग्रेस शासित राज्यातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. त्यावेळी त्यांनी हे प्रश्न उपस्थित केले.

राजर्षी शाहू महाराज – सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ

राजर्षी शाहू महाराज स्मृतिदिन विशेष । जातीव्यवस्थेविरुद्ध लढा उभारून समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय ही लोकशाही मूल्य रुजविणाऱ्या छत्रपती शाहू महाराज म्हणजेच यशवंतराव जयसिंगराव घाटगे यांची आज जयंती. अस्पृश्य जातीतील गंगाराम कांबळे यांना हॉटेल काढून देऊन त्यांच्या हॉटेलातील चहा आवडीने पिणाऱ्या या राजाची जयंती “सामाजिक न्याय दिवस” म्हणून साजरी केली जाते. चौथ्या शिवाजी महाराजांच्या पत्नी आनंदीबाई यांनी यशवंतरावांना दत्तक घेऊन शाहू असे नाव ठेवले. फ्रेंच शिक्षक सर फ्रेजर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी उदारमतवादी शिक्षणाचे धडे “धारवाड” ला गिरविले आणि त्यानंतर भारतभर प्रवास केला. २ एप्रिल १८९૪ रोजी जनतेचे कल्याण करण्यासाठी शाहू महाराज कोल्हापूरच्या गादिवर विराजमान झाले. पुढील २८ वर्षाच्या राज्य कारभारात त्यांनी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले .

टोकाचा जातीभेद असणाऱ्या काळात १९१८ साली आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा त्यांनी राज्यात लागू केला. शाहू महाराज हे कृतिशील समाजसुधारक होते. त्यांनी आपल्या चुलत बहिणी चा विवाह इंदूरच्या यशवंतराव होळकर या धनगर समाजातील मुलाशी लावून दिला. मराठा राजघराण्यातील मुलीचा विवाह त्यांनी धनगर समाजातील मुलाशी लावून देऊन आंतरजातीय विवाह घडवून आला. आंतरजातीय विवाहासाठी स्वतःच्या घरून होणारा विरोध त्यांनी धुडकावून लावला. पुढे कोल्हापूर आणि इंदोर संस्थानात मराठा – धनगर आंतरजातीय विवाहाची योजना आखून २५ आंतरजातीय विवाह शाहू महाराजांनी त्या काळी लावून दिले. मित्रहो, आजही या शाहू महाराजांच्या महाराष्ट्रात आंतरजातीय विवाह केल्यास खून केला जातो , वाळीत टाकले जाते. शाहू महाराज हे केवळ आरक्षणाचे जनक नाहीत तर जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी प्रयत्न करणारे समाजसुधारक देखील आहेत हे आपण लक्षात घेतले. आजही जातीव्यवस्था टिकून असल्यामुळे जातीवर आधारित आरक्षण द्याव लागत आहे ही मोठी दुर्देवाची गोष्ट आहे.

समाजातील जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी आणि मागासलेल्या जातींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच बहुजनांमध्ये स्वाभिमान निर्माण करण्यासाठी, त्यांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी शाहू महाराजांनी शिक्षण प्रसाराचे कार्य हाती घेतले. १९१६ साली प्राथमिक शिक्षण सक्तीचा कायदा त्यांनी केला. या कायद्याची अंमलबजावणी नीट होण्यासाठी त्यांनी जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाही अशा पालकांना १ रुपये दंडाची शिक्षा केली . मागासलेल्या जातींना विकासाची समान संधी मिळावी यासाठी त्यांनी २६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानात शासकीय नोकऱ्यांमध्ये मागास जातींसाठी ५० % आरक्षणाची तरतूद केली. विविध तत्कालीन परिस्थिती मध्ये जातीव्यवस्थेची शिकार झालेल्या अनेक जमाती ( उदा.पारधी समाज) चोऱ्या, दरोडे अशा चुकीच्या मार्गाचा अवलंब करीत होत्या.

सनातनी व्यवस्थेने त्यांना उपेक्षित ठेऊन त्यांना सत्ता आणि संपत्ती चा अधिकार नाकारला होता त्यामुळे त्यांच्यावर नैराश्यातून अशी कृत्ये करण्याची वेळ आली होती ब्रिटिश सरकारने या जमातीवर गुन्हेगारीचा शिक्का मारून त्यांना गावकामगाराकडे रोज हजेरी लावण्याचा नियम केला होता . शाहू महाराजांनी ही हजेरी पद्धत रद्द केली आणि या जमातीतील लोकांना संस्थानात नौकऱ्या दिल्या. वणवण भटकणाऱ्या या लोकांना त्यांनी घरे बांधून दिली त्यांच्या पोटा पाण्याची सोय करून दिली त्यामुळे गुन्हेगार असा शिक्का बसलेल्या लोकांना माणूस म्हणून समाजात सन्मानाने वावरता येऊ लागले.” गुन्हेगारांना शासन करणारा सत्ताधीश सर्वत्र पहायला मिळेल मात्र त्यांना प्रेमाने मायेने आपलेसे करून सामाजिक दर्जा मिळवून देणारा व त्यांच्यात स्वाभिमान निर्माण करणारा राजा विरळच “.

१८९९ साली कोल्हापूरात वेदोक्त प्रकरणाचा स्फोट झाला . कोल्हापुरातील ब्राह्मण वर्गाने शाहू महाराजांचे क्षत्रियत्व नाकारून त्यांना शूद्र लेखले. राजालाच जर अशी वागणूक मिळत असेल तर प्रजेच काय? असा विचार शाहू महाराजांनी त्यावेळी केला. वैयक्तीक अपमानाकडे सुद्धा व्यापक दृष्टिकोनातून बघणारा हा राजा होता. याचा परिणाम म्हणजे महाराजांनी कुलकर्णी – महार वतने रद्द केली . शाहू महाराज सत्यशोधक समाजाच्या विचाराकडे वळाले . शाहू महाराजांनी ११ जानेवारी १९११ रोजी कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शाहू महाराजांनी बहुजनांमध्ये शिक्षण प्रसाराची चळवळ सुरू केली. विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृहे काढली. गाव तिथे शाळा काढली.

राज्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शाहू महाराजांनी केवळ सामाजिक बदलाकडे लक्ष दिले नाही तर उद्योग, कला,व्यापार, क्रीडा अशा विविध क्षेत्रात भरीव कामगिरी केली. १९०६ साली महाराजांनी शाहू स्पिनींग अँड व्हॅविंग मिल ची स्थापना केली , १९१२ ला खासबाग हे कुस्तीचे मैदान बांधून कुस्ती खेळाला प्रोत्साहन दिले , शाहूपुरी ही गुळाची बाजार पेठ वसविली , सहकारी कायदा करून सहकारी चळवळीस प्रोत्साहन दिले, शेतीच्या पाण्याची सोय करण्यासाठी भोगावती नदीवर जगातील मातीचे पहिले धरण बांधले असा हा सर्वांगीण विकास साधणारा दूरदृष्टी असणारा राजा.

महात्मा फुले यांनी सुरु केलेली सामाजिक परिवर्तनाची चळवळ शाहू महाराजांनी पुढे यशस्वी पणे चालू ठेवली. शाहू महाराजांनी पुढे या चळवळी चा वारसा योग्य अशा व्यक्तीकडे सुपूर्द केली त्या व्यक्तीने पुढे देशाची राज्यघटना निर्माण करण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले ती व्यक्ती म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर. १९१९ च्या सुमारास छत्रपती शाहू महाराजांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी भेट झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूकनायक या वृत्तपत्रास व पुढे त्यांच्या इंग्लंडमधील उच्चशिक्षणास त्यांनी अर्थसाहाय्य केले. माणगाव व नागपूर येथील अस्पृश्यता निवारण परिषदांत सहभागी होऊन अस्पृश्यांना त्यांचा ‘खरा पुढारी‘ मिळाला आहे असे सांगितले.

१९१९ साली छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून कानपूर येथे कुर्मी क्षत्रिय सभेने त्यांना ‘राजर्षी‘ पदवी बहाल केली. त्यांच्या कार्यामुळे दलित-पतितांचा उद्धारक, रयतेचा राजा म्हणून त्यांची प्रतिमा जनसामान्यात निर्माण झाली. या राजाने अज्ञानी बहुजन समाजाला जागृत करण्याचे व्रत अखेरपर्यंत सांभाळले. अखेरच्या दिवसांत द्वितीय चिरंजीव शिवाजी यांच्या अपघाती निधनाने ते खचून गेले, तशातच मधुमेहाने ते ग्रासले होते. अखेर मुंबई येथे ६ मे १९२२ रोजी वयाच्या अवघ्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी हृदयविकाराने निधन झाले.

मित्रहो, शाहू महाराजांनी जातीव्यवस्थेविरुद्ध लढा उभारून, शिक्षण प्रसार करून खूप मोठे काम केले पण आपण त्यांचे विचार अंगिकारतो आहोत का? हा आज खरा प्रश्न आहे. त्यांचे विचार महाराष्ट्राला समजले असते तर भीमा कोरेगाव सारख्या जातीय दंगली महाराष्ट्रात घडल्या नसत्या.आंतरजातीय विवाह केल्यास खून झाले नसते. आजही आपण आडनावा वरूनच एकमेकांच्या जातीचा शोध घेतोय हे वास्तव आहे. हुंड्या सारखी महिलांवर अन्याय करणारी प्रथा आपण जोपासतोय. लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील रुद्रवाडी मध्ये दलित सवर्ण असा वाद झाल्यामुळे २૪ कुटुंबाना त्यांच गाव सोडाव लागलं. मातंग समाजातील लोकांनी मंदिरात प्रवेश केल्यामुळे त्यांना वाळीत टाकण्यात आलं अशा घटना शाहू महाराजांच्या महाराष्ट्रात घडत आहेत. सरकार अशा घटनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहे. शाहू महाराजांइतके योगदान आपल्याला देता येणार नाही पण मनामनात रुजलेल्या या जातीच्या भिंती पाडून शाहू महाराजांच्या विचारांप्रमाणे आचरण आपल्याला नक्की करता येईल.

मयूर डुमने
७७७५९५७१५०
(लेखक राज्यशास्त्राचे अभ्यासक आहेत)

रेल्वेचा ‘तो’ दावा खोटा!- अनिल देशमुख

मुंबई । लॉकडाऊनमुळे शहरात स्थलांतरित मजूर, कामगारांना स्वगृही परतण्यासाठी केंद्र सरकारनं रेल्वेमार्फत विशेष श्रमिक ट्रेन सुरु केल्या. परंतु लॉकडाऊनमुळे आधीच हातच काम जाऊन आर्थिक संकटात सापडलेल्या मजुराकडून प्रवास खर्च आकारण्यावरून केंद्रावर जोरदार टीका झाली. अशात रेल्वे मंत्रालयानं स्थलांतरित कामगार व मजुरांच्या परतीच्या प्रवास खर्चावर रेल्वे खातं ८५ टक्के सूट असल्याचे स्पष्ट केलं. मजुरांना प्रवास खर्चावर रेल्वे खातं ८५ टक्के सूट असल्याचं वृत्त राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फेटाळून लावलं आहे.

आजपर्यंत रेल्वे खात्यानं तसा कोणताही आदेश काढलेला नाही, असं देशमुख यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रातून आपापल्या गावाकडे निघालेल्या गरीब कामगार व मजुरांना आजही तिकीट काढावं लागत आहे,’ असा दावा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. ‘सध्याच्या परिस्थितीत रेल्वे प्रशासनानं गरीब कामगारांकडून प्रवास खर्च घेऊ नये,’ अशी विनंती देखील त्यांनी केली आहे.

लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर आपापल्या गावी परतणाऱ्या स्थलांतरितांना केंद्र सरकारकडून रेल्वे तिकिटात ८५ टक्के सवलत देण्यात आल्याच्या बातम्या काल प्रसारित झाल्या होत्या. स्थलांतरितांच्या प्रवासाचा खर्च केंद्र व राज्यांमध्ये ८५:१५ या प्रमाणात विभागून घेतला जाईल, असं रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आलं होतं. अनिल देशमुख यांनी हे वृत्त खोडून काढलं आहे. ‘तिकिटातील सवलतीचे असे कोणतेही आदेश रेल्वे खात्यानं काढलेले नाहीत. आजही कामगारांना स्वत:च्या खिशातील पैसे देऊन पूर्ण तिकीट काढावं लागत आहे. लॉकडाऊनमुळं स्थलांतरित कामगारांची परिस्थिती अत्यंत वाईट आहेत. त्यांच्याकडं पैसे नाहीत. अशा परिस्थितीत रेल्वे प्रशासनानं त्यांच्याकडून प्रवास खर्च घेऊ नये, असं आवाहनही देशमुख यांनी केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

आषाढी पालखी सोहळा परंपरे नुसार निघणार ; राष्ट्रीय वारकरी पाईक संघटनेची भूमिका

सोलापूर प्रतिनिधी | महाराष्ट्राचा आध्यात्मिक आणि संस्कृती सोहळा समजल्या जाणाऱ्या आषाढी पालखी सोहळयावर कोरोनाचे सावट आहे. असे असले तरी वारकरी संप्रदायाच्या प्रथा आणि परंपरेला धरून शासनाच्या सहकार्याने यावर्षीचा आषाढी पालखी सोहळा काढण्यावर ठाम असल्याची भूमिका संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळयाचे प्रमुख मानकरी आणि राष्ट्रीय वारकरी पाईक संघटनेचे अध्यक्ष राणा महाराज वासकर यांनी मांडली.

आषाढी पालखी सोहळा तोंडावर आला आहे. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर यंदाचा आषाढी पालखी सोहळा निघणार का ? याविषयी संभ्रम कायम आहे. या संदर्भात आज बुधवार (दि.६) रोजी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख आणि इतर महाराज मंडळींची पंढरपुरात व्हीडीओ कॉन्फरन्स झाली.

त्यामध्ये राणा महाराज वासकर यांनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा परंपरेला धरून काढणे शक्य असल्याची भूमिका मांडली. यावेळी वासकर महाराज म्हणाले आषाढी पालखी सोहळयाला शेकडो वर्षाची परंपरा आहे. ही परंपरा यापुढेही कायम सुरू ठेवण्याचा प्रयत्न आहे. कोरोनाच्या संकटामुळे काही प्रमाणात सावट निर्माण झाले आहे. असे असले तरी पालखी सोहळा मोठ्या थाटात आणि डामडौलात काढण्याचा आमचा विचार आहे. यावेळी सरकारने जे नियम आणि अटी घालून दिल्या जातील त्या प्रमाणे आम्ही पालखी सोहळा काढू असे वासकर महाराज यानी सांगितले.

आषाढी एकादशी सोहळा अवघ्या दोन महिन्यावर येऊन ठेपला आहे. वारीच्या दृष्टीने संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे 13 जूनला तर संत तुकाराम महाराज पालखी सोहळयाचे 12 जून रोजी प्रस्थान होणार आहे. तसा पालखी सोहळा प्रमुखांनी कार्यक्रम देखील जाहीर केला आहे. परंतु सरकारने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे यंदाच्या आषाढी पालखी सोहळया बाबतची उत्सकुता शिगेला पोचली आहे. याच संदर्भात राणा महाराज वासकर यांनी केलेल्या वक्तव्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

कोरोनाच्या लढाईत योगदान द्या, अन्यथा..; राज्य सरकारची खासगी डॉक्टरांना नोटीस

मुंबई । राज्यातील कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भावमुळे सरकारी आरोग्य विभागावर ताण वाढला आहे.सरकारी आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारने मुंबईतील खासगी डॉक्टरांना एक नोटीस बजावली आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी खासगी तत्त्वांवर सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी सेवाभावाने पुढे येत आपलं योगदान द्यावं असं या नोटीसमध्ये म्हटलं आहे. सर्वच खासगी डॉक्टरांनी सरकारी रुग्णालयांमध्ये सेवेत रुजु व्हावं असं सरकारकडून नोटीसद्वारे सांगण्यात आलं आहे.

कोरोना विरोधातील लढाईत योगदान देण्यास पुढे येणाऱ्या या डॉक्टरांनी ज्या रुग्णालयात ते तैनात असतील तेथे १५ दिवस व्यतीत करत सेवा द्यावी. मुख्य म्हणजे नियुक्त केलेले डॉक्टर ठराविक रुग्णालयाच्या सेवेत रुजू झाले नाहीत तर त्यांच्यावर परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल असं सरकारने जारी केलेल्या नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. मुंबईत जवळपास २५ हजारहून अधिक खासगी डॉक्टर आहेत. त्यामुळे कोरोनाशी सुरु असणाऱ्या लढ्यामध्ये त्यांचं योगदान हे महत्त्वाचं ठरणार आहे.

सरकारकडून जारी करण्यात आलेली नोटीस पाहता त्यात ५५ वर्षांहून अधिक वय असणाऱ्या डॉक्टरांना सूट देण्यात आली आहे. एका फॉर्मच्या माध्यमातून या डॉक्टरांनी त्यांची पात्रता, महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिल नोंदणीकृत संस्था, सद्यस्थितीला काम करत असणारं ठिकाण नमूद करत पोस्टींगसाठीचं ठिकाण निवडता येणार आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अधिक झपाट्याने होत असल्याचं पाहता गेल्या कित्येक दिवसांपासून काही डॉक्टरांनी दवाखाने बंद केले होतं. शिवाय संशयितांना तपासण्यास काही डॉक्टरांनी नकार दिल्याच्या घटनाही समोर आल्या. पण, आता मात्र या सर्वच डॉक्टरांना सरकारच्या या आदेशाचं पालन करावं लागणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती गंभीर, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा

नवी दिल्ली । देशात कोरोनाने थैमान घातले आहे. महाराष्ट्रात तर कोरोनाने कहर केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी चिंता व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाच्या परिस्थिती बाबत ते मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी संवाद साधणार आहेत. देशात कोरोनाचां सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रावर झाला आहे. महाराष्ट्रात असणाऱ्या 36 जिल्ह्यांपैकी 34 जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातलं आहे.

महाराष्ट्रातील कोरोना हा चिंता वाढवणारा आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक बोलावून चर्चा करणार आहेत. अस डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं.

देशातील एकूण रुग्णांपैकी महाराष्ट्रातील संख्या तब्बल 15 हजार 541 इतकी आहे. यापैकी 2 हजार 819 इतके रुग्ण बरे झाले आहेत. तर 617 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळले आहेत. आणि कोरोनाचां जास्त फटका हा मुंबई आणि पुणे या दोन शहरांना बसला आहे. प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा ही अतिशय सतर्कतेने काम करत आहेत. मात्र नागरीक याच गांभीर्य लक्षात घेत नसल्याने रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

मुख्यमंत्री ठाकरेंनी रेल्वे, लष्कर व पोर्ट ट्रस्टला दिली मदतीची साद; केली ‘ही’ मागणी

मुंबई । महाराष्ट्रात कोरोनाच्या चाचण्यांबरोबरच रुग्णांची संख्याही वाढत असल्यानं राज्य सरकारनं उपचाराच्या सुविधा वाढवण्यासाठी कंबर कसली आहे.  त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून केंद्र सरकारच्या अखत्यारीतील विविध संस्थांकडं आयसीयू बेड्ससाठी जागा देण्याची मागणी करण्यात आली आहे. अधिकाधिक आयसीयू बेड्स उपलब्ध व्हावेत म्हणून रेल्वे, मुंबई पोर्ट ट्रस्ट, भारतीय लष्कर आणि इतर केंद्र शासनाच्या अखत्यारीतील रुग्णालये व संस्थांनी त्यांच्या राज्यभरातील सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी विनंती राज्य सरकारनं केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: वरिष्ठ पातळीवर बोलत आहेत.

लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल केल्यानंतर आता राज्याराज्यातून महाराष्ट्रातले नागरिक यायला सुरुवात झाली आहे. तसेच, परदेशांतून देखील नागरिक परतायला सुरुवात होईल. रुग्णसंख्या अधिक वाढल्यास जास्त आयसीयू बेड्सची गरज लागेल तसेच इतर वैद्यकीय सुविधा लागतील हे गृहित धरून राज्य सरकारने भारतीय रेल्वे, मुंबई पोर्ट ट्रस्ट, भारतीय लष्कर, नौदलाकडे त्यांच्या इमारती व जागा उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. असे झाल्यास वाढीव रुग्णांना विलगीकरण करून ठेवता येणे शक्य होईल.

दरम्यान, कोरोनाचा सामना करण्यासाठी चीनच्या वुहान शहारात उभारण्यात आलेल्या कोविड-१९ रुग्णालयाच्या धर्तीवर राज्य सरकारवतीने मुंबई येथील बीकेसी संकुलात युद्धपातळीवर उभारण्यात येणाऱ्या १हजार खाटांची क्षमता असलेल्या कोविड-१९ रुग्णालयाच्या कामाची काल मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे भेट देऊन पाहाणी केली. ”गेल्या सुमारे तीन महिन्यांपासून राज्य शासन कोरोनाशी मुकाबला करत असून विविध उपाययोजना करत या कोरोना साथीला अद्यापपर्यंत नियंत्रणात ठेवले आहे. चाचण्यांचा वेग सुद्धा लक्षणीयरित्या वाढविल्यामुळे रुग्ण संख्या देखील वाढत आहे. रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. त्याचवेळी खबरदारी म्हणून नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि पुणे येथील आझम कॅम्पसमधील मस्जिदमध्ये कोविड-१९ विरुद्ध लढण्याची तयारी करण्यात येत आहे,” अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट करत दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी राज्यात अधिकाधिक ICU बेड्स उपलब्ध – मुख्यमंत्री

मुंबई ।  ”गेल्या सुमारे तीन महिन्यांपासून राज्य शासन कोरोनाशी मुकाबला करत असून विविध उपाययोजना करत या कोरोना साथीला अद्यापपर्यंत नियंत्रणात ठेवले आहे. चाचण्यांचा वेग सुद्धा लक्षणीयरित्या वाढविल्यामुळे रुग्ण संख्या देखील वाढत आहे. रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. त्याचवेळी खबरदारी म्हणून नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि पुणे येथील आझम कॅम्पसमधील मस्जिदमध्ये कोरोना विरुद्ध लढण्याची तयारी करण्यात येत आहे,” अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट करत दिली आहे.

नियोजनाचा भाग म्हणून अधिकाधिक आयसीयू बेड्स उपलब्ध व्हावेत यासाठी राज्य शासनाने रेल्वे, मुंबई पोर्ट ट्रस्ट, भारतीय लष्कर आणि इतर केंद्र शासनाच्या अखत्यारीतील रुग्णालये आणि संस्था यांना त्यांच्या राज्यभरातील सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात अशी विनंती केली आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. दरम्यान, कोरोनाचा सामना करण्यासाठी चीनच्या वुहान शहारात उभारण्यात आलेल्या कोविड-१९ रुग्णालयाच्या धर्तीवर राज्य सरकारवतीने मुंबई येथील बीकेसी संकुलात युद्धपातळीवर उभारण्यात येणाऱ्या १ हजार खाटांची क्षमता असलेल्या कोविड-१९ रुग्णालयाच्या कामाची काल मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे भेट देऊन पाहाणी केली.

दरम्यान, पुण्यात विशेष कोविड रुग्णालयाची उभारणी करण्यात येत आहे ४५० खाटांच्या रुग्णालयासाठी महाराष्ट्र शासनासमवेत सामंजस्य करार करण्यात आला आहे. विप्रो लिमिटेड कंपनीच्या मदतीमुळे वैद्यकीय क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती ठाकरे यांनी दिली. हे विशेष कोविड रुग्णालय हिंजवडी येथे माहिती तंत्रज्ञान कॅम्पसमध्ये सुरु करण्यात येईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”